अध्यात्म विराम ९५
कालचा विषय थोडा पुढे नेऊया. थोडीफार प्रगती केलेले हे जीव, श्रवण व कीर्तन अर्थात ऐकून मिळालेल्या ज्ञानाने प्राप्त बुद्धी व मन यांच्या जाणिवेतून, त्या अति प्रगत ईश्वर नामक ब्रम्हांडाचं सूत्रसंचालन करणाऱ्या शक्तीची ओळख झाल्यामुळे, जागृतीच्या पुढील टप्प्यात आलेले असतात. अर्थात इथे येण्यास, त्यांचं स्वतःचं श्रवण व चिंतन कारणीभूत असतं. म्हणजेच मूळ कर्म यांचच असल्यामुळे, सुरुवातीला अंनावधानाने घडलेला हा योग, स्मरण या पायरीवर आणून ठेवतो. इथे देखील सुरवातीला आपसूकच घडलेलं स्मरण, पुढे मुद्दाम घडवण्यास, देह, बुद्धी व मन सुरुवात करतं.
पण इथे हे कर्म मुद्दाम घडण्यास, आपल्या कर्मासोबत, विधात्याच्यां कृपेचा किंवा करुणेचादेखील हातभार असतो किंवा असावा लागतो. अन्यथा जागृतीचा हा झरा, चुकीच्या ज्ञानाने व कर्माने, पुन्हा एकदा जीवाला मागे घेऊन जातो. त्यामुळे इथे ईश्वरकरुणा अत्यंत महत्वाची व जरूरीची आहे. इथे स्वहित, देहहित, हितासाठी काय आवश्यक आहे व काय अहितकारक आहे, याच्या जाणीवा जागृत होण्यास आरंभ झालेला असतो. पण कर्मात घडलेल्या चुका, कधी कधी अहित कारक गोष्टी वा कर्मे ही, देह, बुद्धी व मन यांच्याकडून करवून घेतात.
इथेसुद्धा सावरण्याची संधी मिळणं, बुद्धी व जाणीव होणं, हे आपल्याच पूर्व कर्मावर व ईश्वर किंवा सद्गुरू कृपेवर अवलंबून आहे. यातून स्वहित म्हणजे आत्महित की देहहित हा भेद सोडवता येण्यास सहाय्य होतं. हा भेद व हे द्वैत हाच मुख्य संघर्ष असतो. हा संघर्ष एका किंवा इथून पुढे अनेक जन्मात सोडवावा लागतो. कोणती गोष्ट किंवा कर्म करणं हितावह आहे आणि ते देहाच्या हिताचं आहे की आत्म्याच्या हिताचं आहे, या द्वैताच्या अडकण किंवा सुटणं यावर,आत्मजागृती किंवा अधोगती अवलंबून असते. याच ठिकाणी जीव अजाणता देह बद्धतां व आत्मजागृती यांच्या संघर्षात अडकतो.
याच ठिकाणी आपण स्मरण करत असलेल्या ईश्वरी शक्तीचं अर्चन, पूजन, व वंदन, या मार्गांचा सदुपयोग करून घेऊ शकतो. कारण हा संघर्ष असाधारण असतो व तो अनेक दृष्टीने दूरगामी परिणाम करणारा असतो किंवा असू शकतो. या संघर्षात कधी देह हिताचे व कधी आत्म हिताचे निर्णय घेऊन, कर्मे केली जातात. तीच कर्मे पुढे संचित रुपात जमा होऊन, फलदायक होण्यास साठवली जातात. विशिष्ट वेळी ती परिपक्व होऊन, फलरुपात समोर येऊन उभी राहतात.
आधीच द्वैतात असलेला जीव, आपल्याच फलरूप कर्मांना स्वीकारतो किंवा नाकारतो. नाकारून, तो त्यांची जबाबदारी, एकतर चुकीच्या खांद्यावर टाकून आपली वाट पुन्हा चुकतो किंवा स्वीकारून, आपल्याच कर्माच्या शिरावर ते ओझं टाकून, द्वैताच्या मार्गात थोडा अग्रेसर होतो. एक नक्की की, दोन्ही निर्णयात, भोगणं आहेच. मग ते नाकारून भोगण्यापेक्षा, स्वीकारून भोगणं इष्ट व हितकारक आहे, ही बुद्धी व जाणीव, आधीच्या कर्मातील सदकर्मे व भक्तीच्या प्रवासातील सहभाग यावर अवलंबून आहे.
विषयाची व्याप्ती इथेच विश्रांती घेऊन, उद्या पुन्हा सुरू करण्याची बुद्धी देत आहे. म्हणून आज इथेच थाबुया आणि उद्या पुढे सुरू करुया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०३/०२/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment