Skip to main content

अध्यात्म विराम १०८

अध्यात्म विराम १०८

मुळातच माया ही स्वतः काहीच करत नाही. पण ती बुद्धीचे, मनाचे आणि परिस्थितीचे भ्रम, विभ्रम निर्माण करते आणि जीवाकडूनच सर्व कार्य घडवून घेता. त्यामुळे कर्म करणाऱ्या देहाला त्या यातना व कर्म फलं भोगावी लागतात.हा भ्रम इतका विचित्र असतो की,अनेक प्रकारचं ज्ञान उपलब्ध असूनसुद्धा, जीव या भ्रमात राहतो की, उपभोग व सुख हे मला माझ्या कर्माने प्राप्त होतं, पण जेंव्हा भोग येतात, दुःख येतं त्यावेळी हाच जीव आपली आणि आपल्या देह,मन व बुद्धी यांची जबाबदारी टाळून,ते सर्व,दैव वा नशीब या सोप्प्या विकल्पावर टाकून आपल्याला त्यातून, मुक्त करतो. 

हाच मायेचा खेळ आहे. अर्धा भाग माया भ्रमात ठेवते की तूच कर्ता आहेस या सुखाचा आणि अर्ध्या भागात माया, भ्रमात ठेवते की, हे दैवाचं दान आहे. स्वीकारा वा अव्हेरा, पण असतो, आपल्याच कर्मफलाचा भाग व हिस्सा. माया दुःखही देत नाही किंवा सुखही देत नाही. माया फक्त जाणिवांची केंद्रे भ्रमित किंवा मोहित करते. त्यानुसार त्या त्या परिस्थितीत मायाग्रस्त मन, तसतसा विचार करतं आणि त्याप्रमाणे निष्कर्ष काढून, मन व बुद्धी देहाला, वाचेला कार्याला लावते. हाच खेळ अनंतापासून अनंता पर्यंत सुरू राहतो. 

जीव अनेक देहात फिरत राहतो आणि सर्व देहात मागील आणि वर्तमानातील कर्मफलाचा हिशोब चुकता करण्या साठी आणि मायेच्या ताब्यात अडकत राहण्यासाठी जन्म मृत्यूच्या फेऱ्यात फिरत राहतो. माया दोन्ही प्रकारचे खेळ दाखवते. जेणेकरून, जीव पूर्णपणे देहाच्या कार्यात व बुद्धीच्या भ्रमात राहून, कायम मायेच्या आधीन राहील. सुख आणि दुःख दोन्हींचे भ्रम माया निर्माण करते. 

ईश्वराच्या अत्यंत समीप आणि ईश्वराच्या खेळाची सूत्रधार असलेली माया जीवाला का झुलवते, काय गुह्य आहे त्या मागचं आणि हा सर्व मायेचा खेळ ईश्वर साक्षीने का व कसा चालतो, 
यावर जरा विचार करूया. माया ही आदिमाया आहे आणि ती ईश्वर निर्मित आहे. मूलतः हे सर्व ब्रम्हांड आणि त्यातील कण अन् कण त्यानेच निर्माण केलेला आहे. पण त्यातील प्रत्येक गोष्ट ही नश्वर आहे. अगदी ब्रम्हदेवाचे आयुष्य सुद्धा किती आहे, याची गणना उपलब्ध आहे. अश्या परिस्थितीत फक्त ईश्वर निर्मित शक्ती व चेतना या दोनच गोष्टी आदिपासून अनंतापर्यंत आहेत 

म्हणजे प्रत्येक गोष्टीचं कार्यक्षेत्र व आयुष्य ईश्वराने नेमून दिलेलं आहे. अश्या परिस्थितीत ईश्वर निर्मित एक माया नामक शक्ती, आपलं चिरंतन अस्तित्व, काळाच्या कक्षे बाहेर टिकवून आहे. त्याअर्थी तिच्या मागे, ईश्वराची निश्चित कार्य योजना असणार आणि आहेच. ईश्वराला अभिप्रेत असलेलं आणि जीवाची परीक्षा घेण्याचं, अत्यंत महत्वाचं काम, माया नियमितपणे क्षणोक्षण अविरतपणे पार पाडते, ईश्वराच्या या खेळाची सूत्र व गणितं, ईश्वर प्रणित योजनेनुसार होत राहतील, याची माया दक्षता घेते. 

म्हणजे ज्यावेळी, ज्या गोष्टी ईश्वराला अभिप्रेत योजने नुसार व्हाव्या असं वाटतं असेल, त्यावेळी, ते कार्य, माया आपल्या शक्तीने, पण ईश्वरी प्रेरणेने, पार पाडायचं कार्य करते. थोडक्यात ईश्वराच्या या जगतातील चराचरात, ज्याप्रमाणे ईश्वराच्या अस्तित्वाचा अंश भरून उरलेला आहे. त्याचप्रमाणे, त्या त्या सर्व ठिकाणी मायेचासुद्धा अंश कणा कणात भरून राहिलेला आहे.मायेच्या अभावी या जगताच सर्व कार्य, यंत्रवत घडून आलं असतं. पण मायेमुळे, प्रत्येक जीवाला आपल्या कर्म फलाप्रमाणे घडण्याची बुद्धी, इच्छा होते व शक्ती प्राप्त होते. एखादी अकल्पनीय किंवा चुकीची गोष्ट आपल्या हातून घडून गेल्यानंतर आपण स्वतः बरेचवेळा मनात विचार करतो, अरे त्यावेळी मी असा कसा वागलो किंवा माझ्या हातून हे कसं काय घडलं. ही माया. 

मायेची महती व कार्य,यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. पण तोपर्यंत आपण ईश्वराच्या चिंतनात राहण्याचा प्रयत्न करत राहूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१६/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...