Skip to main content

श्रीकृष्ण नीति ६

श्रीकृष्ण नीति ६
(कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)

श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!

आपला मूळ कथाभाग सोडून, आज प्रथम श्रीराम व श्रीकृष्ण या भिन्नप्रकृतीच्या अवतारांविषयी लिहावं, असं वाटतंय. पौराणिक वाङ्गमयानुसार दशावतारातील अनुक्रमे ७ आणि ८ वे अवतार असलेले हे देव विशेष आहेत. याच कारण आधीच्या ६ अवतारांमधे ५ वा वामनरूपी आणि ६ वा परशुराम हे दोनच मानवरूपी होते. यात देखिल वामन आणि भार्गवराम हे दोन्ही अवतार संसार न केलेले होते. म्हणजेच ब्रम्हचारी या सदरात येणारे होते. तद्वत तुलना ही फक्त ७ व ८ या दोन रितसर लग्नकार्य करून अवतार कार्याचे उद्दिष्ट साध्य करणारे, प्रभुश्रीराम आणि श्रीकृष्ण, यांच्यातच होऊ शकते.

आता आपण या दोन्ही म्हणजेच श्रीराम व श्रीकृष्ण यांची साम्यस्थळे आधी बघुया : 

१. दोन्ही अवतार हे राजघराण्यात जन्म घेतलेले होते. कारण कृष्ण नंदाघरी वाढला तरी यादवराज श्रीवसुदेव यांचे पुत्र होऊन आलेले आणि प्रभू श्रीराम रघू कुलात अवतार धारण करून आलेले. 

२. दोघानाही राज्य भोग घेता आला. (श्रीरामांचा वनवासा नंतर, पूर्ण राज्याभिषेक होऊन, कित्येक वर्षे राज्यकारभार घडला) 

३. दोघानीही अनेक राक्षस रूपी दुष्ट शक्तिंचा विनाश केला.

४. दोघानीही कमीतकमी एका स्त्री राक्षसिणीचा निःपात केलाय, त्राटिका व पूतना.

५. दोघांचीही घराणी उच्च व मान्यताप्राप्त होती. राघूकुल आणि यदुवंश.

६. दोघांचेही विवाह स्वयंवराशी संबंधित आहेत (यातील भिन्नता नन्तर बघू)

७. दोघेही तितकेच पराक्रमी होते 

ही झाली ढ़ोबळ साम्यस्थळे . पण दोघांमधील भेद हे जास्त ठळक होते. आता भेद आहेत, ते येणेप्रमाणे :

१. श्रीरामाचं जीवन हे जन्मापासुन वनवासापर्यन्त सुखमय असच गेलय. श्रीकृष्णाचा जन्मच मुळात कारागृहात गुप्ततेने होऊन, तेथून लगेच प्रयाण गोकुळी आणि पुढील अनेक वर्ष आई वडिलांपासून ताटातूट होऊन, काही काळ जीवनप्रवास घडला. गोकुळात सामान्य स्थितीत बालपण. 

२. श्रीरामांचा जन्म ऐन उन्हाळ्यात मध्यान्ही आणि श्रीकृष्ण जन्मले ऐन पावसाळ्याची परिसीमा असताना मध्यरात्री. 

३. श्रीरामाना राज्य हे परंपरेने मिळाले वा मिळणार होते . श्रीकृष्णाना संघर्षाने मिळवावे लागले.

४. श्रीरामानी सर्व नात्यांचा आदर ठेवून एक आदर्श जीवन जगण्याचा सम्पूर्ण प्रयत्न केला. त्याला सुसंगत काळही तसाच होता. श्रीकृष्णाना कंस मामाच्या जाचातून जन्म आणि तदनंतर पूतना , शकटासुर व तृणासुर यांच्या, तसेच चाणूर आणि सख्खा मामां कंस यांच्या वधापासून सुरुवात करावी लागली. त्यानंतर सुद्धा उत्तर आयुष्यात आतेभाऊ शिशुपाल याचाही वध करावा लागला. त्यानी कोणतेही आदर्श जीवन न जगता व्यावहारिक वस्तुपाठ घालुन दिला. व्यक्तिशः मला तेच आताच्या काळाला सुसंगत अस वाटतं. 

५. रामायणाचं मुख्य व निर्णायक युद्ध हे रामचंद्रानी पत्नी सीता हिच्या सूटकेसाठी केलय. अर्थात त्यांच्यां अवताराचं परम उद्दिष्ट तसच होतं आणि रावण वधासाठी तेच अत्यावश्यक कार्य होतं. त्यानी त्यासाठी सैन्य जमा करून, स्वतः युद्ध करून, अंतिम विजय प्राप्त केला. पण महाभारतातील निर्णायक युद्धात, श्रीकॄष्ण मात्र पांडवांच्या हक्कासाठी आणि त्याना उद्युक्त करून, लढतं करण्यासाठी रणांगणात उतरले ते सुद्धा, कोणतेही शस्त्र हाती न घेता. 

६. त्याआधी स्वतः अनेक युद्ध केलीत, तरी सुद्धा या अंतिम युद्धात फक्त एका उत्तम सल्लागाराची भूमिका, त्यांनी पार पाडली. हे सर्वात कठीण कार्य आहे. आपण स्वतः एक निष्णात योद्धा असूनही आणि कोणतीही निवृत्ती वा वृद्धत्व नसताना स्वस्वीकृतपणें, युद्धात असूनही, अलिप्त राहणं अत्यंत कठीण आहे. जे त्यांनी केलं. स्वतः माणसाला अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचं सामर्थ्य आणि चेतना देण्याचा खुप मोठा आदर्श, श्रीकृष्णानी घालून दिलाय. किंबहुना लढत देण्यासाठी मानसिकता तयार केली. बाहेर राहून सर्व सूत्र ताब्यात ठेवली.

७. सम्पूर्ण आयुष्य श्रीरामानी आदर्श निर्माण करून आणि लोकांच्या मतांचा आणि परंपरांचा मान ठेवण्याचा पूर्ण यत्न केला. श्रीकृष्णानी असा कोणताही आदर्श वा परंपरा, यांचा फार बड़ेजाव न कराता, व्यावहारिक कसं वागावं, याचाच परिपाठ घालून दिला. रामानी आदर्श बन्धु है ब्रीद सार्थ केलं. पण श्रीकृष्णाने प्रसंगी बंधूच्या विरुद्ध जाऊन निर्णय घेतले किंवा वडील बंधुना त्यांच्या स्वतःच्या मनाविरुद्ध वागण्यास भाग पाडलं. कोणत्याही परंपरेचं अवडम्बर न माजवता, काळाला सुसंगत जीवन कसं जागावं, याचा आदर्श परिपाठ घालून दिला. हे विशेषतः द्वापारयुगाच्या समाप्तीला आणि कलियुगाच्या सुरुवातीला, याचा आदर्श घालून परंपरा आणि व्यावहारिकता यांचा सुंदर मिलाफ़ घालून दाखवला. 

जाता जाता बाबुजींच्या एका गाण्याची आठवण आली , जे यांच विषयाशी संबंधित आहे ' माना मानव वा परमेश्वर मी स्वामी पतितांचा , भोगी म्हणुनी उपहासा, मी योगी कर्माचा ' या गाण्यात हीच तुलना मांडण्यात आलेली आहे . 

आज पुरतं इथेच थांबतो, हाच भाग उद्या पुन्हा पुढे नेऊया. बघू काय काय सापड़तय या अध्यात्मरूपी व्यवहार ज्ञानातून . 
 
श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!

सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!

©® संकल्पना, संकलन व लेखन प्रसन्न आठवले (कॉपी राईट नोंदणीकृत लेखमाला)
०८/०५/२०२०
भाग षष्ठम समाप्त

ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ ॐ
श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री श्री

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...