अध्यात्म विराम ३९
याचा अर्थ काय होतो की, स्मृती सहसा जात नाही. म्हणजेच स्मरण आणि विस्मरण हा एक व्यवस्थेचा भाग आहे.कोणती व्यवस्था तर,स्मरणात राहणं किंवा विस्मरण होणं. अशी व्यवस्था ज्यामुळे, आपण श्रवण,दृश्य यापैकी एक किंवा दोन्ही हे आपल्या जागृत, स्वप्न आणि सुप्त मनःपटलावर पाहणं किंवा न पाहणं.
म्हणजे विस्मरण हे वास्तविक एका अर्थाने तळात साठलेलं, पृष्ठभागावर न आणता येणं किंवा येऊ न शकणे. पण याचीच दुसरी बाजू ही की, विस्मरण हा भास आहे आणि प्रत्यक्ष तसं काही नाही. आता ही व्यवस्था ईश्वराने, फक्त या जन्मातील याच देहापुरती केलेली असते का, याचा जरा विचार करूया, म्हणजे काही गुह्य उत्तरं हाती लागतील.
जर ही व्यवस्था मात्र एका देहापुरती केलेली असती तर, यामधे मेंदू आणि मन या दोन्हींचा संबंध जोडला गेला नसता. मन हे सॉफ्टवेअर समान आहे आणि मेंदू हे हार्डवेअर समान. मानवनिर्मित सॉफ्टवेअर मधे सहसा डाटा साठवून ठेवण्याची व्यवस्था नसते. त्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम साठी, लागणारा डाटा तेवढा त्या सॉफ्टवेअरमधे असतो. बाकी सर्व डाटा हार्डडिस्क मधेच साठवला जातो.
पण डाटा सॉफ्टवेअर सोबत दुसऱ्या, तिसऱ्या संगणकात स्थानांतरीत करता येतो आणि तिथे तो पुन्हा स्थापित झाल्यावर कार्य करू शकतो.म्हणजे मन त्या आठवणींना पृष्ठभागावर आणणारं महत्वाचं इंद्रिय आहे. आपण हे देखील जाणतो की, मृत्यू पश्चात, आत्म्यासह मनोमय कोष प्राणासह, पुढील वाटेने मार्गस्थ होतो.
देह म्हणजेच मेंदू किंवा हार्ड डिस्क इथेच ठेवून. पण मन हे अवकाशासमान आहे. म्हणजे आजच्या परिभाषेत क्लाउड सिस्टीम आहे. क्लाउड सिस्टीम मध्ये डाटा साठवून ठेवता येतो. म्हणजे स्मरणात ठेवता येणारा डाटा पुढील जन्मातील नवीन देह अर्थात संगणक आणि नवीन हार्ड डिस्क अर्थात मेंदूत पुन्हा स्थापित करता येऊ शकतो.
परंतु आपल्याला आता हे देखील माहीत आहे की, वेग वेगळ्या प्रोग्रॅम्स द्वारे, क्लाउड सिस्टीम मधे डाटा साठवला जातो. ही मानवाने आता, गेल्या काही वर्षात निर्माण केलेली व्यवस्था आहे. पण ईश्वराने ही व्यवस्था युगानुयुगे आधी, विश्व निर्मितीच्या वेळी, निर्माण करून अमलात आणली आहे.
याचाच अर्थ, मनाच्या तिन्ही पातळ्यांवर ज्ञान, आठवणी घटना, श्रवण केलेलं, असा सर्व काही, साठवून ठेवलेले असणार. अनेकदा सुप्त मनात दडलेल्या कित्येक गोष्टी, घटना व आठवणी स्वप्नावस्थेत पृष्ठभागावर येतात आणि आपल्या जागृत मन पटलावर नसलेल्या किंवा गत स्मृती तील एखादी व्यक्ती, घटना दिसते. अश्या प्रकरणात सहसा, गाढ झोपेत स्वप्नात पाहिलेल्या बऱ्याचश्या घटना, गोष्टी या आठवत नाहीत.
आतापर्यंत वाचलेल्या गुह्य गोष्टीचं थोडं चिंतन करूया आणि हा विषय उद्या पुढे नेऊया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०९/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment