Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ३

श्रीरुक्मिणी स्वयंवर ३

llश्रीगणेशाय नमःll 
    llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll

 कित्येक दिवसांच्या यात्रेनंतर विप्रवर पैठणच्या पवित्र भूमीत पोहोचले. अर्थातच नाथांचं घर सापडायला अजिबात अवकाश लागला नाही. नाथांच्या घरी नित्य अतिथी येणं जाणं असल्यामुळे, २,४ माणसं सहज खपून जात.  नाथानी आपल्या परंपरेनुसार विप्रवरांची पाद्यपूजा करून त्यांना स्नानादी आन्हिके उरकून त्वरेने भोजनास येण्यास विनंती केली.

नाथानी सांगितल्या नुसार मदनराव सर्व नित्य कर्मे उरकून भोजनासाठी आले खरे, पण आल्यापासून त्यांचं चित्त काही थाऱ्यावर नव्हतं. नाथानी त्यांना विनंती केली की, आपल्या साठी संपूर्ण पंगत खोळंबली आहे. तेंव्हा आपण त्वरित भोजन सुरू करा, जेणेकरून इतर अतिथी आणि समस्त गृह भोजन सुरू करेल. पण विप्रानी नाथांना भलताच आग्रह धरून आश्चर्यात पाडलं होतं.

आचार्य म्हणाले

" यजमान आपल्याकडे श्रीखंड्या नामे असलेल्या व्यक्तीची आम्हास भेट घडवून द्या त्यानंतरच आम्ही भोजनास प्रारंभ करू"

यावर नाथमहाराज म्हणाले

" विप्रवर आपण आधी भोजन करून घ्या, आधीच भोजनाची वेळ टळून चालली आहे.  श्रीखंड्या इथेच कुठे कामानिमित्त गेला असेल. येईल तो इतक्यात. आला की होईल भेट.  पण आपण भोजन करून घ्या."

परंतु विप्रवर हट्टाला पेटले. नाथानी शेवटी हात जोडून विनंती केली की आपण खरच कोण आहात आणि हा काय हट्ट आहे, त्याचा कृपा करून खुलासा करावा आणि श्रीखंड्याचं दर्शन आपल्याला का हवंय, तो कोणी आपला नातेवाईक वा ओळखीत आहे का की आपल्या गावाचा. पण बारा वर्षांपूर्वी तो आला तेंव्हा त्याने या मर्त्य लोकांत आपलं कोणीही नाही असं सांगितलं होतं"

नाथानी हे सांगताच विप्रवर मदनराव शर्मा कोसळले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या. भूमीवर बसल्या बसल्याच हात जोडून नाथाना साश्रु नयनांनी आणि भावपूर्ण आवाजात म्हणाले

" महाराज अहो तो आमचाच नव्हे तर, तर, समस्त जगताचा सहृद आणि कर्ता धर्ताच नव्हे तर स्वामी आहे. नाथमहाराज तो श्रीखंड्या दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहेत."

हे ऐकलं मात्र नाथ भूमीवर पडले आणि मिळालेल्या धक्क्यातून सावरत विप्रवरांना म्हणाले,

" पण आपण हे सारे कसे जाणता".

विप्रवर मदनराव शर्मा आणि नाथमहाराज दोघेही साश्रु अवस्थेत आहेत. समस्त अतिथीवृंद आणि घरातील मंडळी जमा झालीत. विप्रवर सांगत आहेत.

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll

ll श्रीएकनाथमहाराज की जय ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणामस्तू ll

२९/११/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...