Skip to main content

अध्यात्म विराम ९१

अध्यात्म विराम ९१

मुळातच अध्यात्म हा व्यवहार नाही. म्हणजे तिथे इतकं केलं की तितकं प्राप्त होईल, अशी परिस्थिती नाही. कारण अध्यात्म,. साधना, भक्ती ही आपल्या याच नव्हे तर मागील आणि पुढील अनेक जन्मातील पापं व अहित कारक कर्माचा हिशोब, ईश्वरी नामाच्या पुण्य कर्माच्या आधारे, चुकता करण्यासाठी आहे. या ईश्वर चिंतनाच्या व स्मरणाच्या निरपेक्ष कर्माने, अनेक गोष्टी साध्य करून घ्यायच्या आहेत, हे जाणणे जरुरी आहे. म्हणूनच त्या ईश्वर चिंतन व स्मरण यांना क्षुल्लक व्यवहार पातळीवर आणून आपण, आपल्याच हिताला बाधा पोचवतो. 

म्हणून आत्ममार्गी साधक बनण्यासाठी किंवा बनण्या आधी आपल्या मनातून, व्यवहार या गोष्टीला काढून टाकले पाहिजे. आपण अध्यात्म मार्गात किंवा आपल्या नित्य जीवनात घेत असलेलं ईश्वराचं नाम, हे मी त्याला देत असलेलं दाम समजण्याची चूक कधीही करता कामा नये. असं अगदी दाम, या स्वरूपात आपण मनात योजून समजलो नाही, तरीही, आपल्या मनातील अपेक्षांमधे आपण मी इतकं करतो, तरी देवाचं माझ्याकडे लक्ष नाही, अश्या स्वरूपाचं मनात येणं, हेच मुळात आपल्या साधनेला कमी पणा आणण्यासारखं आहे.

आपण करत असलेली साधना किंवा ईश्वराचं स्मरण हे, आपण करत असलेल्या नोकरी, व्यवसाय, धंदा याप्रमाणे नाही. म्हणजे जिथे आपण कष्ट घेतो, नित्य कामं करतो, तिथे ज्याप्रमाणे आपल्याला वेतन वा नफा मिळतो, त्या प्रमाणे इथेही काही मोल दिल्यावर, काही प्राप्त होईल, याची शाश्वती, ईश्वरही देणार नाही. किंबहुना व्यावहारिक पातळीवर आणि निकषांवर मोजता येईल अशी कोणतीही गोष्ट, ईश्वराच्या दारात नाही. 

ईश्वराच्या लेखी, माणसाच्या मनातून, निघणारी, गोष्ट, इच्छा, स्मरण हे जास्त मोलाचं किंवा किमती आहे. अर्थातच त्याचं नियमाने, आपल्या मनातून आपण इतरां साठी केलेलं वाईट चिंतन हे देखील ईश्वराकडे त्याचं प्रकारे पोचतं. म्हणून ईश्वरी साधनेत असलेल्या माणसाने, आपल्या जिभेवर, बुद्धीवर व मनावर खूप नियंत्रण ठेवलं पाहिजे. हे नियंत्रण, स्वयंस्फूर्तीने असावं. म्हणजे लादलेल नसावं.कारण लादलेली गोष्ट किंवा कर्म मनुष्य मनापासून करत नाही. जी गोष्ट किंवा जे कर्म मनापासून केलं जात नाही, त्याचं फल त्याचं प्रमाणात प्राप्त होतं. 

अजून एक चूक आपण करतो ती म्हणजे, आपण थोडंसं केलं तरी आपल्याला आपण खूप काही केलं असं वाटतं. लगेच आपण स्वतःबद्दल अनेक गैरसमज करून घेतो. म्हणजे मी आता साधनेत, नाम स्मरणात खूप काही केलेलं आहे त्यामुळे आता मी खूप पुढे गेलो आहे किंवा जाणार आहे. जिथे लीनता आणि शरणागती असते तिथे, कमी जास्त, अधिक उणे हा मोजण्याचा प्रकार असूच शकत नाही. 

किंबहुना जिथे माणूस पूर्ण शरण असतो तिथे, माणूस कधीही काय आणि किती करतो, हे जाणत नाही आणि लक्षात ठेवत नाही.आपण आठवून बघा,आपल्या आयुष्यात असलेल्या एखाद्या निखळ नात्यासाठी किंवा मैत्रीसाठी आपण काहीही केलं आणि ते चुकून समोरच्याने बोलून दाखवलं तर, आपणच त्याला गप्प करून म्हणतो की, मी काही फार केलेलं नाही आणि जे केलंय ते कर्तव्य म्हणून केलंय. म्हणजेच आपण त्या व्यक्तीसाठी केलेलं काहीही लक्षात ठेवत नाही व ठेवू इच्छित नाही. 

भक्ती, साधना यांचं सुद्धा हेच मर्म आहे. हाच विषय उद्या पुढे नेऊ. पण तोपर्यंत आपण ईश्वराला स्मरत राहून, त्याच्या नामात लीन राहण्याचा प्रयत्न करत राहूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३०/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...