भोग आणि ईश्वर १३
आपल्याला झालेली जाणीव ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जाण येणं म्हणजे समजणं लक्षात येणं. जाणण्याप्रत एखादी गोष्ट कळणं म्हणजे जाणीव होणं. मला प्रेमाची जाणीव झाली, मला भक्तीची जाणीव झाली. म्हणजे जाणिवेत त्या गोष्टीबद्दल जाग येणं, ती गोष्ट उमगणं आणि त्याचा पूर्ण उलगडा होणं हे अपेक्षित असतं. जर त्या अर्थाने आतापर्यंतचे भाग चिंतन केले असतील तर जे मला म्हणायचं आहे त्याची जाणीव तुम्हाला झाली, म्हणजेच जाण आली, तुम्ही जाणलं. तुम्हाला जाणीव झाली.
म्हणजे आज भोगतोय ते कालचं कधीचंतरी कर्मफल, आज करतोय ते उद्या कधीतरी समोर येईल. पण हे अशाश्वत आहे की ते उद्याच येईल किंवा भविष्यात कधीतरी येईल. कधी कधी आजचं फल आजच लगेच मिळतं, असंही होऊ शकतं. हे संचित किती आणि कर्म काय यावर पण अवलंबून आहे. किंवा एखादा भोग हा वर्षानुवर्षे असू शकतो. पण म्हणजेच त्याला कारणीभूत एखादं अघटित तितकंच दुर्दैवी कर्म घडलं असेल हे मनात लक्षात ठेवा.
मी नाव न घेता एक प्रातिनिधिक उदाहरण देतो. एक नर्स साधारण १९७२ मध्ये एका अत्याचारात कोमात गेली. के इ एम मध्ये १९७२ ते २०१५ (बहुतेक) पर्यंत नुसती देहाने जिवंत होती. साधारण २२ व्या वर्षी घडलेला दुर्दैवी अत्याचार. त्या २२ वर्षात या जन्मात तिने असं काय पाप केलं असेल की त्याची शिक्षा त्या देहाला जवळजवळ ४३ वर्ष भोगावी लागली.
बर कोमात असल्याकारणाने ज्याने तो अत्याचार केला, त्याला शाप शिव्या देण्यासाठीसुद्धा मन जागृत अवस्थेत नव्हतं. म्हणजे फक्त भोग भोगून संपवून तो आत्मा या जन्मीचं काहीही कर्मफल शिल्लक न ठेवता गेला. यात आपल्या दृष्टीने दुर्दैवी घटना व जीवन त्या देहाचं, पण आत्म्याच्या दृष्टीने सर्व फल संपवून आत्मा अविनाशी तत्वाकडे परत गेला असेल. त्यासाठी एक जन्म व एक देह खर्ची पडला.
आता त्या कोमात असलेल्या शरीरात सुप्त मनात काय भाव असतील ते फक्त ईश्वर जाणे. पण आपण सर्वसामान्य स्थितीत आहोत. भोग भोगून त्याचं कर्मफल संपवून पुढच्या कर्मफलासाठी सिद्ध होऊ शकतो, नव्हे व्हावं लागतं. पण हे भोग आहेत ही जाणीव झाली तरच पुढे उपाय काय यावर विचार करू शकतो. पण त्यासाठी कर्मफल या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या वाट्याला त्याच्या वाटचेच कर्मफल येतात हे मनात योजून ठेवा.
कोणी यावर म्हणेल की एखाद्यावेळी पूर्ण कुटुंबाला भोग भोगावे लागतात. पण यात हे सिद्ध होतं की ते भोग सर्वांचे होते ते त्यांना एकत्र आणून काळाने एकत्र भोगायला लावले. म्हणजे त्यांचं एकत्र येणं हे देखील त्यांच्याच पूर्वीच्या कर्मफलाचा भाग होतं वा आहे. कदाचित ज्या कर्माचं फल ते भोगत आहेत, त्या पूर्वकर्मात त्यांचा एकत्र सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुटका सुद्धा कर्माचा जितका हिस्सा तितका काळ भोग .
आपण या सर्वात फक्त भोग गृहीत धरूनच बोलतो आहोत कारण ते करतानाच मनुष्य नशीब, प्रारब्ध यांना दोष देतो. संचिताचा विचार नकारात्मक परिस्थितीतच माणूस करतो. जस तोटा यायला लागला की त्या तोट्याची कारणमीमांसा केली जाते. नफातोटा पत्रकाचा सखोल अभ्यास करून कारण शोधलं जातं.
ज्यावेळी कंपनी फायद्यात असते त्यावेळी पुढचा विचार, पुढच्या योजना यांचा विचार होतो. पण तोटा यायला लागला की मागची नफातोटा पत्रकं काढून त्यांचा अभ्यास होतो. त्यावेळी पुढचा विचार होत नाही. पण काही कंपनीचे सुज्ञ मालक व प्रबंधक दोन्ही कामं एकत्र करतात आणि त्यासाठी दोन्ही विषयातील तज्ञ व अनुभवी नेमून कंपनीची प्रगती होईल याची काळजी घेतात.
त्याचप्रमाणे आपण सर्वसामान्य नकारात्मक परिणाम, भोग, नुकसान व्हायला लागलं की, नशीब, प्रारब्ध , ग्रहमान यांचा विचार सुरू करतो. पण खरं विवेचन केल्यावर लक्षात येतं की या सगळ्याचे निर्माते आपणच आहोत. आता आपण आपल्या पूर्वकर्माने प्राप्त फलाचं विवेचन करायला सुरवात करूया. म्हणजे देह, मन आत्मा, कर्म, प्रारब्ध, फल या सर्वात इच्छा, आकांक्षा, वासना, तृप्ती- अतृप्ती, शांतता, समाधान या सगळ्यापलीकडे निर्मोहित्व, साध्य, साधन, साधक, साधना, भोगमुक्ती, त्याचे मार्ग या सर्वाचा उहापोह, विस्तृत विवेचन व विश्लेषण करता येईल. जेणेकरून आपण सर्व गोष्टी डोळसपणे, सूज्ञपणे बघायला सुरवात करू शकतो. त्यातूनच पुढचा आत्मोन्नतीचा मार्ग मिळू शकेल.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१३/१२/२०२०
Comments
Post a Comment