भोग आणि ईश्वर ११
मनाचा विचार खरतर तर अनेक जणांनी करून खूप काही लिहिलय. त्यामुळे अजून त्यावर लिहिण्यापेक्षा आपण विषय पुढे नेऊया. मुळात मन हे तरंग लहरींसारखं आहे. त्याला आकार उकार काही नाही. ते मस्तिष्क हृदय पूर्ण शरीर ते आत्मा या शरीरांतर्गत आणि त्याबाहेर कुठेही कधीही आणि कोणत्याही वेगाने फिरू, विचार करू आणि बागडू शकतं. एखाद्या मस्तवाल वळूप्रमाणे असलेलं मन हे एखाद्या गरीब गाईसमानसुद्धा असू शकतं किंवा होऊ शकतं.
अफाट शक्ती आणि ऊर्जा असलेलं हे एक इंद्रिय खरतर देवाची मानवजातीला अलौकिक देणगी आहे. वक्र आणि क्रोधीत झालं तर क्षणात एखाद्याचा खून आणि शांत संयमी झालं तर, प्रत्यक्ष परमेश्वराला वश करून घेऊ शकतं. शून्यातून ब्रह्मांडाकडे जाण्याची शक्ती असलेलं अणुस्फोटाहून श्रेष्ठ इंद्रिय आहे आणि म्हणून श्रीमदभगवद्गीतेत भगवंतानी पण सांगितलंय की इंद्रियांमध्ये मी मन आहे.
आता इथे पुन्हा एक प्रश्न उभा राहतो की जर स्वतः भगवंत मन आहेत तर मग तेच मन चांगला वाईट हीन घृणास्पद असा विचार करूच कसं शकतं. खूपवेळा आपण एखाद्याबद्दल सांगताना म्हणतो अगदी मुर्दाड मनाचा माणूस आहे किंवा त्याचं मनच मेलय. म्हणजे मन खरच मेलेलं असतं का. किंवा कोमामध्ये गेलेल्या व्यक्तींच्या मनाचं काय. सर्वात प्रथम मन ही एक शक्ती आहे आणि देह हे एक यंत्र आहे.मुळात मन असल्या मुळेच देहाला अनेक गोष्टी करता येतात, सुचतात, ज्या इतर प्राणीमात्रांतून मानवाला वेगळं सिद्ध करतात. .
आत्मा या चैतन्यशक्तीसह ते मानवीदेहात प्रवेश करतं आणि मृत्यूपर्यंत तिथेच राहतं. मृत्यूनंतर पुन्हा आत्म्यासह मनोमय कोषदेखील देह सोडून निघून जातो. याचाच अर्थ, जसे या जन्मीचे विचार असतील तसेच पुढील जन्मीचा देह आणि कार्य असणार. म्हणून महाराज पण सांगतात शेवटच्या क्षणी जसे वा जे विचार असतील तसाच पुढील जन्म मिळेल, ते याच कारणाने. चैतन्याची ताकद ही मनाच्या तरंगांना नियंत्रित करून, एकरूप झाली की अनेक अलौकिक कार्य मानवी देह सिद्ध करू शकतो. अगदी नराचा नारायण देखील या मन आणि आत्मा यांच्या एकरूपतेतून होऊ शकतो.
यासाठी एक प्रयोग करून बघा. जोरात नळ सोडून बघा म्हणजे अतिवेगात आलेली पाण्याची धार अनेक दिशांना पाणी उडवून बदाबदा पडेल पण कदाचित कार्यपूर्ती होणार नाही. किंवा झालीच तरी बरचस पाणी वाया जाईल. त्याखाली एखादं भांड धुण्याचा प्रयत्न करा. अनेक दिशांना पाणी उडवत ते भांड धुवावं लागेल. कदाचित जितकं खरंच उपयोगी आहे, त्याच्या चौपट पाणी वापरलं जाईल.
त्याच प्रमाणे अत्यंत वेगवान मन अनेक क्षेत्रात कार्यरत असेल कदाचित अनेकदा गोष्टी वा उद्देश साध्य करू शकेल परंतु या सर्व व्यापात शक्ती व ऊर्जा किती व्यर्थ वाया जाईल, हे त्यावेळी लक्षात येणार नाही. त्या पाण्याचं तसच होईल. कदाचित आपल्या लक्ष्यावर न पडता पाणी भलतीकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आता पुन्हा नळ बंद करून घ्या. सांडलेलं पाणी पुसून जागा नीट साफ करून घ्या. आता बारीक एकसमान धारेने पाणी पडेल इतकाच नळ सोडा. प्रयोगासाठी मगाशी मोठ्या धारेखाली एखादं भांड धुण्याचा प्रयत्न केला तसा या धारेखालीदेखील तेच भांड धुण्याचा प्रयत्न करा. एकाच गतीने, संथपणे, पण एकाच लयीत पडणाऱ्या या पाण्याच्या धारेने तेच भांडं कदाचित मगासच्यापेक्षा निम्म्याहून कमी पाण्यात धुतलं जाईल.
याचं कारण असं की, मगाशी अतिवेग व प्रमाण, यामुळे विभागली गेलेली तीच शक्ती, आता वेग आणि प्रमाण यांचा तोल व ताळमेळ साधला गेल्यामुळे, एकाग्रतेने, एकाधारेने, येऊन कमी शक्तीने जास्त परिणाम साधत आहे. हीच ती सुक्ष्माची ताकद, एकाग्रतेची, निष्ठेची, सातत्याची, विवेकाची आणि विशालतेला सुक्ष्मात कवेत घेण्याची. याउलट आधीच्या उदाहरणात वाया जाणारी आणि विभागली गेलेली ताकद चंचलतेची, अतिवेगाची, क्रोधाची कामादी विकारांची.
पुढच्या भागात अजून खोलात जाऊया तोपर्यंत हा प्रयोग खरच करून निष्कर्ष नोंदवायला हरकत नाही. जितकी कमी धार तितका परिणाम अधिक आणि तितकीच पाण्याची बचतसुद्धा अधिक.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
११/१२/२०२०
Comments
Post a Comment