भोग आणि ईश्वर १६९
समाधान आणि आनंद या प्राप्त करण्यासाठी नाम आणि नाम घेत तोच आनंद आणि समाधान मिळत जाणं, या शुभंकर चक्रात, आपण कधी बसून पुढे जाऊ ते समजणार सुद्धा नाही. मुळात या जगात कलियुगात जन्माला येऊन, काही शुभ, पुण्यकारक कर्म आणि ईश्वराच्या स्मरणासारखं काही आपण करत आहोत , हेच खूप मोठं सद्भाग्य आहे या देही आल्याचं.
या जन्मात येऊन भोग आणि उपभोग या फेऱ्यात स्वकर्माने सापडून, अनेक जन्माचं संचित जोडत जोडत, अनेक देह धारण करत, पुढे जाताना, अनेक टप्पे अनेक अडथळे पार करत, वासना,माया यांच्या ताब्यात अडकत मार्गक्रमण करताना, सुटकेचा मार्ग, जो निदान या युगा साठी फक्त आणि फक्त ईश्वरस्मरण आहे, ते करण्याचं मनात योजून, ते साध्य करणं हे बुद्धीच्या आणि विवेकाच्या आधारावर मानवी देह प्राप्त करू शकतो.
आतापर्यंत मन आत्मा यावर आपण खूप बोललो, आज जो नश्वर म्हणतात त्या देहाबद्दल बोलू. नश्वर किंवा नष्ट होणारा आहे म्हणून, त्याचे फार लाड न करता, फक्त ईश्वर चिंतनाचं आणि स्मरणाचं काम करत राहावं, हे नक्कीच योग्य आहे. पण अनेक लक्ष योनी फिरून हा देह,ही बुद्धी, मनाची विचारांची ही शक्ती, देहाच्या माध्यमातून, एक देहरुप यंत्र, देवाने मानवाला हो फक्त मानवालाच दिलं. खरतर ही कल्पनाच इतकी विलक्षण आहे की,
बरेचदा मला या कल्पनेने अद्भुत वाटतं की, मी माझ्या या देहाने अचिंत्य, अद्भुत, अतर्क्य आणि गुह्य असं भौतिक जगा पलीकडील ज्ञान प्राप्त करून, त्याचा सदुपयोग करूनच, या देहातून जाताना पारमार्थिक वाटचालीत, संचिताची गाठोडी मोकळी करत करत, याच जन्मात शक्य तितक्या पुढे जाऊन, पुढील जन्माचा आपलाच मार्ग, सुकर सुलभ कसा होईल हे करण्यात व बघण्यात देह जावा.
कारण विधात्याने निर्माण केलेल्या व्यवस्थेनुसार आणि प्राप्त संचित आणि या जन्मातील शुभ अशुभ कर्माच्या बळावर किती केलं तरी, ते कमीच आहे.वास्तविक प्राप्त आयुष्यातील किती काळ, आपण जीवनात संसारात उभं राहण्यात घालवतो ते कळत नाही. आयुष्यात येणारी दुःख, सुख आनंद या सगळ्यात आपण मुख्य उद्देश विसरतो.
खरच कोणत्या उद्देशाने आपण या मानवी देहात आलोय, हे उमगत किंवा उमगत नाही. यामध्ये दिलेल्या श्वासांची चळत रिकामी होत जाते. कळत वा नकळत आपण आपल्याच या आणि पुढील जन्मांची घडी बिघडवत जातो, हे खरतर लक्षात येत नाही.
ज्या गोष्टींमध्ये गांभीर्याने लक्ष घालून, पुढील वाटचाली साठी म्हणजे पुढील जन्म आणि या जन्मातील संचित कमी कसं करावं, याचा खरतर विचार करावा. यासाठी प्राप्त प्रत्येक श्वासाचा सदुपयोग करावा, हे कळावं म्हणून अनेक संत, महंत, ऋषीमुनी, यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. मला बरेचवेळा असं वाटतं की, संसाराच्या रगाड्यात, आयुष्याच्या वाटेवर किती क्षण, वर्ष आणि युगातील कित्येक जन्म आपण वाया घालवलेत.
हे खरतर सांगायला परम ईश्वर मध्ये मध्ये आठवण करून देण्यासाठी आपणच दत्तगुरु, नवनाथ, सद्गुरू, महाराज, स्वामी, अश्या अनेक रुपात, आपणहून प्रकट होऊन मानवाला प्रत्येक युगात, प्रत्येक शतकात आपल्याकडे येण्याचा मार्ग सांगतो, दाखवतो, त्यावर वाटचाल करून उभा जन्म त्यावर खर्च करून, नामचं, ईश्वर स्मरणाचं निजकर्तव्य माणसाने कसं आणि का करावं हे सोदाहरण दाखवून देतो, तरीही आपण किती काळ नको असलेल्या वायफळ गोष्टीत वाया घालवतो, हे लक्षात येतं तेंव्हा, खूप उशीर झालेला असतो.
विषय मोठा आहे म्हणून उद्या हीच चर्चा पुढे सुरू ठेवू. तोपर्यंत क्षणसुद्धा वाया न घालवता नाम घ्या, आतील ईश्वराला साद घाला. कशी यावर उद्या विचार करूया.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून वा फोन करून संपर्क करावा.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१८/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment