भोग आणि ईश्वर १२
कालच्या उदाहरणात नळ कमी जास्त करून पाण्याची धार आपण नियंत्रित करत होतो आणि प्रयोग केला. आपल्याला शांत एकाधारेतील पाणी आणि वेगात येणारं पाणी यातील फरक फायदा तोटा समजला. आता मनाशी याचा संबंध जोडताना नळाला असतो तसा नियंत्रक कुठे आहे.
खरी समस्या इथेच सुरू होते. कारण मन हे स्वयंचलित आणि स्वनियंत्रीत असल्यामुळे, त्याची स्वतःची मर्जी हा एक खूप मोठा घटक आहे, नियंत्रण न मिळण्यामागे. मनाचा वेग व आवेग हा कोणालाच आलेखित व आरेखीत करता आलेला नाही. म्हणजे त्याचा diagram आणि drawing दोन्ही काढता येणं अशक्य आहे. मुळात ते अदृश्य राहून शरीर नियंत्रित करतं आणि स्वतःला पाहिजे ती कामं करवून घेतं.
इथे त्याच्या जोडीला मसाला व फोडणी म्हणून काम क्रोधादी विकार आहेतच, जे आधीच चंचल असलेल्या मनाला अनियंत्रित करतातच परंतु वासनेचा जोर, क्रोधाचा ज्वर आणि अभिमान व अहंकाराला फोफावत ठेवतात. म्हणजेच आधीच अनियंत्रित गाडीचे रोधक (ब्रेक) निकामी आणि चालक नशेत अशी परिस्थिती होते. म्हणूनच मनाला वारू सुद्धा म्हटलं आहे.
असं अजब आणि अफाट लौकिक असलेलं मन याला चंचलतेकडून नियंत्रित करत स्थिरतेकडे व त्यामार्गे संकल्पाकडे नेणं गरजेचं आहे. याचं कारण आणि गरज काय हा प्रश्न निर्माण होईल. मुळात आपण या जन्मात भोगावी लागणारी दुःख, त्रास, काळज्या, कष्ट, चिंता, नकारात्मक बाबी याबद्दल चर्चा करत होतो. तर त्यामध्ये हे मन कुठून आलं हा एक प्रश्न आहेच. बघूया
आपण भोगतो ते आधीचं कर्मफल. त्यातून जे सुख वा दुःख वाट्याला येतं ते मुकाट्याने सहन करण्याशिवाय गत्यंतर नसल्यामुळे त्या नकारात्मक काळात दिवस ढकलुन पुढे जाणं हा एकच उपाय शिल्लक राहतो. पण मग असंच जगायचं असेल तर मानव म्हणून का जन्म दिला देवाने, हा प्रश्न राहतोच. अन्यथा प्राणी आणि मानव यात फरक काय.
दुसरा प्रश्न पश्चात कर्म सुधारण्याची सोय नाही. जे घडलं ते कर्म आपलं कार्य पूर्ण करेल त्यावेळी ते समोर येईलच. मग फक्त भोगणं आणि वाट पाहणं हेच आपल्या हाती आहे का. वाट कसली तर आहे तो त्रास, काळजी, चिंता दूर होण्याची आणि वाट तरी किती पहायची याचं देखील अचूक गणित नाही.
पण मनात विचार आला तर उपाय काय, या चक्रातून बाहेर पडायचा. मुळात चक्र आहे वा व्यूह आहे हे नक्की. पण तो स्वरचित असल्यामुळे उपायही स्व पासूनच सुरू करावा लागेल. या स्व आत्मन आणि देह यांमध्ये सांधा असलेलं मन हे या कार्यात अत्यंत उपयोगी आहे आणि त्या मनाचीच मदत घ्यावी लागणार.
बघू पुढच्या भागात काय आणि कसं ते.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१२/१२/२०२०
Comments
Post a Comment