भोग आणि ईश्वर १०
आतापर्यंतच्या सर्व गोष्टीचं चिंतन केलं असेल तर पुढच्या पायरीवर पाऊल ठेवू.
चिंतन केलं असेल तर एक गोष्ट लक्षात आली असेल, की आपण प्रथम क्रिया वा कर्म केलं किंवा प्रतिक्रियेला तसच उत्तर दिलं तर त्याच्या शृंखलेत मानव बद्ध होतो आणि ते कर्म फळ देईपर्यंत त्याला जीवन जगत रहावं लागतं. म्हणजेच जोपर्यंत शेवटचं कर्म फळ देऊन शांत होत नाही तोपर्यंत माणूस या जीवनमरणाच्या फेऱ्यातून सुटणार नाही. मग हे चक्र भेदायचं कसं.
आतापर्यंत ही गोष्ट पक्की डोक्यात व विचारात बसली की, वाईट वा चांगले अनुभव, व्यक्ती, प्रसंग हे सर्व मीच माझ्यासाठी बोलावून आणलेत. म्हणजे देवाने यात काहीही सरळ वा वाकडं केलं नाहीये. त्याने फक्त हे चक्र निर्माण करून त्यात अंशरूपात आपलाच भाग चराचरात भरून ठेवला. त्यानंतर त्याला काहीही करावं लागलं नाही. सर्व गोष्टी आपसूक यंत्रवत होत राहतात आणि भगवंत साक्षीरूपात हे कार्य घडताना त्रयस्थपणे बघतो.
कारण यासाठी भगवंतांनी इंद्र, वरुण, यम, सूर्य, काळ आदि स्वयंचलित स्वयंसिद्ध व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे. ज्यायोगे कर्मफळाचं चक्र अव्याहतपणे निरंतर सुरू आहे. आपण कर्माच्या त्या त्या फलाशी बद्ध आहोत. ते कधी कोणत्या रुपात समोर येईल हे माहीत नाही म्हणून आपण दुःख मिळालं की स्तंभित होतो, चिडतो, असहाय्य होतो, हतबल होतो. या सर्व मानवी मनाच्या प्रतिक्रिया आहेत. त्या उस्फुर्त आणि समयोचित असतात. आपणही नन्तर आश्चर्यचकित होतो की, मी त्या क्षणी असा वागलो कसा.
या सर्व प्रतिक्रिया त्या त्या व्यक्तीच्या जडणघडण व स्वभावानुसार येत असतात. एखादा त्या भावना संयतपणे व्यक्त करतो तर एखादा त्या भडकपणे व उघडउघड व्यक्त करतो. काहींना त्या अजिबात व्यक्त करता येत नाहीत तर काहींना त्या नियंत्रित करण्याची हातोटी माहीत असते. याच स्वभावानुसार माणूस प्रतिक्रिया देखील देत असतो. ज्या नन्तर पुढील कर्मांना जन्म देतात.
आता प्रश्न असा आहे की, जर या प्रतिक्रिया उपजत व नैसर्गिक भावाप्रमाणे येत वा उमटत असतील तर किंवा त्या नियंत्रित करता येत नसतील तर मग आपण एखाद्या प्रसंगात विशेषतः रागाच्या प्रसंगात नियंत्रित वा संयत प्रतिक्रिया देऊन वा प्रतिक्रियाशून्य राहून पुढील कटुता व त्यायोगे घडू पाहणारी कर्मफलशृंखला कशी काय तोडू शकतो.
इथे एक साधं उदाहरण घेऊया. पाण्यावर दगड मारल्या नन्तर त्यावर तरंग दिसतात ते आपण पाहिले असतील. ते तरंग पाणी ज्या खोलीचं असेल त्यानुसार जमिनीला समांतर व पाण्याच्या तळाकडे उमटतात. आता एखादा कटू अनुभव दोन विरुद्ध टोकाच्या व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतील. एखादी व्यक्ती सदर प्रसंगात रागावून वा निराश होऊन वा अत्यंत दुःखी होऊन व्यक्त होईल.
त्याच अनुभवावर दुसरी व्यक्ती अत्यंत संयत, शांत व्यक्त होईल. कदाचित व्यक्तसुद्धा होणार नाही. म्हणजेच हे प्रासंगिक तरंग मनाच्या खोलीवर अवलंबून आहेत हे पाण्याच्या उदाहरणा वरून ताडलं जाऊ शकतं. जसं, पाणी जितकं खोल तितके ते तरंग वर जरी दिसले तरी खोलवर जाणार नाहीत. याचप्रमाणे मनात उमटणाऱ्या प्रतिक्रिया असतात. यालाच मनाची खोली देखील म्हणता येऊ शकेल.
आता यावर विचार करूया पुढच्या भागात.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१०/१२/२०२०
Comments
Post a Comment