Skip to main content

हलकं फुलकं १

हलकं फुलकं १

वर्क फ्रॉम होममुळे वैतागलो होतो, त्यात उन्हाळा, उकाडा म्हणून, संध्याकाळी बाहेर चक्कर मारायला जाण्यासाठी तयार झालो. टेबलाच्या खणातून काही घ्यायचं म्हणून डबल दरवाज्यापैकी एक दार उघडलं, तितक्यात त्या टेबलाला टेकून ठेवलेली एक जुटची पिशवी कलंडली. सहज शब्द कानावर आले. 

पिशवी : फुकट झोपमोड झाली ना, जरा नीट करायचं की.

मी : तूला आज सकाळी हिने आणलं भाजी आणि किराणा  सामान भरून. भाजी काढली, फ्रिजवर ठेवली, बाकीचं सामान ठेवून, तुला इथे टेकवून ठेवली. तेंव्हा पासून आरामच करतेस ना. जरा कलंडलीस तर काय झालं, एवढं. काम काय तुला दुसरं.

पिशवी : तेच म्हणते, मला काम काय. हे सामान काढेपर्यंत इथे आणि नन्तर घडी करूनच ठेवणार ना? मग पडू दे की जरा. फुकट झोपमोड च्या..........

मी : ऐ शिवी नाही द्यायची.

पिशवी : जे ऐकते आजूबाजूला, तेच येणार ना.  

मी : असुदे, रहा इथेच पोट पुढे काढून उभी. 

असं म्हणून मी तिला क्लडलेली होती ती सरळ केली आणि निघालो. 

दरवाजाबाहेर आलो तर, चप्पल एक पूर्व आणि दुसरी पश्चिम अशी होती. म्हटलं त्या पिशवीला बोललो तर हिलाही राग आला की काय. सहज म्हटलं,  दिवसभर नुसतं बसायचं आहे , सरळ पण राहता येत नाही. तेवढयात पठाणी आवाज आला

चप्पल :  ओ मालक जसं काल ठेवलं होतत,  तशीच आहे मी, उगाच बोलायचं काम नाही.

मी : बरं बरं,

म्हटलं यां दोघींनी डायरेक्ट उत्तर देऊन अटॅक का केला. मग लक्षात आलं, ती पिशवी, ती चप्पल....... मग बरोबर. कशा ऐकून घेतील. तेवढ्यात पायात घातलेल्या चप्पलेतून आवाज आलाच.

मालक काटे सरळ पायाकडे पाठवीन न अडवता, विचार करून विचार करा. शेवटच्या वाक्याने गडबडलो. म्हटलं 

मी : काय म्हणालीस,  विचार करून विचार करा, म्हणजे ?

चप्पल : Think twice before thinking अर्थात सांभाळून विचार करा. शेवटी मी पण एक स्त्री आहे, शक्तीयुक्त, अशी पाडीन कळणार पण नाही, पाय मुरगळेपर्यंत. 

मी: ठीक आहे, ठीक आहे. आपलं काम कर , चाल मुकाट्याने.

चप्पल : चालतेच आहे, पण जरा पाय हलवा झपझप, काय चालताय म्हाताऱ्यासारखं.

मी : संध्याकाळी फिरायला निघालोय, वर्क फ्रॉम होम मुळे कंटाळून, कशाला चालू, झपझप. काय ऑफिस गाठायचंय का. मुकाट्याने चाल नाहीतर गप्प बस.

आणि खरच दोन्ही चपला बाहेर पडल्या पायातून आणि असहकार केला की. मग मिनतवाऱ्या  करून, ती चप्पल असल्यामुळे चार वेळा सॉरी म्हटल्यावर मग जरा नाखुषीनेच पायात आली, पण शेवटपर्यंत कुरकुर करत आणि चावतच होती.

तसाच चालत थोडा पुढे गेलो, तर वाटेत एक दगड पायाला जोरात लागला. म्हटलं

मी: तीन फुल्या, चार फुल्या, वाटेत नीट बसून राहता येत नाही का रे, तू तर तो दगड आहेस ना?.

दगड : ओय राव उगाच बोलायचं काम न्हाय, त्या चपलेला सांगा, रोज जाता येता उगाधरून खोड्या काढते. मी हाय तिथंच हाय, तिला लायनीत चालायला सांगा.

मी : बरं बघतो मी, 

असं म्हणून चपलेला  म्हटलं

मी : काय ग कशाला छेडतेस,  याने काय घोडं मारलंय तुझ?

चप्पल : ओ मालक माहीत नाही तुम्हाला, मी दिसले की शीळ घालतो, आवाज काढतो,  येतेस का विचारतो, म्हणून रोज ठरवून ठोकरते त्याला, तुम्ही मध्ये पडू नका, आमचा मामला आहे हा, बरोबर बघते मी याला. बूट असला ना की , मुकाट्याने बाजूला होतो. कारण तो बूट ना. मी असले की मुद्दाम मध्ये मध्ये येतो.

थोडं पुढे गेलो होतो, मागे वळून पाहिलं तर, तो दगड हिच्याकडे बघून मवाल्यासारखा हसत होता, अगदी प्रेम चोप्राच. मी म्हटलं जाऊदे बघतील ते दोघे. तसाच निवांत चालत असताना, जरा आजूबाजूला बघत होतो, तेवढ्यात आवाज आलाच 

चप्पल : मालक लक्ष आहे माझं, सरळ नाकासमोर बघा, नाहीतर

मी : नाहीतर काय

चप्पल : नाहीतर मालकीणबाईंच्या चप्पलेला नाव सांगीन, डायरेक्ट रेपोर्टिंग होईल.

मी : गप्प बस, चल मुकाट्याने, मध्ये मध्ये लुडबुड नको करुस. 

क्रमशः नवीन सदर

©® संकल्पना व लेखक : प्रसन्न आठवले
२४/०५/२०२१

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...