नाथांचा जोगवा आणि त्याचा भावार्थ लेख ३ (कडवं ३) नाथमहाराज जरी भारुड, जोगवा यामधून आसूड ओढत असले तरी, त्यांची मूळ प्रवृत्ती, समाजावर प्रेम करून, समाजाला, सर्व प्रकारच्या वाममार्गातून, सहजपणे, भक्ति मार्गी बनवण्याची आहे. म्हणूनच त्यांचं संपूर्ण वाङ्मय हे ज्ञान देऊन, जाणिवांवर घण घालून, त्या जागृत करून, समाजाला भक्तीरसाची अद्भुतता पटवून देण्यात, धन्यता मानतं. त्यामुळेच, नाथमहाराज हे, चूक काय हे सांगून थांबणारे नुसते निरर्थक टीकाकार नाहीत, तर काय करणं गरजेचं आहे, जे केल्याने, झालेल्या चूका सुधारून, आत्मा सन्मार्गावर जाईल, हे सांगणारे ऋषितुल्य व्यक्ती आहेत. नवविध भक्तिच्या करीन नवरात्रा । ईश्वरप्राप्तीसाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. कर्म, ज्ञान इत्यादी अनेक. पण त्यासर्वांमध्ये, स्वतः भगवंतांनीसुद्धा, ज्या मार्गाचा विशेषत्वाने गौरव करून,ज्या मार्गाला श्रेयस्कर म्हणून उपाधी देऊन, प्रत्यक्ष श्रीमद्भागवद्गीतेत पुरस्कारित केलं आहे, तो मार्ग म्हणजे भक्तीमार्ग. हे भगवंताचं विशेष प्रेम लाभलेलं अपत्य आहे. वेद शास्त्र पुराणं यांनी ईश्वरप्राप्तीसाठी, भक्तीच्या अनेक मार्गांना संकलित...