अध्यात्म विराम ८४
शंका आणि इतर तत्सम दुर्गुण हे तमोगुण व रजोगुण युक्त असल्याचं आपण पाहिलं.त्यामुळे त्यांचं लक्षण अतिघाई, अती शीघ्र विचार आणि अशांत वृत्ती हे आहे. या उलट
सद्गुण व सत्वगुण हे वैराग्य आणि विरक्ती युक्त असल्या मुळे, शांत, सुशील स्वभावी असतात. म्हणजे श्रद्धावान व्यक्ती नेहमी शांत असतात. त्यांचे विचार सखोल आणि कृती संयत असते. याउलट शंका असलेल्या व्यक्ती अवखळ असतात. त्यांचे विचार उथळ असतात. त्यामुळे कृती सुद्धा तशीच असते.
श्रद्धा माणसाला धीर, उदात्तता आणि कर्मरत राहण्यास किंवा कर्म करण्यास शिकवते. शंका माणसाला कर्मा पासून परावृत्त करते. म्हणजेच श्रद्धा माणसाला कर्म करण्यास बाध्य करते. ही बद्धता कर्म करण्याचं स्वातंत्र्य असताना सुद्धा, श्रद्धावान माणसाला कर्माशी बांधून ठेवते. खरा श्रद्धा युक्त माणूस फक्त कर्मातील आपला सहभाग जाणतो. म्हणजे घडून गेलेलं, घडतं असलेलं आणि पुढे घडणारं यापैकी कशातही गुंतत नाही.भूत वर्तमान आणि भविष्य हे तिन्ही ईश्वरी इच्छेचा परिपाक असतो. कारण त्याची श्रद्धा ही त्याच्या आराध्या वर असते आणि ती श्रद्धा त्या माणसाला नेहमी सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त करते.
शंका माणसाला प्रत्येक कर्मात आधी नकारात्मक विचार करायला लावते. शंका ही व्यवहारात उपयोगी पडत असेल. कारण माणसाला ती सावध करते. चुका करण्या पासून परावृत्त करते आणि योग्य की अयोग्य याचा विचार करून, पाऊल टाकण्यास शिकवते.त्यामुळे शंका बऱ्याच प्रमाणात माणसाला व्यवहारी व व्यवहारात चतुर बनवते. हे चातुर्य व्यवहारात आणि प्रपंचात बऱ्याच प्रमाणात गरजेचं असते.
पण आध्यात्मिकदृष्ट्या शंका ही अनावश्यक व अहित कारक असते. कारण या जगताच्या पालकाने सांगितल्या प्रमाणे, अनन्य होऊन, त्याचं नित्य चिंतन करायला, श्रद्धा ही पूर्णपणे व ठाम असावी. कारण परिपूर्णता अंगी बाणवून जो भक्त त्याची उपासना करेल, अश्या भक्ताचं क्षेम ईश्वर पाहणार, हा ठाम विश्वास मनात असेल तर, श्रद्धा पूर्ण असते आणि अश्या दृढ मनात शंकेला वाव नसतो. शंका ही त्याचं ठिकाणी उत्पन्न होते, जिथे श्रद्धा परिपूर्ण अर्थात शंभर टक्के नसते. खरी श्रद्धाच खऱ्या भक्तीला जन्म देते आणि खरी भक्ती, ईश्वराला भक्ताकडे खेचून आणते.
मनातील कोणत्याही दुबळ्या, अशक्त आणि कमजोर विचारांवर सकारात्मक इमारत उभी राहू शकत नाही. कारण सत्वगुण हे तयार व्हायला, रुजायला आणि कायम व्हायला वेळही लागतो आणि जास्त ऊर्जा व शक्ती लागते. कारण नकारात्मक विचारात स्वतःची शक्ती व ऊर्जा असते. त्यांच्यात इतर दुर्गुणांना खेचून आणण्याची चुंबकीय शक्ती असते.
त्यामुळे एका दुर्गुणाने इतर अनेक दुर्गुण खेचून आणले जातात. पण सकारात्मक, सत्वयुक्त आणि सात्विक विचार यांना, बाहेरून ऊर्जा व ताकद लागते. दुपारच्या उन्हात सर्वकाही तापवून सोडायची शक्ती व ऊर्जा असते. पण सकाळच्या कोवळ्या उन्हात ती शक्ती व ऊर्जा नसते. पण खरी शांती,समाधान, आनंद व सत्व हे या सकाळच्या उन्हातच असते. श्रद्धा. आणि भक्ती या पूर्ण असल्या की ईश्वरा पर्यंत आपल्या मनातील शुद्ध व सत्वगुण युक्त लहरी पोचतात.
याच विचारावर उद्या चिंतन करूया. तोपर्यंत त्याचं ईश्वराच्या स्मरणात, सकारात्मकता प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२३/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment