Skip to main content

अध्यात्म विराम ६७

अध्यात्म विराम ६७

दासांचा दास हनुमंत हा श्रेष्ठ यासाठी नाही की तो लीन आणि शरणागत आहे, तर यासाठी आहे की,तो आपल्या स्वामींना सर्वश्रेष्ठ मानतो. यात त्या हनुमंताच्या श्रेष्ठत्वाचं यश दडलेलं आहे. खरा भक्त तोच, जो ईश्वराला पूर्ण व श्रेष्ठ मानतो आणि स्वतःला शून्यवत वा तृणवत मानतो. स्वामी त्या शून्याला कोणत्या संख्येसमोर नेऊन ठेवायचं ते ठरवेल,हा सार्थ आणि पूर्ण विश्वास भक्ताच्या मनात दृढ असावा. 

हा भाव इतका दृढ व घट्ट असावा की, या तिन्ही लोका तील कोणतीही शक्ती, या विश्वासाला तडा देऊ शकणार नाही. म्हणजे मग भोग आणि उपभोग या दोन्ही स्थिती मनावर आणि मनाच्या विश्वासावर कसलाही आघात करू शकणार नाहीत. भोग आणि ईश्वर या लेखमालेच्या पुढे अध्यात्म विराम सुरू करण्यामागचा उद्देश आणि मर्म कदाचित यातून लक्षात आलं असेल.कारण ती लेखमाला आलेले भोग व उपभोग यांची कारण मीमांसा ही कर्मात व कर्मगतीत आहे, हे ठसवते. 

या कर्माच्या फेऱ्याला, त्याच्या सर्व परिणामांना आपण स्वतः जबाबदार असतो, ईश्वर त्यात दखल देत नाही. ईश्वर फक्त साक्षीरूप असतो. त्याची आपल्याला सहाय्य करण्याची इच्छा जरूर असते. पण आपण जोपर्यंत या कर्मगतीच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याची इच्छा आणि त्या ईश्वराकडे जाण्याची मनीषा मनात बाळगून, भक्त म्हणून आयुष्याचा उर्वरित काळ व्यतीत करत नाही, तोपर्यंत ईश्वर सहाय्यास येऊ शकत नाही.

मुळात हा भाव मनात घट्ट करून घेतला पाहिजे की, ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे आणि या जगातून, या देहातील आत्म्याला, या जगताबाहेर नेऊन, ईश्वराकडे घेऊन जाण्यासाठी, जोपर्यंत देह, मन, बुद्धी व आत्मा हे सर्व एकसारखा एकच विचार करत नाहीत तोपर्यंत हे शक्य होऊ शकत नाही. या दृढ भावाकडे जाण्यासाठी आधी भोग का आले,ते कसे भोगुनच संपवावे लागतील,त्यांना जिंकण्याचा किंवा त्यांच्या पुढे हरण्याचा विचार न करता, ते भोगून पुढे जाणं. 

या भोगात वा उपभोगात मनावर कोणतेही ओरखडे किंवा मेद चढू न देता, त्या मनाला स्वच्छ, शुद्ध ठेवण्या साठी भक्तीरुपात ईश्वर वंदना,आराधना, प्रार्थना, शरणा गती आणि दास्यत्व हाच योग्य मार्ग आहे. याच कारण सुद्धा तसच आहे. मन हे देहाच्या व कर्माच्या फलात गुंतलं की, त्याला या खेळात फक्त वाहात जाणं हे एकच कार्य उरतं. किंबहुना तोच त्या मनाचा नित्य कार्यभाग होतो. मग ते मन भोग आणि उपभोग या चक्राच्या जाणिवेचा भाग होऊन, देहप्राप्ती-मृत्यू, पुन्हा भोग व उपभोग यांसाठी पुन्हा नित्य देह प्राप्ती आणि मृत्यू या व्युहात अडकून जातं. 

या मनाला या व्युहातून बाहेर येण्याचा मार्ग कर्म समाप्ती या मध्ये नाही. कारण जो पर्यंत कर्माचा शेवटचा भाग शिल्लक आहे, तोपर्यंत हा फेरा सुरूच राहतो. मग यावर उपाय काय, त्याबद्दल उद्याच्या भागात चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०६/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments