भोग आणि ईश्वर १६०
एखादा आपत्तीचा वा विपदेचा काळ आला की, त्यावेळी आयुष्यात बऱ्याच विपरीत गोष्टी घडत जातात. सहज सुलभ वाटणाऱ्या क्षुल्लक गोष्टी सुद्धा कष्टसाध्य आणि अमूल्य वाटायला लागतात. न घडणाऱ्या घटना, अनिष्ट गोष्टी, अपघात, युद्ध, विषाणू, इत्यादी अनेक सार्वजनिक आपत्ती, या अश्या काळाचं प्रतीक असतात. नुकसान, वाईट घटना, ताटातूट, मोठ्या प्रमाणावर मृत्यू इत्यादी सर्व या काळात घडतं.
एरवी काही न घडणाऱ्यांच्या आयुष्यात, क्षणात उलथापालथ होऊन, अगदी होत्याचं नव्हतं होणारा, असा विचित्र काळ असतो. याला ग्रहस्थितीशी जोडण्यात येतं, कारण त्या काळात तशीच ग्रहस्थिती असते आणि त्याचा गुरुत्वाकर्षणीय परिणाम असेल किंवा त्याचा चुंबकीय परिणाम असेल. पण असा काळ प्रत्येक ठराविक काळानंतर येतोच आणि एखाद्या पिढीला धडा शिकवून जातो.
खरतर अश्या काळाचं काही मोजमाप कारणमीमांसा असं काही असणारच. कारण या विश्वात कारणाशिवाय आणि अयोग्य वेळी विधात्याच्या गणितात काहीही होत नाही. तरीही सर्व कर्माधिष्टीत आहे. म्हणजेच आता जो फेरा चालू आहे, ज्याला शास्त्रीय दृष्टीने एक विषाणू, ज्योतिषीय दृष्टीने विशिष्ट असं अनिष्ट ग्रहमान, राजकीय दृष्टीने एखाद्या राष्ट्राची कागाळी वा आगळीक, ऐतिहासिक दृष्टीने एक स्थित्यंतर असं सर्व एकाच वेळी जुळून येणं हा विलक्षण योगायोग म्हणावा लागेल.
कारणं वेगळी, तरीही परिणाम तोच प्रचंड प्रमाणात वित्तहानी, जीवितहानी सार्वजनिक नुकसान आणि याचे दूरगामी सामाजिक, राजकीय आर्थिक परिणाम, जे सारं जग अनेक वर्षे भोगत राहतं. परंतु असे उत्पात हे काही कारणांचा परिणाम असतात. ज्याला पुन्हा वेगवेगळ्या परिभाषेत मांडता येईल. आपण त्यातील एक भाग वा एक कारण मीमांसा बघूया. आपण आतापर्यंत हे जाणलं आहे की हे जग वा वातावरण, लहरींस्वरूपात सर्व गोष्टी परावर्तित करून त्याच लहरींस्वरूपात त्याचं फल प्राप्त करत जातं.
जगात गेल्या शंभरेक वर्षात अनेक प्रकारचे बदल अथवा उलथापालथ झाली आहे. पूर्वी साधी सरळ राहणी असल्यामुळे सकारात्मक वातावरण, शुद्ध चरित्राची व शुद्ध विचारांची माणसं, त्यायोगे शुद्ध, सकस व सात्विक विचार लहरी उत्पन्न होत असत. ज्याचा एकूण सामाजिक, राजकीय, आर्थिक, कौटुंबिक अश्या सर्वच पातळ्यांवर सकारात्मक परिणाम होत होता.
म्हणजेच माणसं सामान्यपणे पापभिरू, सकारात्मक, साधना व एकूणच धर्मकार्य करून, उत्तम ऊर्जा, सकारात्मक आणि सशक्त लहरी निर्माण करून, त्याचा एकूण समाजावर उपयुक्त परिणाम करून, सामाजिक स्वास्थ्य उत्तम ठेवणारी होती. म्हणूनच इतक्या राजकीय स्थित्यंतराचा समाजाच्या सांस्कृतिक विचार व मत यावर फारसा परिणाम न होता व्यवस्था चोख राहून, एकत्रित परिणाम सहसा सकारात्मक राहिला.
परंतु गेल्या सर्वसाधारण पन्नास ते सत्तर वर्षात एकूणच नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे, अशुद्ध विचार, संस्कृतीचा ऱ्हास करणारे विचार आणि अनिष्ट वैचारिक बैठक जास्त प्रमाणात, एकूणच जगात पहायला मिळू लागली आहे. ज्यामध्ये विध्वंसक विचार जास्त प्रमाणात जोपासले व वाढवले जाऊ लागलेत. याशिवाय वाढत्या संवादाच्या साधनांमुळे, जग जवळ येत गेल्यामुळे, या विषकारक विचार लहरी आपल्या आजूबाजूला पसरून संपूर्ण वातावरण दूषित करायला सुरुवात झाली.
या सदोष लहरींचा एकत्रित परिणाम गेल्या तीस ते पस्तीस वर्षात जास्त प्रभावाने जाणवू लागला आहे. त्यामानाने सकारात्मक लहरी कंपनं निर्माण करून, अश्या घातक लहरींना अटकाव करू शकतील, अश्या सकारात्मक व बलप्रधान लहरी, अनेक कारणांनी कमी उत्पन्न होऊ लागल्या.
याचा एकत्रित परिणाम खचितच नकारात्मक ऊर्जा, लहरी व दूषित व या लहरींनी प्रेरित वातावरण तयार होऊन, त्याचा अनिष्ट परिणाम बुद्धी, चेतना, कार्यक्षमता मानसिक क्षमता इत्यादींवर होऊ लागला. ज्याचा एकत्रित परिणाम आता पहायला मिळत आहे. यातून उद्भवणारी घातक व अशुद्ध विचारसरणी, सात्विक, शुद्ध व सकारात्मक विचारांना मारक ठरू शकते.
यावर अजून चर्चा उद्या करूया. आज इथेच थांबू.
नामात रहा, साधनेत रहा, विधात्याचा कृपाप्रसाद कधी आपल्यापर्यंत पोचेल हे विधातासुद्धा जाणत नाही. भेटूया उद्याच्या भागात पुन्हा एकदा.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून वा फोन करून संपर्क करावा.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०९/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment