Skip to main content

मुरली - ४६

(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)

मुरली  - ४६
 
" माते आपण क्रुद्ध न व्हावे, हीच प्रार्थना आहे.  तर, इतके विचारताच भगवंत रुष्ट झाले आम्हांवर आणि पुन्हा समोर येऊ नका, अशी आज्ञा सुद्धा केली."

देवी रुक्मिणी हसू आवरत म्हणाल्या 

"पण आपणास ही धिटाई सांगितली होती कोणी.  तसही आपले तारणहार हे कधीही कोणाच्याही ताब्यात राहात नाहीत. ते स्वयंसिद्ध आहेत."

" हो ते फक्त भक्तांच्या हृदयात वास करून असतात म्हणूनच आम्ही ही धिटाई केली."

" बर ही चर्चा नंतर करूया. आपली आमच्याकडून काय अपेक्षा आहे ते कथन करा. आज काहीही बोलण्याची संधी आणि समय मिळणार नाहीये, नन्तर."

" हो माते. ऐकावं. प्रथम यदुवीर का उदास आहेत हे शक्य झाल्यास जाणून घ्या आणि त्यानंतर आमच्यावरील त्यांचा रोष जर शांत करता आला तर पहावं. इतकीच अपेक्षा आहे आपल्याकडून. माते आपण त्यांच्या जन्मजन्मांतराच्या साक्षी आहात आणि भगवंत आपल्या शब्दाबाहेर नक्कीच नाहीत. याचा आम्हाला ठाम विश्वास आहे. तेव्हा आमच्या आशा आपल्यावर आहेत.  आज्ञा असावी. मी आपल्याला सर्व कार्य यथास्थित पार पडल्यावर येऊन भेटतो."

" आम्ही प्रयत्न करून बघतो. पण निश्चित आश्वासन देऊ शकत नाही. आपण श्रीकृष्णांना जाणता. म्हणून सांगितलं. या आपण."

देवी रुक्मिणी यांच्याशी वार्तालाप करून  नारद महालाबाहेर येतात. इकडे देवी सत्यभामेच्या महालात गेलेला कृष्ण काही क्षणातच महालातून काहीश्या नाराजीने निघतो. तसेच देवी रुक्मिणी यांच्याही महालातून लगोलग बाहेर पडला. या सर्व प्रकाराने देवर्षी नारदांची भीतीने पार त्रेधा उडून गेली. आपल्या खांद्यावरील उपरण्याने कपाळावरील घर्मबिंदू पुसून पुढे काय होणार याविषयी त्यांना अजूनच भीती वाटायला लागली. प्रथमच काय करून बसलो याविषयी संदेह निर्माण झाला, त्यांच्या मनात. त्यांनी नारायण नारायण याचा धावा सुरू केला आणि अर्थातच माता लक्ष्मी  यांचासुद्धा.

याच मनःस्थितीत ते देवी रेवती यांच्या महालाकडे निघाले. श्रीकृष्ण त्वरेने दादाच्या महालात गेले. तिथून दोघे काही निर्णय घेऊन कार्याच्या पुर्ततेसाठी, पूजेची तयारी झाली होती त्या प्रासादातील  सभागृहात, जाण्यासाठी  निघाले. जाताना दोघांच्यात हास्यविनोद व चर्चा देखील होत आहे , हे नारदांनी पाहिलं आणि त्यांचा संभ्रम अजून वाढला. म्हणून त्यांनी ठरवल्याप्रमाणे देवी रेवती यांच्या महाली न जाता, पूजा जिथे आयोजित केली आहे, त्या ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला.

© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले

श्रीकृष्ण

#PrasannaAthavale

Comments