Skip to main content

पुरुषांनी घ्यायची काळजी

घरात वावरताना वा काम करताना पुरुषांनी घ्यावयाची काळजी.!!! 😀😀😃😃😂

घरात वावरताना पुरुषांनी घ्यावयाची काळजी, मशीनगनच्या रेंजमध्ये न येण्याकरिता.  या सर्व गोष्टी गृहमंत्री (घरातले अमित शाह) निजले आहेत आणि तुम्ही काही शोधाशोध वा काम करत  आहात हे गृहीत धरून लिहिलेलं असलं तरीही गृहमंत्रीजागे असतानासुद्धा हीच काळजी घेतल्यास नुकसान ( शारीरिक व मानसिक) कमी होऊ शकते. पण गॅरंटी नाही.  (हा लेखातील गोष्टी ज्याने त्याने आपल्या जबाबदारीवर कराव्या) 

१. एखादी मोठी वस्तू , जसं मोठा डब्बा, मिक्सरच भांड वगैरे, विशेषतः काही खाण्याचे पदार्थ शोधताना, डब्ब्याचं झाकण , त्या शेजारचा डब्बा वा रॅकवरील इतर वस्तू, यातलं काहीही खाली पडणार नाही याची काळजी घ्यावी. पडलीच तर  हातातील वस्तू सोडून पडणारी वस्तू धरायला जाऊ नये. अन्यथा होणाऱ्या नुकसानीला लेखक जबाबदार नाही. 

२. सर्वात काळजी सकाळी चहा बनवत असाल (रविवारी, कारण आपल्याला एरवीपेक्षा जास्त लवकर चहा प्यायची तल्लफयेते  म्हणजेच किडा जागा होतो) , तर घ्यावी लागते. कोणत्याही छोट्यातल्या छोट्या वस्तूचा आवाज होता उपयोगी नाही. याबाबत कोणत्याही भ्रमात राहू नये,की Ac चालू आहे, बेडरूमचं दार बंद आहे, कारण गृहमंत्र्याचे कान अतितीक्ष्ण असतात , हे ध्यानात ठेवावे. आणि यदाकदाचित आवाज झालाच तर अतिवेगात बाल्कनी वा दुसरी खोली येथे पसार व्हावे. जेणेकरून गृहामंत्र्यांना वाटेल उंदीर पाल असावी.फक्त हा पळ, लहान वस्तू जसं चमचा वगैरे पडून आवाज झाला असेल तरच. कारण ती तुम्हाला माहीत नसलं तरी त्यांना या प्राण्यांच्या ताकदीचा अंदाज असतो. 

३. चहा करताना दुधावर विशेष लक्ष द्यावे. उतू जाण्याआधी नीट बंद करावे. गृहमंत्र्याचे नाकही अत्यंत तीक्ष्ण अवयव आहे. चहा जास्त उकळला तरीही त्याचा वेगळा वास येतो, जो त्यांनाच कळतो. तस्मात काळजी घ्यावी. 

४. रविवारी वा इतर सुट्टीच्या वारी सकाळी सकाळी , फिरायला जायचा किडा आल्यास, आवाज न करता सर्व तयारी करावी. कोणताही आवाज करणारी वस्तू काढायची असल्यास बेत रद्द करून घरात मुक्काम करावा. अन्यथा दुरदर्शीपणा दाखवून दर शनिवारी रात्री झोपण्याआधीच सर्व तयारी करून बाहेरच्या खोलीत अर्थात हॉलमध्ये सर्व नेऊन ठेवावे. लॅचची आपली किल्ली घेण्यास विसरू नये. विसरल्यास तासभर परत येऊ नये. 

यात अजून बऱ्याच टिप्स आहेत पण पुढील लेखात. ( मलाही घरात राहायचं आहे😀😃) 

काही विशेष मुद्दे. 

वस्तू जसं दूध ,साखर, चहापावडर वा बनवलेला चहा, तूरडाळ, तांदूळ इत्यादी, काम करताना सांडल्यास सर्व साफसफाई चोख करावी. कचऱ्याच्या डब्ब्यात नीट टाकावी. म्हणजे सर्व पुरावे नष्ट करावेत. कारण एक दाणा साखर वा चहापावडर अथवा एखादं थेंब चहा वा दूध जरी सापडलं तरीही डब्बाभर सांडल्याचा आरोप सहन करावा लागेल. काचेचा ग्लास वगैरे तुटल्यास पूर्ण साफसफाई करून ठेवावी.  हे सर्व गृहामंत्र्यांची झोप होण्याआधी करावं.

त्यातून चोरी पकडली गेलीच  तर शहाजोगपणे वा गरीब कोकराप्रमाणे उभे राहून ऐकून घ्यावे. स्पष्टीकरण , कारण, कबुलीजबाब, खुलासा काही देण्याचा प्रयत्न करू नये उपयोग नसतो.😀😀😃😃 हे  ध्यानात असू द्या.

वरील सर्व गोष्टी अनुभवातूनच असतील असं न वाटल्यास , आपला अनुभव घ्यावा, विश्वास नसल्यास. 😀😀😃😃 

तळतीप : उलट अनुभव आल्यास माझे नाव कुठेही घेऊ नये, न जाणो तुमची पत्नी माझ्या पत्नीची मैत्रीण निघायची. आपल्याबरोबर मलाही लटकवू नये. 


©® लेखन : प्रसन्न आठवले
२३/१२/२०१९





Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...