अध्यात्म विराम ५७
या अपूर्णता भावावर आजच्या भागात पुढे चिंतन करूया. कालचा विषय सुरू करताना, एक उदाहरण घेऊ म्हणजे विषय स्पष्ट होईल. आपल्याकडे कोणी पाहुणे येणार असतील, तर त्यांची विभागणी दोन भागात करता येईल. एक खास किंवा आपल्या मनात ज्यांच्या बद्दल आपुलकी आहे असे आणि दुसरे ज्यांच्यावर आपली खास मर्जी नाही, किंवा जे फारसे आवडते नाहीत असे. बघा आठवून बघा.
आता दुसऱ्या प्रकारचे पाहुणे येतात त्यावेळी, आपण जे जे आगतस्वागत, मानसन्मान, आदर आतिथ्य, खान पान करतो, ते उपचार म्हणून किंवा तोंददेखलं करतो. त्यामागे कारणंही तशीच असू शकतात. एकतर आपले व त्यांचे विचार फार जुळत नसतील, त्यांची वागणूक आपल्या मनाजोगती नसावी, त्यांच्याकडून आपण केलेल्या काही अपेक्षा पूर्ण झालेल्या नसतील. त्यामुळे कदाचित, आपल्याला त्यांच्याबद्दल फारशी आपुलकी नसते, या व अश्या अनेक कारणांनी आपलं वागणं औपचारिक असू शकतं.
या उलट, पहिल्या प्रकारातील पाहुणे आले की, आपण त्यांचं आदर आतिथ्य, मान सन्मान, खान पान विशेष आदराने, अगत्याने आणि विशेष स्नेहाने करतो. याची सुद्धा अनेक कारणं असू शकतात. त्यांचे आपले विचार मिळते जुळते असू शकतील, त्यांची वागणूक आपल्या मनाजोगती असू शकेल, त्यांच्यावर आपला विशेष स्नेह असू शकेल, नात्याची किंवा ओळखीची काही खास गाठ असेल, त्यांच्याकडून आपल्या काही अपेक्षा पूर्ण झालेल्या असल्यामुळे विशेष स्नेह आणि कृतज्ञता भाव आपल्या मनात असेल वा इतर अनेक कारणं असू शकतील.
पण आपल्या स्नेहपूर्ण किंवा औपचारिक वागणुकीमागे कारण हे असणार. आता आपण विषयाकडे येऊ. ईश्वराला मंदिरात, पुजेवेळी मनात वा स्मरणमात्रे, वंदन करताना आपण पूर्ण भाव धरून, तन्मय होऊन, एक तानता साधत, वंदन वा नमन करतो का. जर तसं आपण करत असू तर आपल्या मनातील ईश्वरी स्नेहाचे भाव आणि त्या मुर्तिरुप वा साक्षीरुप ईश्वराच्या हृदयस्थ स्पंदन लहरी एकरूप होऊन, आपण त्यावेळी विलक्षण शांती, एकाग्रता, शीतलता आणि एकतानता यांचा दिव्यानुभव घेऊ शकतो किंवा घेतो.
आता हा अनुभव येत असेल तर आणि येत नसेल तर का येत नसावा,याची वरील उदाहरणावरून, जाणवणारी कारणं यांचा सखोल अभ्यास उद्याच्या भागात करूया. तोपर्यंत स्मरण आणि अर्चन करत राहूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२७/१२/२०२२
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment