Skip to main content

गोग्रासवाडी (डोंबिवली) १५

गोग्रासवाडी (डोंबिवली) १५

दिवाळी , आठवणी, साठवणी, उत्साह, आणि मन

कायम, कायम , कायम जाताना इतकी हूर हूर लावून जातेस, जितका उत्साह वर्षभर वाट पाहण्यात घालवतो आम्ही. सर्व चारही दिवस आम्ही शोधलेला आनंद , उत्साह, जल्लोष, मजा सर्व पाचव्या दिवशी हिरावून नेतेस. अगदी लहानपणापासून बघत आलोय तुझ हेच रूप. चार दिवस खुप धमाल, नुसता आनंद आणि ......

चौथ्या दिवशी संध्याकाळीच सुरवात होते उजळणी चारही दिवसांची. अगदी पहिल्या दिवसापासून , नव्हे अगदी तयारीला  सुरवात जिथून केली तिथपासून उजळणी करायची, मनातला सर्व साठवलेला आनंद  बाहेर काढून पुन्हा बंद करून पुढील वर्षापर्यंत वापरायला ठेवायचा. किती किती गोष्टी , साध्या साध्याच त्या चार दिवसात केलेल्या, घडलेल्या, अनुभवलेल्या दडवून ठेवायच्या  मनात ,का तर त्या वर्षभर पुरवायच्यात. तू येणार नाहीस पुढल्या वर्षीपर्यन्त.

कधीतरी वर्षातून एकदाच आलेले पाहुणे, त्यांच्या येण्याची लागलेली चाहूल, त्यांच्या येण्यामुळे आलेला उत्साह, आणि त्यांच्या सोबत घालवलेले ते चारच दिवस हो फक्त चार दिवस पूर्ण वर्षातले, म्हणजेच ४भागीले ३६५  किती व्यस्त प्रमाण आहे . पण हा आनंद पुरवायचाय याच व्यस्त गुणोत्तराने, पुढे थोड़ा थोड़ा रोज चाखत, अगदी आईने लहानपणी दिलेल्या पाव चमचा मधासारखा.

किती स्वप्न बघायचो लहान असताना, की या चार दिवसात हे करू , ते करू, अस होईल, तस होईल, आणि नन्तर , नन्तरचे दिवस जातात जे नाही घडू शकलं वा राहिलं त्यांचेच हिशोब मनात मांडण्यात. आणि शोधण्यात आनंदाचे काही क्षण. काही सापडतात ,काही निसटून जातात. काहीच उरतात हातात, ओजळीत  आणि मनात.

आणि पुन्हा सुरू होत, रूटीन नामक रहाट गाडग जगात जगण्यासाठी.  पुन्हा मागे पडतात त्या आठवणी चार दिवसांच्या. पुन्हा मनाला रमवाव लागत, तुला नाही कळणार ते, कारण तू येणार चार दिवस आनंद देणार. तुला वाटत आम्ही विसरणार , या ज़गाच्या पसार्यात, तुला, तू दिलेल्या आनंदाला , उभारिला. नाही होत अस, लहानपणापासून गेलेल्या , साजऱ्या केलेल्या प्रत्येक हो हो प्रत्येक दिवाळीच्या आठवणी अजुन टिकवून आहोत मनात.

आणि तरीही पुन्हा नवरात्री संपली की तुझे वेध सुरु होणार आणि आम्ही अजुन उत्साहात तुझ स्वागत करणार. तसच , आणि पुन्हा साठवणार आठवणी पुढच्या दिवाळी पर्यन्त.

© लेखन : प्रसन्न आठवले
२३/१०/२०१७
०७:३८
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...