Skip to main content

अध्यात्म विराम ७७

अध्यात्म विराम ७७
 
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।।

जो भक्त अनन्य भावाने नित्य त्या एकस्वरुप ईश्वराच्या चिंतनात आपलं देहाचं आणि बुद्धीचं दुःख, दैन्य, भोग, सुख,उपभोग हे सर्व विसरून, त्याच्या उपासनेत नितनित रममाण असतो, त्याबद्दल भगवंत वचन देतात आणि सांगतात की,असे जे नित्याभियुक्त आहेत, त्यांच्या विषयी अत्यंत प्रेमपूर्वक पुढील वचन देतात. पण त्या आधी नित्याभियुक्त म्हणजे काय हे जाणून घेऊ. 

या शब्दाचा निश्चित अर्थ असा आहे की,पहिल्या श्लोकात सांगितलेल्या गुणांनी युक्त असे जे आहेत त्यांना म्हणतात नित्याभियुक्त.म्हणजे जे फक्त ईश्वराला अनन्य भावे शरण जाऊन, त्या एकाच स्थानी आपली निष्ठा अखंड राखून, त्या चरणी आपली चित्तवृत्ती वाहून,त्यांनाच आपलं सर्वस्व मानतात आणि आपल्या सर्व चिंता आणि सुख दोन्हींच्या पार जातात, आणि नित्य भगवत चिंतनाची उपासना करतात, ते असतात नित्याभियुक्त. 

अश्या नित्याभियुक्त भक्तांपैकी एक म्हणजे स्वतः अर्जुन. जो ईश्वराचा सखा होता आणि ईश्वर त्याचा सखा. ही सख्य भक्ती या अनन्यतेनेच साध्य होते. ती अनन्यता अर्जूनाकडे होती. कारण त्याने आपले सर्व भाव, त्या एका कृष्ण चरणी वाहून, मात्र आपलं निज कर्तव्य करण्याचं कर्म करून, आपलं हित व अहित हे सर्व पूर्ण आयुष्यभर, क्षणोक्षण, नित्य त्या कृष्णरुप इश्वरावर सोपवून, त्या ईश्वराला आपला श्वास मानलं. 

ही नित्याभियुक्तता जी भगवंतांना अभिप्रेत आहे, ती अर्जुनाकडे होती. किंबहुना आपल्या आयुष्यातील एकही क्षण अर्जुनाने स्वतःचा, स्वतःच्या हित अहित यांचा, क्षेम कुशल यांचा विचार केला नाही.जीवनातील सर्वात सुखाच्या किंवा सर्वात भोगांच्या व दुःखाच्या काळातही, अर्जुनाला आपला सखा असलेल्या ईश्वरावर पूर्ण विश्वास, श्रद्धा आणि भरवसा होता. आपलं ध्येय व साध्य हे साधण्याचं कर्म करताना, त्यात कोणत्याही प्रकारची उणीव, कमतरता, कसूर राहणार नाही, इतकचं पाहण्याचं, त्याचं कर्म तो करत होता.

पण मनामधे, आत्म्याला हे ठाम माहीत होतं की, आपलं क्षेम कुशल, आपला सखा श्रीकृष्ण याच्यावर सोपवल्या नंतर, पुन्हा आपल्याला आपल्या क्षेम कुशल याची चिंता स्वतः वाहण्याची आवश्यकता नाही. याच वृत्तीला, विश्वासाला आणि नियंत्यावर सर्व सोपवून आपण फक्त त्याचं स्मरण करण्याचं कर्म आणि कर्तव्य करत राहणं, याला नित्याभियुक्तता म्हटलं गेलं आहे इतकचं करणं भक्ताच्या दृष्टीने श्रेयस्कर आहे. किंबहुना आपण तितका ठाम विश्वास त्याच्यावर ठेवल्यानंतर जे घडेल ते त्याच्या इच्छेने, प्रेरणेने घडेल, हे जाणल व मानलं पाहिजे.

त्याचप्रमाणे, घडलेले सर्व, घडणारे सर्व, हे अंतिमतः आपल्या हिताचेच घडेल, यावर सुद्धा आपला ठाम विश्वास असावा. याच विचार, वृत्ती व कृतीला नित्याभियुक्तता, असं स्वतः भगवंतांनी संबोधलं आहे. अश्या नित्याभियुक्त जनांच क्षेमकुशल वाहण्याचं वचन ईश्वराने दिलेलं आहे. सख्य भक्तितील या विषया संदर्भात आपण अजून सखोल ज्ञान प्राप्ती पुढील चिंतनात करून घेऊया. कारण सख्य हे एकतर्फी असतं नाही आणि क्षेम कुशल किंवा ईश्वर प्रणित योगक्षेम म्हणजे नक्की काय, यावर आलं उद्याच्या भागात, पुढे चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१६/०१/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...