भोग आणि ईश्वर १६५
सद्गुरू, साधना आणि 'स्व'ची आहुती, ही खरतर अध्यात्मा तील मार्गक्रमणेची त्रिसूत्री आहे. या तीन गोष्टीचं पालन मना पासून, अंतःकरणाने आणि आत्मप्रेरणेने केलं तर, आयुष्यात, धनदौलत माहीत नाही, पण समाधान नक्कीच कमी पडणार नाही. सरतेशेवटी हे समाधानच माणसाला अध्यात्मात उन्नत्ती आणि यशस्वीतेकडे नेतं.
अध्यात्मात यशस्वी म्हणजे काय, सद्गुरुकृपा आणि उत्तम साधना यांची प्राप्ती. बाकी नादलहरी, प्रकाश, स्वप्न, आत्म प्रेरणा अर्थात इंट्युशन आणि तत्सम सिद्धी प्राप्ती होणं ही खरतर अनेक स्थानकं आहेत, जी बरेचदा मायास्वरूप असतात. त्याने वाहावत न जाता, आपली साधना आणि गुरुदास्यत्व हेच श्रेष्ठ मानलं पाहिजे. म्हणजेच इथेसुद्धा समाधान हाच श्रेष्ठ मंत्र अर्थात guiding principle असलं पाहिजे.
ते समाधान असेल तर माणूस, जीवनाच्या कोणत्याही स्थितीत उत्तम साधना करून उन्नत होऊ शकतो. कारण एकदा माहीत झालं की जे वर्तमानात प्राप्त झालंय किंवा होतंय , ते आपल्याच गतकाळातील वा गतजन्मातील कर्माचा परिणाम आहे, मग माणूस प्राप्त परिस्थितीने विचलित न होता, पुढील मार्ग सुधारण्याकडे, आधी मनाने व नन्तर कर्माने मार्गक्रमण करू शकतो. मुळात हे मान्य करता आलं पाहिजे की, मी जे केलंय तेच मी आता भोगतोय आणि आता वर्तमानात व भविष्यात जे करीन ते यापुढील काळात आणि पुढील जन्मांत भोगीन किंवा उपभोगीन.
म्हणजे सद्यःस्थितीची मान्यता ही समधनाकडे वाटचाल करण्याची पहिली पायरी आहे. सद्गुरू निष्ठा ही दुसरी पायरी आहे. मुळात एक गोष्ट मनात पक्की ठेवावी की,सद्गुरू आपल्याला सद्यस्थितीत भोगातून बाहेर काढत नाहीत, म्हणजे त्यांचं आपल्याकडे दुर्लक्ष आहे किंवा त्यात त्यांना आनंद मिळतोय असं काही नाही. पण यातूनच आपली आत्मउन्नती व भोगमुक्ती आहे, असा याचा अर्थ धरावा. कारण कोणत्याही सद्गुरूंना साधक कष्टात असल्याचं अनिवार्य दुःख आणि क्लेश होतो.
पण त्याहीपेक्षा जास्त क्लेश त्यांना हे जाणून होतो की, आपल्या कर्मगतीला याबद्दल दोषी न मानता, देव, दैव, नशीब इत्यादी गोष्टींवर याचं मिथ्या खापर माणूस फोडतो आणि यातून बाहेर पडण्यासाठी कर्मसुधार न करता, विचारांच्या गर्तेत अजून खोल जातो. हे त्यांना जास्त वेदनादायक आहे.
आत्मचिंतन या शब्दात दडलेला खरा अर्थ स्वतःच्या कर्मगतीचा, त्यामुळे समोर आलेल्या फलाचा, यापासून प्रेरणा घेऊन आणि त्यामुळे होणाऱ्या मानसिक व शारीरिक भोगांपासून व पिडेपावून अलिप्त राहून आपली साधना कशी वाढवता येईल याचा, जेणेकरून भक्ती, अध्यात्म, भोगमुक्ती या मार्गांवर आपण यशस्वी मार्गक्रमण कसे करू शकतो,या सर्वांचा नियमित, आत्मशोधक विचार करून, त्यानुसार कर्मवृत्ती वाढवून, कर्मव्रती होणं, म्हणजेच आत्मचिंतन.
यासर्वात परम ईश्वराचं चिंतन, जे या आत्मचिंतनातून मुक्तीकडे नेईल वा नेतं, त्याकडे पारमार्थिक वाटचाल करणं. व्यवहारात व संसारात देहाची स्थिती काहीही असुदे आणि मनाची तात्पुरती त्यात डुबकी असली तरी, त्यातून फार कमी अवधीत बाहेर येऊन, त्याच मनाने देहाला साधनेच्या फेऱ्यात पुन्हा गुंतवणं हा खरा अध्यात्मिक समाधान प्राप्तीचा राजमार्ग आहे. राजमार्ग यासाठी की सांसारिक मार्गाप्रमाणेच या मार्गात सुद्धा विघ्न असली तरीही, इथे कोणताही व्यावहारिक भाग नसल्यामुळे, मात्र, हृदयातून साधना, निष्ठा, श्रद्धा, विश्वास, सद्गुरुकृपा, नामावरील प्रेम, हीच इथली चलनी नाणी आहेत.
ही नाणी मिळवायला कोणताही व्यवहार नाही तर, फक्त आपलं मन, हृदय, मस्तिष्क, देह यामध्ये ताळमेळ साधून, नित्य साधक म्हणून मार्गी राहणं, इतकंच अपेक्षित आहे. सद्गुरुकृपेने बाकी सर्व आध्यत्मिक प्रगती, उन्नती व मार्गातील इतर अडचणी दूर होतीलच. पण निष्ठा श्रद्धा, चिकाटी आणि साधना शंभर टक्के चोख हवी. समाधान या विषयावर पुढे चिंतन चालू ठेवू.पण आज इथेच थांबू.
म्हणूनच नामात राहून, सद्गुरुकृपा प्राप्त करा.
लेख क्रमांक १ ते ६७ संकलित करून तयार करण्यात आलेलं भोग आणि ईश्वर भाग १ हे ज्यांना पुस्तक हवं आहे त्यांनी, खालील व्हाट्सअप्प क्रमांकावर मेसेज करून वा फोन करून संपर्क करावा.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१४/०५/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment