भोग आणि ईश्वर १६४
काळाच्या विषयासंदर्भात अजून एक मुद्दा जो मनात येऊ शकतो, त्याबद्दल आपण आज चर्चा पुढे सुरु ठेवू. कालपर्यंत आपण २ प्रकारचे लोक बघितले. एक म्हणजे जे स्वकर्मफल आणि गुरुकृपास्वरूप, संकटापासून पूर्ण अलिप्त राहतात. म्हणजे हे संकटात सापडत नाहीत. याचं उत्तर यांच्या गत काळातील व गतजन्मातील पूर्वपुण्याई संचयामुळे, त्यांना संकट स्पर्शही करू शकत नाहीत. हे अद्भुत कर्मफल घेऊन आलेले जन असतात. काहीजण या संकटात सापडतात पण काहीही क्षती न होता वा परिणाम न होता, यात सापडले तरीही, सुखरूप बाहेर पडतात. या साधकांना त्यांची पूर्वसंचित काहीसं कमी असल्यामुळे, गुरुकृपा तारते.
आता जे यात सापडतात, क्षतिग्रस्त होतात आणि काहीजण तर या लोकीची यात्रा संपवून पुढील लोकी वा जन्मी प्रस्थान करतात. अश्या सामूहिक आपत्तीत या लोकांना आणि त्यांच्या परिवाराला खूप अपेष्टा, कष्ट व ताप सहन करावा लागतो. पण एक लक्षात घ्या कि, मुळात हे जगच एकप्रकारचं यज्ञकार्य आहे. ज्यामध्ये सूर आणि असुर शक्तींचा संघर्ष नित्य आणि अविरत चालू असतो. तात्काळ विजय हा नेहमी असुर शक्तींचा असतो. हे एक प्रकारचं युद्धच आहे. या विषयावर दीर्घ चर्चा उद्या करूया.
साधारण सत्ययुगापासून ते अगदी आतापर्यंत पाहिलं तर युद्ध हे मानवाला नित्य आहेच. म्हणजेच हा संघर्ष आणि या संघर्षातून जाणं हा आपला अर्थात पृथ्वीवासीयांचा किंवा मर्त्यलोकातील जीवांचा एकप्रकारे जीवनप्रवास आहे. यात प्रत्येक जीव वेगवेगळ्या प्रकारे, आपलं कर्मफल ज्या प्रमाणे असेल, त्यानुसार योगदान देतो. प्राण्यांना सुद्धा संघर्ष हा करावा लागतो. परंतु त्यांना भोगच असल्यामुळे त्यांना भोगण्यावाचून पर्याय नाही. मानवाला यात वर्तमान आणि भविष्यातील कर्म सुधारण्याचा मार्ग ईश्वराने प्राप्त करून दिला आहे. यामुळे स्वनिर्मित संचित भोगत असताना स्वकर्माने व सद्गुरुकृपेने पुढे जाण्याचा मार्ग प्राप्त होऊ शकतो. मानव ते प्राप्त करतो. परंतु आपण मर्यादित ज्ञानेंद्रियांच्या कारणामुळे मागील व पुढील पाहू शकत नाही.
एक उदाहरण घेऊ. आपण शालेय वर्गात आहोत. वार्षिक परीक्षेनंतर, वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख पाहून त्यातील गुणांनुसार वर्गवारी करून, जे ठराविक टक्क्यांच्यावर आहेत त्यांना, पुढील वर्गात धाडण्यात येतं. आता पुढच्या वर्गात गेलेली सर्व मुलं पुन्हा भेटल्यानंतर कोण आलं नाही किंवा कोण मागे राहिलं याची चर्चा होतेच होते. यामध्ये लक्षात येतं कि, अमुक इतकी मुलं मागे राहिली किंवा आली नाहीत. यात अजून एक प्रकार असू शकतो कि, काही मुलं हि शाळा सोडून दुसऱ्या शाळेत किंवा दुसऱ्या गावाला गेली. ती उत्तीर्ण होऊन गेली कि, अनुत्तीर्ण झाल्यामुळे गेली हे, त्या त्या मुलांशी संबंधित मित्रांकडून वा कुटुंबियांकडून मिळू शकते. त्यानंतर नवीन गावात किंवा नवीन शाळेत, त्यांचं काय झालं,याची माहिती त्यांच्याशी संबंधित कुटुंबियांना वा मित्राना असतेच असते.
आता या सोडून वा शाळा बदलून गेलेल्या मुलांमध्ये पुन्हा दोन प्रकार असतात. एकतर अनुत्तीर्ण झाल्यामुळे किंवा खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे, नवीन आणि चांगल्या शाळेत जाण्याची संधी मिळालेली असल्यामुळे. पण हे सर्व आपण तयार केलेल्या शालेय, परीक्षा आणि आपापसातील संबंधांमुळे शाळा बदलानंतरसुद्धा सदर विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त होऊ शकते. हि मानव निर्मित व्यवस्था असल्यामुळे सोडून गेलेल्या त्या विद्यार्थ्यां बाबत आपण मागील, वर्तमानातील व भविष्यातील सर्व माहिती जाणून घेऊ शकतो. अर्थात यात एक आहे आपल्या पाल्याचं भविष्य इथे कि नवीन शाळेत योग्य घडेल याचा निर्णय पालकच योग्य असा सारासार विचार करून घेतात.
आता हेच उदाहरण आपण अश्या आपत्तीत या जगातून नाहिश्या झालेल्या लोकांबद्दल लागू करू आणि विचार करू कि, यातील काही नक्कीच आपलं पूर्वसंचित सुधारण्यासाठी पुढील जन्मात वा मार्गावर गेले असतील. काही जण नक्कीच या जन्मातील भोग संपवून, आपलं नकारात्मक व अनिष्ट कर्मफल पूर्ण करून वा त्यातील बराचसा भाग भोगून म्हणजेच संपवून, चांगल्या गुणांसह पुढील शाळेत अर्थात पुढील जन्मास प्राप्त झाले असतील. किंवा काहींना पूर्वसंचिताचा भार या जन्मातील कर्मासह पुढे नेण्यास पुरेसा नसल्यामुळे, त्या सर्व चुकांचा आणि कर्मांचा हिशोब चुकता करण्यासाठी पुन्हा एखादी पायरी मागे सुद्धा जावं लागलं असू शकेल.
पण या सर्व व्यवस्थेत ईश्वराने मानवाला काहीही माहिती मिळण्याची व्यवस्था ठेवलेली नसल्यामुळे आपण फक्त हळहळ, दुःख व ताप करण्याशिवाय काहीही करू शकत नाही. अर्थात शिक्षक वा पालक या रूपात सद्गुरूंना सर्व ज्ञान असल्यामुळे, त्यांना या जग सोडून गेलेल्यांच्या पुढील ठिकाणाचा ठाव व माहिती असते. त्यामुळेच सद्गुरू कधीही अश्या घटनांनी विचलित होत नाहीत. कारण ते जाणतात कि, जे घडलं ते सदर आत्म्याच्या उन्नत्तीकरताच घडलं आहे. आपण फक्त त्यांच्या पुढील योग्य कर्मांची अपेक्षा आणि प्रार्थना करू शकतो. कारण जन्माआधीचं आणि मृत्यूनंतरचं जाणण्याची काहीही व्यवस्था सर्वसामान्य जनांसाठी, परमेश्वराने ठेवली नाही.
परंतु सद्गुरू रूपात त्याची चिंता वाहण्याची व्यवस्था नक्कीच परमेश्वराने करून समस्त जडजीवांवर अनंत काळाचे उपकार केले आहेत. म्हणून आपण साधनेत राहून सद्गुरू आज्ञा शिरसावंद्य मानून पुढे पुढे जात राहूया. म्हणूनच सद्गुरू चरणी दृढ रहा आणि नाम घेत रहा.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून वा फोन करून संपर्क करावा.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१३/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment