अथर्वशीर्षातील मुख्य गाभा असलेल्या श्लोकाचा अर्थ.
गेले काही दिवस अथर्वशीर्ष यावर विचार करत असताना आज जे सुचलं ते मांडत आहे. यावर चिंतन व्हावं. खरंतर गहन विचार करत असताना आज अचानक हा गाभा सापडला, जे संपूर्ण अथर्वशीर्षांचं सूत्र असावं असा माझा कयास आहे.
प्रत्येक देवतेचा एक बीजाक्षर मंत्र असतो. श्रीगणेशाच्या बाबतीत तो काय आहे याचा उल्लेख अथर्वशीर्षामध्ये या सातव्या श्लोकात सापडतो. त्याचं विस्तृत विवेचन पुढे मांडत आहे.
गणादि पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरं।
अनुस्वार: परतर:। अर्धेन्दुलसितं।
तारेण ऋद्धं। एतत्तव मनुस्वरूपं।
गकार: पूर्वरूपं। अकारो मध्यमरूपं।
अनुस्वारश्चान्त्यरूपं। बिन्दुरूत्तररूपं।
नाद: संधानं। सं हितासंधि:
सैषा गणेश विद्या। गणकऋषि:
निचृद्गायत्रीच्छंद:। गणपतिर्देवता।
ॐ गं गणपतये नम:।।७।।
श्रीगणेशाच्या अद्याक्षरातील ग् ज्याला अ हा वर्ण जोडून त्यावर अनुस्वाररूप बिंदू देऊन त्याचा अनुनासिक उच्चार केल्यानन्तर जो नाद निर्माण होतो त्याला ओंकार जोडला की जो बीजाक्षर मंत्र तयार होतो त्याला श्रीगणपती देवतेच्या नामाने युक्त करून जो गायत्रीमंत्र तयार होतो तो मनातील अनेक उच्चतम इच्छांना प्राप्त करून देणारा आहे, किंबहुना ती श्रीगणेशाची विद्या अर्थात सिद्धीची गुरुकिल्ली आहे.
सैषा म्हणजे मनातील उच्चतम इच्छा. याचा उच्चार करतांना आधी गचा उच्चार करावा, नन्तर अ चा उच्चार करावा, त्यांनतर त्या अक्षरावरील बिंदुरुप अनुस्वाराचा उच्चार करून त्यातून येणाऱ्या नादाच्या शक्तीयुक्त नादलहरी चराचरातील गणेश तत्वाला जागृत करून साधकांच्या मनातील उच्चतम इच्छा म्हणजेच सद् इच्छा, सकारात्मक इच्छा फलद्रुप करतील. सदर गं या बीज मंत्रा आधी ओंकार नाद जोडून आणि त्यासोबत गणपती देवतेचं नाम उच्चारण करून सदर गायत्री मंत्र पूर्ण करावा.
या मंत्राची देवता स्वयं श्रीगणेश असून तीच शक्तीदेवता आहे किलकही गणेश असून त्याचे रचयिता गणक ऋषी आहेत. हा बीजाक्षर युक्त मंत्र आणि त्याने तयार झालेला श्रीगणेशाचा गायत्री मंत्र खालीप्रमाणे आहे
ॐ गं गणपतये नम:।।७।।
मला स्वतःला वाटतं की, संपूर्ण अथर्वशीर्षाचा हा मुख्य श्लोक आहे आणि बाकी सर्व श्लोक हे श्रीगणेशाची स्तुती, त्याची महती, त्याचं स्थान या सर्वांचं सार्थ वर्णन करणारे श्लोक आहेत. या सातव्या श्लोकात समस्त अथर्वशीर्षाचा गाभा दडलेला आहे. श्रीगणेशाच्या प्रार्थनेसाठी ॐ गं गणपतये नम: हा एक मंत्र उच्चारण करणं पुरेसं आहे अशी शाश्वती श्रीगणकऋषी देत आहेत.
म्हणून आपण गणेशवंदना वा नमन करतांना हा गणेश गायत्री मंत्र सतत जपावा, ज्यायोगे आपल्या अत्युत्तम अश्या सकारात्मक इच्छा फलद्रुप होतील.
©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
११/१२/२०२
०८:५५
Comments
Post a Comment