भोग आणि ईश्वर २२
कोणती वैचारिक बैठक ते पाहू.
मुळात एक गोष्ट सर्वात प्रथम स्वीकारणं जरुरी आहे की, काल आज आणि उद्या मला जे भोगावं लागलं, लागतंय, लागेल ते सर्व माझ्याच पूर्वकर्माचं फलस्वरूप आहे. हे एकदा तत्वतः मनाला पटलं की मग, मन याची इतर कारणं शोधून दुसऱ्यावर दोषारोप करण्याच्या फंदात पडणार नाही. आपल्या संबंधाने वा आपल्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट ही आपण पेरलेल्या बीजाचं उगवून मोठं झालेलं झाड आहे हे मनाशी पक्के केलं की बरेच प्रश्न मनातून सुटतात व मन त्या नकारात्मक प्रश्नांचा मग सोडून देईल.
याबाबतीत मनात संदिग्धता असता कामा नये. किंबहुना कोणत्याही कार्यात मन साशंक वा संदिग्ध असेल तर त्याचा परिणाम मनातील सकारात्मक ऊर्जेवर होऊन मनाच्या अर्थात मनातील इच्छेच्या शक्तींवर नक्कीच होतो. म्हणून साशंक मनाने कोणतही कार्य करू नये, अगदी विचार सुद्धा करू नये, निष्कर्ष चुकीचे निघतात आणि निर्णयसुद्धा. म्हणून शंका न काढता मनाला पटलं असेल तर पुढे जाणं इष्ट आहे.
एकदा मनाने पक्के ठरवलं की जे घडतंय वा घडणार ते माझ्यामुळे की मग त्यावर उपायसुद्धा मीच करू शकतो. म्हणजेच मला स्वतःला यातून बाहेर काढलं पाहिजे आणि ते मीच करू शकतो, हे सुद्धा मनच आपल्याला सांगू शकतं. म्हणजे एका सकारात्मकतेतून आपण दुसऱ्या सकारात्मक टप्प्यावर आलो. अर्थातच यामुळे सर्व एका रात्रीत बदलेल असा समज करून घेऊ नये. कारण जसे प्रारब्धभोग आपण लिहिलेत तसे ते आपल्यासोबत येत राहतील. परंतु आता त्याने मन विषण्ण न होता, त्याला तोंड द्यायला सकारात्मक रित्या तयार असेल.
आता आपण मनाची तयारी केली आहे, मन निःशंक होऊन वाट्याला येईल ते स्वीकारायला लगेच तयार होईल की नाही, हे व्यक्तिपरत्वे व इच्छाशक्तीनुसार ठरेल. तरीही मनाला सुसंस्कारित करून हे स्वीकारायला लावणं मोठं जिकिरीचं आहे. कारण मन तसही अत्यंत चपळ, चंचल आणि बंडखोर असल्याकारणाने कारणांची, पळवाटांची जंत्री तयार असेल. त्याशिवाय बरेचदा काही प्रसंग आपल्याबाबत वा इतर कोणाबाबत असे घडतात की, मन लगेच वेगळा विचार करायला लागतं. माझ्याबाबत जर असं घडलं तर त्यांच्याबाबत असं का नाही घडलं. देव खूप पक्षपात करतो. मला नेहमी वाईट अनुभव येतात व वाईट माणसंच भेटतात. बाकी जगात सर्वत्र आनंद असताना मला मात्र सतत सापत्नभवाची वागणूक देवाकडून मिळते.
लक्षात घ्या की ही खूप सर्वसामान्य तक्रार आहे. किंबहुना दहा मधील कदाचित दहाच्या दहा किंवा बहुतेक लोक स्वतःसंदर्भात हीच तक्रार करतो. याचे तीन अर्थ निघतात. एकतर यातील काही किंवा सर्व खोटं बोलत असावेत किंवा निदान काही लोकं तरी खोटं बोलत असावेत किंवा प्रत्येकाला काही ना काही दुःख, काळजी, चिंता, विवंचना आहेत, असतात व असतील. कारण जर हीच तक्रार गरीब श्रीमंत, उच्चनीच, लहानथोर, गरजू व गरज नसलेला अश्या सर्व स्तरातील लोक करत असतील तर प्रत्येकजण काहीतरी भोग हे भोगत असतोच.
अगदी संत,महंत, ऋषी, मुनी यांना सुद्धा प्रारब्ध चुकलं नाही. अन्यथा, जगाचा पालनकर्ता राजाराम पत्नी वियोगाच्या दुःखात व श्रीकृष्ण राधेच्या वियोगाच्या दुःखात झुरले नसते. त्यांना तर चमत्कार करून सर्व मिळवणं अजिबातच अशक्य नव्हतं. पण जर ते वाट्याला आलेले भोग भोगून संपवणं योग्य मानतात तर आपण अगदीच जनसामान्य आहोत.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२२/१२/२०२०
Comments
Post a Comment