#श्रीकृष्णनीती #भाग२५ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! आतापर्यंत आपण महाभारतातील अनेक व्यक्तिरेखा, विशेषतः नकारात्मक, विस्ताराने पाहिल्या. त्या व्यक्तींचा आलेख , मानसिकता, काहींची अपरिहार्यता, काहींची दंभ, द्वेष याने भरलेली मानसिकता, काहींची उद्दाम वृत्ती आणि सत्तालोलुपता, महत्त्वाकांक्षा या सर्वांचा आपण अभ्यास केला. आता हे चित्र सार्वत्रिक स्तरावर कसं होतं आणि या सर्वाचा एकत्रित परिणाम काय आणि कसा कसा होत गेला, त्याप्रमाणे हे युद्ध व्हायला कोणाची मानसिकता विशेषत्वाने कारणीभूत झाली याचा विचार करू. मुळात त्यावेळची राजकीय पार्श्वभूमी दोन स्तरात विभागता येईल. एक म्हणजे धृतराष्ट्राच्या आधीचा काळ आणि धृतराष्ट्राचा काळ. धृतराष्ट्राच्या आधीचा काळ मुख्यता जरासंध , कंस,नरकासुर या असुर शक्तींनी व्यापलेला काळ होता. त्यातील बऱ्याचश्या शक्ती श्रीकृष्णाने नष्ट केल्या वा करवून घेतल्या. त्याच काळातील भीष्मांच्या सारख्या महारथींनी सर्वसामान्य जनतेवर अन्याय व अत्याचार कधी केला नाही. त्यामुळे त्यांच्याकडे एका वेगळ्या आदराने पाहिलं जातं होतं. त्यातही कुरु वंशाचा एक खंदा आधारस्तंभ म्हणून भ...