अध्यात्म विराम ३२
श्रवणाच्या लहरींची अद्भुत ऊर्जा आणि शक्ती, याचा लाभ, प्रत्येक जण आपापल्या परीने घेऊ शकतो. या ऊर्जेची क्षमता, ही वादातीत आहे. विज्ञानाच्या आधारे सुध्दा आणि मानस शास्त्राच्या दृष्टीने सुद्धा, लहरी वा कंपनं, यांचं स्वतःचं कार्य आहे आणि त्या शरीराअंतर्गत मनातून निर्माण होतात, तेंव्हा त्यांच्या क्षमतेची शक्ती, द्विगुणित वा पंचगुणीत होते, ज्यावेळी ती एकाग्रित होऊन उत्पन्न होते.
अर्थातच हा नाद व ध्वनी सकारात्मक शुद्ध आणि सात्विक लहरी व कंपन असतील तरच असा बहुगुणी परिणाम साधला जाऊ शकतो, हे ध्यानात असू द्या. पण ईश्वर आणि शास्त्र व पुराणं कर्ते जाणत होते की, हीच शक्ती अनेक पटींनी निर्माण होऊन, अद्वितीय कार्य करते वा करू शकते.याचं कारण अनेक जणांच्या लहरी, ज्यावेळी एक होतात, त्यावेळी त्यातून निर्माण झालेल्या ऊर्जा लहरी एकत्रित झाल्यावर, क्षमता अनेक पट होते. त्या सात्विक शुभप्रद शक्तींचा l लाभ सर्वांना होतो. यात विज्ञान आहे.
एक उदाहरण घेऊ म्हणजे समजून येईल. एखादं इंजिन जितक्या जास्त वॅट क्षमतेच असेल,तितक्या वेगात आणि तितक्या जास्त अंतरावर ते इंजिन जाऊ शकतं. ही कार्यक्षमता उपयोगात आणण्यासाठी, त्या इंजिनाला तितक्याच प्रमाणात इंधन, वीज यांची गरज असते.
पण त्याप्रकारचं इंधन पुरवण्यात आलं की, ते इंजिन आपल्या कार्याला उत्तम रित्या न्याय देऊ शकत. याच न्यायाने, ज्यावेळी एकत्रितपणे उत्पन्न झालेल्या लहरी, त्या लहरींना ग्रहण करणाऱ्या सर्व जणांना, त्याचा तितके पट अधिक लाभ होतो. कारण अश्या एकत्रित श्रवणा तून निर्माण होणाऱ्या ध्वनी, ऊर्जा व शक्ती बहुमूल्य असतात.
हे जाणून आणि असे अनेक जण एकत्रित येऊन, तितकी पट ऊर्जा व शक्ती प्रदान करणाऱ्या लहरी निर्माण करू शकतील, यासाठीच प्राचीन शास्त्रज्ञ ऋषींनी,एक बहुगुणी बहुमूल्य असा उपाय योजून, आपल्या पुढे मांडून, सादर करून, एक उत्तम आदर्श घालून दिला.
तो उपाय म्हणजे सामुदायिक स्मरण, भजन, कीर्तन थोडक्यात ईश्वर नामाचा एकत्रित गजर जर होऊ शकला, तर त्या संयुक्त लहरींचा शास्त्रीय, वैज्ञानिक, अध्यात्मिक उपयुक्त व उचित लाभ, सर्वसामान्य जीवांना होईल. यातून ईश्वराने, देवर्षी नारद यांच्या माध्यमातून, दुसरा भक्ती प्रकार जगाला दिला, दाखवला, जगासमोर आणला.
एकट्या बोटाने लावलेला जोर आणि सर्व बोटं एकत्रित करून, त्या वज्र मुठीने मारलेला मुक्का, यातील, ऊर्जा व शक्ती ही एकत्रितपणात नक्कीच जास्त आहे. संघटित कार्याची शक्ती अजोड आहे, हे सर्वश्रुतच आहे. त्यातून जर बलवृद्धी होत असेल, तर त्यात सामील सर्वांनाच याचा लाभ होईल व घेता येईल. पण हे जगासमोर मांडण्याचं अत्यंत मोलाचं आणि महत्वाचं कार्य, भारतीय प्राचीन सनातन धर्मानेच जगाला दाखवून दिलं. हे अनंत उपकार आहेत.
कीर्तन, ज्यामधे सामुदायिक भजन नामसंकीर्तन, प्रवचन जागर, आरती, सामुदायिक प्रार्थना इत्यादी सर्वांचा अंतर्भाव यामधे होतो. कीर्तनात, सादरकर्ते आणि श्रोते यांच्या माध्यमातून, निर्माण झालेल्या नाम, घोष, जागर यांच्या ध्वनी लहरी, सर्व श्रवण कर्त्यांच्या श्रुतीतून, कानावाटे कर्णपटल,मस्तिष्क,संपूर्ण देह,रक्त, मज्जा संस्था, हृदय, मन यांसह देहातील सर्वच इंद्रिय यावर अत्यंत सकारात्मक परिणाम करतात. त्याद्वारे प्रसन्न व प्रफुल्लित झालेल्या मनातून, उत्पन्न सात्विक लहरी, अत्यंत शुभकारक,.शुभ फलदायी असतात. त्या मनासह आत्मा सुद्धा शुद्ध करतात.
भक्तीच्या प्रांगणातील व मार्गातील, दुसरी पायरी असलेल्या कीर्तनातून भक्तीचा हेतू कसा साध्य व सिद्ध होतो आणि त्याचा लाभ, देह, आत्मा यांना मनाद्वारे कसा प्राप्त होतो, यावर उद्याच्या भागात चिंतन करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०२/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment