भोग आणि ईश्वर १५६
म्हणजेच कालच्या चिंतनातून एक स्पष्ट होतं की, जीवासाठी ईश्वर आराधना ही श्रेष्ठ आणि गरजेची आहे.पण कोणत्या ईश्वराची हे शेवटी आपलं कर्म, त्या कर्माचं फलित आणि त्याद्वारे तयार झालेलं संचित यातूनच ठरतं. पण ते आपण आपल्या देहबुद्धीने मर्यादित हेतू साध्य करण्यासाठी ठरवतो आणि मग सुरू होतो तो व्यवहार किंवा अव्यापारेषुव्यापार. फक्त मर्यादित हित साध्य करण्यात आपण जन्म घालवून देही जीव धारणेचा आणि जन्मोजन्म फिरत असण्याचा मायेचा उद्देश सहजी साध्य करून देतो.
मर्यादित उद्देश म्हणजे काही व्यक्तिगत,सांसारिक आणि काही व्यावहारिक उद्देश. यात गैर की योग्य हा मुद्दा काही काळ बाजूला ठेवू. पण आपल्याला मर्यादित ज्ञानावर आधारित जे दिसतं वा हवं असतं, ते आपण साध्य करण्यासाठी त्या त्या शक्तीदेवतेची उपासना करतो आणि त्या त्या शक्तीला जागृत करण्याचा प्रयत्न करतो. त्या त्या शक्ती, त्या त्या श्रद्धा, भक्ती त्या त्या व्यक्तीच्या उपासनेच्या बलानुसार प्रेरित होऊन, सिद्धी वा मर्यादित सिद्धी देऊन कार्यात वा उद्देशात सफलता देतात देखील.
परंतु पुराणात जर आपण दाखले बघितले तर, अगदी असुरांनी सुद्धा एका वेळेला एकाच शक्तीची उपासना करून त्या शक्तीकडून इच्छित वरप्राप्ती करून घेतली आणि मग दुसऱ्या शक्तीप्राप्तीसाठी दुसऱ्या इष्टदेवतेच्या स्वरूपाचं ध्यान लावून तप केलं. म्हणजेच असुरांनीसुद्धा एकाच वेळी अनेक उपासना केल्याचे माझ्या वाचनात कुठेही आले नाही. सर्वांनी ब्रम्हां, विष्णू,महेश देवी इत्यादींची वेगवेगळी उपासना करून इच्छित हेतू साध्य करून घेतला. म्हणजेच कुठेतरी आध्यात्मिक अर्थाने तसे करण्यावर काही मर्यादा राहावी असा उद्देश सृष्टीकर्ता वा शास्त्र आणि मंत्र कर्ता यांचा असावा असा निष्कर्ष निघू शकतो. ही अध्यात्मिक बाजू झाली.
आता शास्त्रीय दृष्टीने विचार करूया. अश्या अनेक शक्तींना एकाच वेळी जागृत करून आपण त्या शक्ती प्राप्तीसाठीच्या लहरी वा कंपनं निर्माण करतो. शास्त्रीय दृष्टीने या विद्युत चुंबकीय लहरी असतात. त्या सकारात्मक जरूर असतात. पण काही मंत्रांच्या लहरी अतितीव्र तर काही कमी तीव्रतेच्या असतात. अर्थातच तीव्र क्षमतेच्या लहरी या कमी क्षमतेच्या लहरींना एकतर कापून पुढे जातील किंवा त्यांना आपल्यात सामावून प्रभावहीन करू शकतील. यावर भौतिक शास्त्राचा एखादा तज्ञ जास्त प्रकाश टाकू शकेल.
तरीही माझ्या मर्यादित ज्ञानानुसार हे नक्की सांगू शकतो की, एकाच वेळी अश्या वेगवेगळ्या क्षमतेच्या अर्थात फ्रेक्वेन्सीच्या लहरी वा कंपनं निर्माण करून त्यांना एखाद्या वास्तूत फिरत ठेवणं हे अयोग्य आहे. कारण शेवटी त्या चुंबकीय दाब असणाऱ्या शक्ती आहेत आणि त्या आपलं काम शास्त्रीय नियमानुसार करणार.
एक उदाहरण देतो म्हणजे कळेल. बरेचदा रेडिओवर एकाच बिंदूवर एकापेक्षा जास्तं रेडिओ स्थानकं लागतात आणि त्यात कोणताच आवाज स्पष्ट येत नाही. म्हणजेच तीव्र मध्यम व कमी फ्रिक्वेन्सीच्या कोणत्याच लहरी आपला आवाज वा कार्यक्रम त्या रेडिओ स्थानकावर पोचवू शकत नाहीत. अथवा पोचवतात पण रेडिओ त्या एकाचवेळी स्वीकारून गोंधळ निर्माण करतो.
म्हणजेच फ्रिक्वेन्सी तयार होऊनही त्याचा फायदा काहीही होत नाही. मागे मी एका लेखात म्हटल्याप्रमाणे मानवी शरीर हे एक फ्रिक्वेन्सी स्वीकारणारं आणि फ्रिक्वेन्सी तयार करणारं अर्थात frequency receiver and transmitter power station आहे. त्यामुळे अनेक लहरी एकाच वेळी निर्माण होऊन त्या तोलण्याची क्षमता यायला योग यागादी शास्त्रीय सिद्धता असणं जरुरी आहे.
त्यामुळे तशी क्षमता नसेल तर सर्व व्यर्थ जाऊ शकेल. किंवा वरील उदाहरणात राडीओची कार्यक्षमता कमी होऊन रेडिओ लवकर निकामी होण्याची शक्यता असते. म्हणून अध्यात्मिक दृष्टीने पाहता विशिष्ट उद्देशाने उपासना करताना ती एकाच इष्टदेवतेच्या शक्तीरूपाची करावी. अर्थात विनाउद्देश जर करत असाल तर मानसिक समाधानासाठी म्हणून ठीक आहे. परंतु एकाच उद्देशा साठी अनेक उपासना करू नयेत. त्यातून शास्त्रीय दृष्टीने पाहिलं आणि आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तरी गैर आहे. लाभ वा हानी हा ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार ज्याला त्याला प्राप्त होईलही, पण शक्यतो टाळावं. एक उद्देश एक उपासना, ती झाली की, दुसरा उद्देश व दुसरी उपासना असा क्रम वा prioritisation करून पुढे जावं, हे माझं व्यक्तिगत मत आहे.
मानसिक शांती व समाधान याकरता अनेक स्तोत्र, मंत्र इत्यादी म्हणणं हे वेगळं आहे. ते करायला हरकत नाही. पण काही विशिष्ट उद्देशाने करताना अग्रक्रम ठरवून घ्यावा व त्यानुसार एक एक करत पुढे जाणं हे योग्य आहे. कारण उद्देशप्राप्तीसाठी आपण संकल्प करून त्या शक्तीला बद्ध करतो.
उद्या नवीन चिंतन घेऊन पुन्हा भेटूया, तोपर्यंत नामात रहा ईश्वर स्मरणात रहा, ईश्वरी कृपेच्या लहरींच्या कक्षेत रहा.
अजूनही ज्यांना भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून वा फोन करून संपर्क करावा.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०५/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment