श्रीरामरक्षा स्तोत्र आणि त्याचा भावार्थ भाग २१ व अंतिम राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥३८॥ या शेवटच्या श्लोकाची कथा मोठी गूढ आहे. मुळात हे स्तोत्र भगवान शंकर यांनी स्वप्नात दृष्टांत देऊन श्रीबुधकौशिक ऋषींना कथन केलं. श्रीराम नामचं महत्व विशद करणारं हे स्तोत्र आपल्याला पूर्वपुण्याईने पठण करण्याची प्रेरणा व बुद्धी ईश्वर, सद्गुरू आणि आपलं संचित देतं, इतकं याचं महत्व अलौकिक आहे. म्हणूनच ज्याला तशी बुद्धी झाली त्याने हे नित्य पठण जरूर जरूर करावं. शेवटच्या श्लोकाची कथा अशी आहे. एकदा कैलासावर भगवान सदाशिव भोजनासाठी देवी पार्वतीची प्रतीक्षा करत होते. त्यांनी तसं पार्वतीला सूचित केलं की, भोजन उन्ह उन्ह अर्थात गरम आहे तोपर्यंतच करून घेऊ. त्यावर माता पार्वतीने उत्तर दिलं की, मी विष्णूसहस्रनामांचं पठण करते आहे, ते झालं की बसूया. असं बराच वेळ झाल्याउपरांत माता भोजनास आली. त्यावेळी उपदेशपर कथन करताना भगवान शिवशंकर म्हणाले ," हे सुमुखी (वरानने), पार्वती, मी नित्य राम, राम इति राम इति नामाचा जाप करतो, मी त्या नामात नित्य रमलेला असतो (रमे) , ...