मंगल पर्व नवरात्री मतितार्थ !! जसं सुचलं तसं. अस्थिरतेकडून स्थिरतेकडे, द्वैतातून अद्वैताकडे, अज्ञाना कडून ज्ञानाकडे, तीमिराकडून प्रकाशाकडे जातानाचा प्रवास हा शिवाकडून पुन्हा शिवाकडे जाण्याचा प्रवास. हा प्रवास अनंत जन्मांचा असतो. म्हणूनच हा अनंताकडे जाणारा प्रवास आहे. शिवतत्व हे अगम्य आणि गूढ आहे. तो एक अग्निरुप ब्रम्हांड आहे.जीवाला तिथे जाण्यासाठी अनेक दिव्य पार करून जावं लागतं. यामधे आपले भोग व उपभोग संपवून किंवा त्यांचा मोह टाळून, पुढे जाणं अपेक्षित आहे. यातील शून्यातून शिवाकडे जाण्यात,चुका, प्रमाद, अज्ञान वश अनेक चुकीची कर्म घडतात. हा प्रवास म्हणजे एक यज्ञ आहे आणि यज्ञ म्हटलं की आहुती अपेक्षित आहे. ही आहुती, मोह, लोभ, माया, अज्ञान, दुष्कर्म यांची असावी लागते. पण या सर्वातून निर्माण झालेले व होणारे भोग व उपभोग हे या अहुतीला अपूर्ण ठेवतात. कारण प्रत्येक क्षणी आहुती अपेक्षित असते. पण प्रत्येक क्षणी भोग आणि उपभोग सुद्धा येतच असतात. या सर्वांना टाळून जाणं अशक्य आहे. या सर्वांना भोगून जाणं कष्टप्रद आणि ऊर्जा, शक्ती व वेळ यांचा अपव्यय करणारं आहे. पण द्वैत, अस्थिरता, अज्ञान...