सुभद्राहरण ३८ समाप्तीचा भाग ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून, लग्नानंतरचे कुलाचार म्हणून पूजा करण्यात आली. कृष्णाने सजवून नटवून अर्जुनाला पुजास्थानी आणलं. अर्थात नवपरिणीत सौभाग्यवती सौभाग्यालंकार परिधान केलेली स्वर्गीय सोंदर्याची मूर्ती सुभद्रा अर्जुनाशेजारी विराजित झाली. कुलोपाध्यय यांनी विधिवत पूजेला सुरवात केली. श्रीगणेश पूजन करून नवकोट नारायणाच्या घरी त्याच्याच समोर श्रीमनमहानारायणाची पूजा करण्यात आली. सर्वसाक्षी स्वतः साक्षी होता. विधिवत पूजा संपन्न झाली. आमंत्रित मंडळींच्या भोजनाचा समारंभ उरकला. सर्वजण भोजनोत्तर वार्तालाप करत आहेत. त्यात अर्जुन आपला मानस व्यक्त करतो. " हे वसुदेव मामा आणि देवकी मामी, आता माझ्या नियोजित एक तपाच्या यात्रेतील एक संवत्सर बाकी आहे. तो एक संवत्सराचा कालावधी पुष्कर क्षेत्री व्यतीत करून, ततपश्चात तिथूनच इंद्रप्रस्थास प्रस्थान करीन. म्हणून मी आणि सुभद्रा उद्याच येथून प्रयाण करू. आज्ञा द्यावी." भावविभोर वसुदेव आणि देवकी अर्जुनाच्या समीप आले आणि वसुदेव हात जोडून अर्जुनाला म्हणाले " हे अर...