Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर १०

श्रीरुक्मिणी स्वयंवर १०

llश्रीगणेशाय नमःll

  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
जगतपालकाचं हृदय आणि त्या हृदयाचा महिमा यावर वेद , उपनिषदे यांनी तर मौन बाळगले, अर्थात त्यांनाही या हृदयाचा ठाव आणि पार लागत नाही. जसे शून्यात विसर्जित झालेलं आकाश संथ जाहले आहे तसेच कृष्णाचे हृदय अत्यंत सावकाश गतीने जगताला अप्राप्त आहे. 

परंतु अश्या अप्राप्त हृदयात देखील संत सज्जन साधुजन यांनी देहाभिमान सोडून व वृत्तीशून्य होऊन प्रवेशच मिळवला असे नाही, तर हरीच्या या हृदयात त्यांचाच मुक्त वावर होताना दिसत आहे. कारण वृत्ती सांडल्या आणि अभिमान त्यागला की हरी कोणालाही सहजी प्राप्त होतो आणि हे गुह्य मात्र साधुसंताना सापडले आहे. ज्या आधारे ते हरीच्या हृदयाचे अखंडपणे व  मुक्तपणे संचारते दिसत आहेत. 

अश्या श्रीहरीच्या चरणांशी जे लिन होऊन राहतात अश्या संत महंत जनांना मोत्याप्रमाणे गुंफून त्यांचा मोतिहार करून असे गुणातीत जाहलेले संतजन यांना चरणांवरून उद्धरून आपल्या गळ्यात मोत्याप्रमाणे  हरीने धारण केलेले दिसत आहे. ज्ञानयुक्त आणि वैराग्यपूर्ण वृत्तीतून प्रकट झालेले कंठीमणी आणि त्यांचे तयार झालेले पदक हरीच्या गळ्यात शोभून दिसत आहे. सर्व जनांप्रति एकभाव , त्या भावातून प्रकटलेले हरीमन निर्मळ निजशांतीच्या वनात स्थिरावलेल्या अवस्थेतून घडलेल्या वैजयंती माळा हरीला अत्यंत शोभून दिसत आहेत. 

सर्व जगताच्या उत्पत्तीचे कार्यकारण असलेला ओंकार नाद जिथून प्रकटला तो हरीचा कंठ हेच वेदांचेही मुळपीठ असून, तिथूनच सर्व नादब्रम्ह त्रिकाळ प्रकटत असते. सर्व उपनिषदांचा रस काढून त्याचे सत्व पिळून काढले, ज्यापासून तयार केलेला कौस्तुभमणी हरीकंठी आपल्या तेजाने सुशोभित झालेला दिसत आहे.  

अतिप्रचंड गगनाच्या आकाराच्या गजाच्या विशाल शुंडासम महाशक्तीवान दोन वज्रबाहू, अतिपराक्रमी नारायणाला शोभत आहेत. पंचमहाभूते प्रकटोनी आली त्याचे प्रतीक असलेल्या पाच अंगुळी समस्त जगताचे अधिष्ठान असलेल्या तळहाताला जोडून त्याची वज्रमुठ जगतातील सर्वात कठीण आणि अजिंक्य शस्त्र आहे. 

सर्व जगतातील क्रियाशक्तींचे चार बाहू आणि त्या प्रत्येक बाहुत शस्त्र,  हरीच्या सामर्थ्याची प्रचितीच देत आहेत. या शस्त्रांची महती काय वर्णावी. तेजामध्ये अत्यंत तेजाकार, द्वैताची सतेज धार असलेले धगधगते चक्र, अरीच्या मर्दनात अत्यंत उद्धट आहे अर्थात ते अरी म्हणजेच शत्रू कोण हे न पाहता फक्त मर्दनाचे आपले कार्य चोख पार पाडते. ते चक्र एका हातात शोभते आहे. 

आकाशाप्रत वर्धित जाहलेला अभिमान क्षणात चूर्ण करू जाणेल अशी सर्वश्रेष्ठ गदा ही दुसऱ्या हाती विराजित आहे. निशब्दात शब्द साकार करणाऱ्या वेदांपासून घडलेला पांचजन्य शंख तिसऱ्या हाती सुशोभित आहे.  आपल्या भगवंताच्या भक्तीत अखंड बुडालेले आणि काम क्रोधादी रिपूना अभेद्य असे  भक्त जेंव्हा हरीला भक्तीसुमने अर्पण करतात त्यावेळी त्या भक्तांच्या पूजेस्तव हरीने हृदयकमळ आपल्या चतुर्थ हातात धरले आहे.  चारही वेदांपासून उत्पन्न माणके असलेली कंकणे आणि वेदांता पासूनच तयार झालेली आभूषणे हरीच्या बाहूंवर सुखेनैव विराजित आहेत. 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll

ll श्रीएकनाथमहाराज की जय ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणामस्तू ll

०६/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...