Skip to main content

मुरली  - २१

(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - २१

नारद वदले

" भगवान पुरुषोत्तम, मी आपली ही अवस्था पाहू शकत नाही आणि पाहू इच्छितही नाही. हा मी आता जातो आणि राधेला आपली ही अवस्था सांगून आपल्याला वाचनातून मुक्त करण्यास सांगतो. आपण फक्त आज्ञा द्यावी भगवन"

यावर कृष्ण म्हणाला

"नाही नारदा नको. या मानवी देहातील घडणाऱ्या गोष्टी आणि मनाच्या या भावावस्था आम्हाला अनुभवू देत. कारण आमचा जन्म त्याचसाठी आहे. ही अगतिकता , ही अनिश्चितता, ही घालमेल, मैत्रितील ही त्यागाची उच्चावस्था, आपल्या सख्यासाठी किंवा सखीसाठी करावी लागणारी धडपड, मैत्रितील देण्याचा आनंद आणि त्या बदल्यात काहीही अपेक्षा न ठेवता आपल्या प्रिय व्यक्तीला फक्त आनंद वाटणं, लुटून उधळण हे किती मनोवेधक आहे हे फक्त या देही आल्यावरच समजू शकल. किंबहुना या देही येण्याच्या अनेक कारणांपैकी हे सुद्धा एक कारण आहे, नारदा. "

" प्रभू तुमचीच माया आणि तुम्हीच त्यात बद्ध हे बघवत नाही, म्हणून न राहवून आलो. त्याबद्दल क्षमस्व देवा."

" माया ही बद्ध करणारी आहे हे खरं आहेच. पण काही काही वेळा ही बद्धता हवीहवीशी वाटते. ती बद्धता, मुक्ती अथवा मोक्ष या पेक्षाही मनास भावणारी असते.  यातून  बाहेर यावस वाटत  नाही, नारदा. कदाचित ही अवस्था मुमुक्षु आणि ज्ञानी यांना समजणार देखील नाही . पण आम्हाला ती समजली आहे, भावली आहे आणि ही चिंता मनाला एक हळुवार आनंद देते आहे. म्हणून यात काही काळ राहून आनंद घेऊ देत"

"पण मग हा खेळ संपेल की असाच चालणार"

" ते फक्त त्या जगनियंत्याला माहित आणि काळालाच"  कृष्ण हसून म्हणाला

" नारायण नारायण आता फक्त बघत राहणं हा एकच पर्याय दिसतो. येतो यदुवीर , रुक्मिणीनाथ "

अस म्हणून नारद अंतर्धान पावले.

अर्थात हे घडलेलं कोणालाही समजलं नाही. कारण देहात असून आत्मतत्वाचा आत्मतत्वाशी संवाद हा पंचमहा तत्वातीत असल्यामुळे, जडदेहाला कळणं दुरापास्त आहे. म्हणूनच तो फक्त दिव्य चक्षुनीच दिसू शकतो अथवा तपसामर्थ्याने .

ब्रम्हर्षी अंतर्धान पावले.  पण कृष्णाला  पुन्हा मूळ प्रश्न सतावू लागला. मंडळी प्रवासाच्या टप्प्यात द्वारकेजवळ येऊन पोहोचली होती.  पण दिवस उतरणीला लागला असल्यामुळे आता प्रवासात एक मुक्काम करणं गरजेचं होतं. म्हणून दादांनी कृष्णाशी चर्चा करून सर्वांना पुन्हा एका गावाचा आडोसा घेऊन थांबण्याची आज्ञा दिली. सर्व लवाजमा थांबला.

भोजनोत्तर सर्व मंडळी , सर्व प्राणीमात्र निद्रेच्या आधीन झाले. नेहमीप्रमाणे दादाने आस्थेने कृष्ण निजलेला पाहिलं आणि मग आपण निद्राधीन झाले. आजूबाजूचं समस्त विश्व शांत झालेलं असताना मधुसूदन मात्र अस्वस्थ आणि चिंतेत होता,  शरीराने जरी या जागी असला तरीही मनाने तो राधेची भेट आणि आपली मुरली याच चिंतेत ग्रस्त होता.

अर्थातच आकाशस्थ ब्रम्हर्षी नारद नारायणाच्या चिंतेत चिंताग्रस्त होते आणि अगतिक प्रभू आज्ञा नसल्यामुळे काहीही करू शकत नव्हते.

नारायण नारायण नारायण

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले

श्रीकृष्ण

#PrasannaAthavale

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...