करुणाष्टके आणि भावार्थ २.
।। श्रीगणेशाय नमः ।।
।। श्रीराम जयराम जय जयराम ।।
अनुदिन अनुतापें तापलों रामराया ।
परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥
अचपळ मन माझें नावरे आवरीता ।
तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥
कल्पना करा आपण हात जोडून रामापुढे बसलो आहोत. फक्त राम आणि आपण. ध्यान आत म्हणजे अंतर्मनात लावून विचार एकाग्र करण्याचा प्रयत्न करतोय. चित्त स्थिर होत नाही, कारण अनेक विचार वर्षानुवर्षे मनात बाळगण्याचा ध्यास आपण करत आलो आहोत. त्यामुळे स्थिरचित्त म्हणजे काय हे फक्त ध्यान लावलं, योग केला तरच माहीत पडतं. तरीही प्रयत्न केले तर कुठेतरी सुरवात होईल हा दृढनिश्चय करूया. शांत एकाग्र होऊया आणि आता स्वतःला आठवूया, त्रयस्थ होऊन.
अंतर्मनात डोकावून तिथून बाह्यरुपाला शोधण्याचा प्रयत्न करूया. जसं आणि जितकं होईल तितकं करत जाऊया. प्रयत्न केला कि, सध्या होईल. मात्र जोर जबरदस्ती न करता मनाला आत नेण्याचा प्रयत्न करूया. काहींना थोड्या प्रयत्नाने सध्या होईल. काहींना फार वेळ लागेल, काहीच नाही घडलं तरी चित्त शांत होत जाईल, काही काळानंतर. मनाचा वारू इतक्या सहजी हाती येईल असे नाही, पण शांतपणे नेटाने पण सहज प्रयत्न केले तर जमेल, हे नक्की.
आता अंतर्मनात डोकावल्यानंतर आणि तिथून त्रयस्थपणे बाह्य रुपाला पाहिल्यानंतर जे दिसेल जे जाणवेल ते श्रीरामाला माझ्या श्रीरामाला मी सांगत आहे अशी कल्पना करा. जे डोळ्यासमोर दिसेल, जे अंतर्श्रुतींना ऐकू येईल, तो आवाज म्हणजे समर्थांची करुणाष्टके. करुणाष्टके म्हणजे समर्थांनी प्रत्येक मानवी मनाचा होणारा कोंडमारा, दुखःतिरेकाने, भयाने, विषादाने, भवतापाने, कर्मगतीच्या फेऱ्यात अडकून आता त्रस्त झालेल्या मनाने भगवंताला घातलेली साथ.
बरेच वेळा विमनस्क स्थितीत काय करू, संकट काळात कोणाला साद घालू हा प्रश्न पडतो. आपल्या त्या स्थितीत ईश्वराला, श्रीरामरूपातील त्या परमचैतन्याला साद घालून त्याची आळवणी करा तो कोणत्या ना कोणत्या रुपात येऊन मदत करेल, आपल्याच कर्मगतीच्या प्रारब्ध व संचित यामुळे मदत शक्य नसेल तर निदान दुःखावर फुंकर घालून दाह कमी करण्याचा प्रयत्न नक्की करेल.
अश्या शांत समयी फक्त आपण दोघेच श्रीराम आणि मी असताना त्याला साद घालून काय सांगायचं ते समर्थ सार्थ शब्दात मांडतात. अष्टक म्हणजे आठ श्लोकांचा समूह. माझ्या वाचनात आलंय त्यानुसार, समर्थांनी असे आठ श्लोकांचे आठ समूह लिहिले होते. म्हणजे चौसष्ठ श्लोक. परंतु मला चौतीस श्लोक सापडले. म्हणून विवेचनासाठी तेवढेच घेतलेत. तरीही कोणाकडे चौतीसच्या पुढे असतील तर मला जरूर पाठवावे.
पुढील भागापासून विवेचनाला सुरवात करूया. तोपर्यंत या शांत धारणेचा जमेल तसा अभ्यास करा.
क्रमशः .......
भाग २
|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
०४/१२/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment