Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर २० (त्रितीय प्रसंग समाप्त )

श्रीरुक्मिणी स्वयंवर २० (त्रितीय प्रसंग समाप्ती) 

llश्रीगणेशाय नमःll

  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
श्रीकृष्णाचे हे मधुर वाणीतील वचनबोल ऐकून द्विजवर अति संतोष पावला. हर्षाने त्याचा गळा दाटून आला. कंठातून स्वर बाहेर पडेना, इतुके अश्रू त्याच्या लोचनातून ओघळू लागले. पण कार्य महत्वाचं आणि शीघ्र आहे हे जाणून , आपले अश्रू आपल्या उपरण्याला पुसत श्रीकृष्णास वदला.

" हे प्रभू आपल्या वाणीने मी संतोषलो आहे.  विदेह अर्थात विदर्भ देशाचे राजे भीमक हे अत्यंत नितीवान, गुणवान व पुण्यवान आहेत. प्रत्यक्ष प्रजपतीसमान कर्तव्यदक्ष, बृहस्पतीसमान ओज, तेज व बुद्धिमत्ता आणि शतसुर्याला देखील लाजवेल अशी प्रभा. त्यांच्या गुणांचे वर्णन करण्यास शब्द कमी आहेत. वैराग्य आणि विवेक यांचा अनोखा संगम, भागवतधर्माच्या कार्यात सदैव तत्पर आणि सात्विकतेची मुर्ती , असे राजा ज्या भूमीवर राज्य करत आहेत त्या भूमीतून मी आलो आहे. 

हे श्रीकृष्ण , त्यांची कन्या , जी पांचा बंधूंच्या पाठीवर जन्माला आलेली,  प्रत्यक्ष श्रीमहालक्ष्मीसम तेज आणि सौन्दर्य असलेली, कुळशीलाचे महत्व जाणणारी , सर्वगुण संपन्न, तिन्ही लोकांची बुद्धिमत्ता एकत्र केल्यावर प्राप्त झालेली बुद्धिमत्ता  आणि आपल्या भक्तीत लीन , नव्हे आकंठ बुडालेली अशी भीमकी अर्थात देवी रुक्मिणी, आहे हे भगवान आपण आपल्या कार्याने तीज मोहित केले आहे. आपल्याप्रति तिची श्रद्धा ही भक्तीच्या पलिकडे अर्थात प्रीतीप्रत पोहोचली आहे. " 

कृष्णरायाने येथे सूचक स्मित केले. द्विजवर पुढे कथन करत आहेत.

" प्रत्यक्ष राजा भीमक हे देखील आपल्या सतकीर्तीच्या प्रभावाने मोहित आहेतच. त्यांनीदेखील मनाने आपल्याला त्यांची कन्या देण्याचे योजले आहे. " 

हे विधान म्हणजे श्रीकृष्णाच्या पोटात व मनात असलेलीच गोष्ट द्विजवर वदता झाला. त्यामुळे हर्षभरीत होऊन श्रीकृष्णाने द्विजवराची पाठ थोपटली आणि त्याच्या बोलास मूक संमती दिली. याच ठिकाणी द्विजवराच्या चर्येवरील भाव बदलले , जे पाहून श्रीकृष्णाने त्यास आश्वस्त केले आणि पुढील कथन करण्यास सांगितले. द्विजवर पूढे बोलले.

" हे यदुवीर, परंतु देवींचा ज्येष्ठ बंधू , रुक्मि , हा स्वतः या निर्णयाविरुद्ध आहे. त्याने बळजबरीने देवी रुक्मिणीचा विवाह, राजा शिशुपाल याजबरोबर, करण्याचे योजले आहे. नव्हे तसे योजूनच तो थांबला नाही , तर , त्याने हे कार्य तडीस नेण्यासाठी परवाचा मुहूर्त धरून कार्य ठरवलेदेखील  आहे. यास्तव देवींनी आपल्याकडे मज , हे संदेशपत्र घेऊन पाठवले आहे. आपण ते वाचून, आपल्या सद्विवेकबुद्धिनुसार सुयोग्य तेच करावे, ही माझी आपणास विनंती आहे. " 

इतके बोलून विप्रवराने आपल्याकडील गाठोड्यात सुरक्षित  दडवून ठेवलेले भीमकीचे पत्र अर्थात संदेशपत्रिका श्रीकृष्णाला अर्पण केली.  ती कुंकुमार्जित जरतारी काम केलेली अतिसुंदर पत्रिका हातात येताच श्रीनाथ अतिहर्षित झाले.  त्यांनी त्या पत्रिकेचे त्वरेने चुंबन घेऊन सूचक विचार प्रकट केला. जणू त्या पत्रिकेच्या माध्यमातून जीवाशिवाची भेट पुनः या युगात जाहली, हाच भास प्रतीत होत होता. काळालादेखील याच दृश्याची प्रतीक्षा द्वापारयुगामध्ये होती. या अति रोमांचित दृश्याने ब्रम्हादीक देव , सुरवर , इंद्र , वसू सर्व भारले गेले. प्रत्यक्ष श्रीकृष्ण आणि श्रीलक्ष्मीरुप  देवी रुक्मिणी यांचा स्नेहबंध जुळलेला तो क्षण साक्षीरुप पाहण्याचे सदभाग्य भुवर फक्त द्विजवराला प्राप्त झाले होते. आकाशस्थ देवता, गंधर्व आदी या दृश्याने तृप्त झाले. श्रीकृष्णांनी ते पत्ररूप पत्रिका उघडली आणि वाचनास आरंभ केला. 

या ठिकाणी त्रितीय प्रसंग समाप्त होत आहे. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

१८/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...