भोग आणि ईश्वर १८२
दोन्ही प्रकारची माणसं, अर्थात नकारात्मक व सकारात्मक, आपण मागच्या दोन लेखात पाहिली. त्यामुळे हा विषय संपला असं होणार नाही. कारण या दोन्ही प्रकाराच्या मध्ये काहीजण आहेत व असतात. ती म्हणजे नेहमी द्विधा मनःस्थितील व्यक्ती. म्हणजे जे नेहमी गोंधळलेले असतात. ज्यांना सर्वच बाजू योग्य वाटतात. त्यामुळे हे योग्य की ते यावर नेहमी त्यांच्या मनात खल अर्थात वाद चालू असतो.
या प्रकारातील लोकांना कोणतीही गोष्ट, कोणीही सांगितली की पटते. म्हणजे यांचं स्वतःचं मत काय आहे हे, यांना स्वतःला ठाम माहीत नसतं किंवा यांची ठाम भूमिका कधीच ठरलेली नसते. आपल्या विषया संदर्भात बोलायचं झाल्यास, नाम साधना, पूजाअर्चा इत्यादी विषयी आपण त्यांना जे सांगू ते यांना पटतं. त्यावर विचार करून, हे कार्य सुरू करतात.
सर्व सुरळीत आहे वा चालेल, या विचारात ते स्वतः असताना, एखादा दुखावलेला वा प्रसंगोपात अविश्वास निर्माण झालेला एखादा स्नेही यांना भेटतो. यांना आपण करत असलेली साधना वा नामस्मरण याबद्दल, खुंटा हलवून बळकट करायची इच्छा असते किंवा इच्छा निर्माण होते.
कारण यांचं स्वतःचं मत ठाम नसतं आणि कायम दुसऱ्याच्या मताचा टेकू यांना लागतोच लागतो.वास्तविक प्रत्येक गोष्टीत प्रत्येक वेळी, दुसऱ्याचं मत वा अनुमोदन घ्यावच, अस जरुरी नसतं. एखादी गोष्ट सकारात्मक परिणाम करणारीच असेल आणि ती केल्याने, अन्यथा आपलं काही नुकसान वा तोटा होणार नसेल तर, ती गोष्ट, ती कृती करायला काहीच हरकत नाही वा नसावी.पण द्विधा आणि दोलायमान मतं असणाऱ्यांना कायम असं अनुमोदन गरजेचं वाटतं. त्यासाठी ते कायम प्रयत्नशील असतात.
अश्या लोकांना, वर म्हटल्याप्रमाणे, जर एखादी नकारात्मक व्यक्ती भेटली आणि एकूणच अध्यात्म, नामसाधना इत्यादीं वर त्याने नकारात्मक किंवा विपरीत भाष्य केलं की, यानाही वाटायला लागतं की, खरच करण्यात काहीच अर्थ नाही. त्यानंतर ही लोकं, पुन्हा शून्यावर येऊन थांबतात. मग पुन्हा एकदा सकारात्मक व्यक्ती मिळेपर्यंत यांची गाडी तिथेच अडते. अश्या द्विधा व्यक्तित्वाना फक्त अध्यात्मिकच नव्हे तर आयुष्यात बऱ्याच गोष्टीत वा निर्णयात या मनःस्थितीमुळे नुकसान होऊ शकतं वा होतं.
मराठीत आपण ज्याला धरसोड वृत्ती म्हणतो,तशा स्थिती तील ही व्यक्तित्व, सतत काहीतरी गोंधळात असतात. यांच्या मध्ये पुन्हा दोन प्रकार आढळतात. एक म्हणजे जे फक्त स्वतःपुरता निर्णय घेतात आणि सुरू केलेलं सकारात्मक कार्य थांबवून मोकळे होतात. दुसरे म्हणजे, जे आपला गोंधळ दुसऱ्याला सांगून, एकतर समोरच्याला मत विचारतात किंवा त्याच्या मनातही गोंधळ निर्माण करतात. यात एक थोडा भेद लक्षात ठेवा. आपण सुरू करणार असलेलं कर्म पूर्ण माहिती घेऊन, त्यावर शंकाकुशंका काढून मग मार्गस्थ होणं वेगळं आहे.
परंतु आपण सुरू करून, पुन्हा दुसऱ्याच्या सांगण्यावरून बंद करून, गोंधळ वाढवणं हा भाग वेगळा आहे. म्हणजेच धरसोड वृत्ती हा भाग वेगळा आहे. शंका घेणारे, खूपवेळा रास्त शंका घेतात, ज्यामुळे यांच्यासह अनेकांचा फायदा होऊ शकतो. परंतु असे द्विधा वीर असतात त्यांना, सर्वांची बाजू, तर्क आणि मुद्दे पटतात. ज्यामुळे त्यांचा सतत वैचारिक गोंधळ असतो. यांच्या या वृत्तीमुळे, ज्यांना पटलेलं असतं आणि जे श्रद्धेने अनेक कर्म वा साधना करत असतात, ते कर्ममार्गीसुद्धा गोंधळात पडतात.
यावर अजून चिंतन व विचार गरजेचा आहे आणि अश्या लोकांसाठी उपाय पण विचारात आणूया, पण उद्याच्या भागात. तोपर्यंत ठाम रहा, नाम घ्या आणि पुढे जात रहा.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे पुस्तक प्रथम आवृत्ती थोड्याच प्रति शिल्लक आहेत आणि श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ हे लवकरच प्रकाशित होणारं, पुस्तक ज्यांना हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून वा फोन करून संपर्क करावा आणि नोंदणी करून घ्यावी .
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३१/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment