Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ३४

श्रीरुक्मिणी स्वयंवर ३४ ( पाचवा प्रसंग समाप्त) 

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
मूळ दीन चेहरा असलेला ब्राम्हण समोरून येताना रुक्मिणीने पाहिले. अर्थात कृष्ण रूपाचे दर्शन झालिया वर त्या चर्येचे पालटलेले स्वरूप रुक्मिणीच्या त्वरित ध्यानात आले. जिथे जीवाची शाश्वती राहात नाही , भक्त संकटात सापडतो आणि रक्षणासाठी कोणीही नसतं त्या वेळी देव स्वये धावून येतो. याच जाणिवेने , 

जसे मृत्यूपंथी गेलेल्या जीवाला अमृत मिळाल्यावर वा अवर्षणात मेघवर्षाव झाल्यावर किंवा दुष्काळात असलेल्याला मिष्ठांन्न भोजन प्राप्त मिळाल्यावर, वा मोहाच्या अंधारात विवेकाचा मणी हरवल्याच्या स्थितीत कृष्णआगमनसुखाचा दीप लावल्यावर, जी स्थिती होईल तद्वत अवस्था रुक्मिणीची , त्या द्विजाला पाहून झाली. 

द्विजवर रुक्मिणीच्या समीप आला आणि वदता झाला. 

" आता तुला भिण्याचे काहीही कारण उरले नाही. मी स्वतः अनंताच्या सोबत गरूडध्वज रथातून बसून येथे आगमन करता झालो आहे. त्यांनी तुला वरण्याचे वचन दिले आहे. तुझी पत्रिका स्व नयने वाचून, संतोष पावून अतिशीघ्र प्रस्थान ठेवून येथे पातला आहे. आता अधिक कष्टी न होणे. भेटीची वेळ समीप आली आहे , याचाच मात्र विचार करावा." 

द्विजाच्या या शुभ बोलांनी निस्तेज रुक्मिणी सतेज उल्हसित झाली, हरखून गेली आणि तिला काही सुचेनासे झाले. काही क्षणांपूर्वी जगण्याची आस सोडून बसलेली रुक्मिणी अचानक मृगवर्षाव व्हावा आणि ग्रीष्मात तप्त झालेल्या धरणीची स्थिती  वेगे बदलून जावी, त्याचप्रमाणे द्विजाचे बोल ऐकून रुक्मिणीची मनःस्थिती व शारीरिक स्थिती पूर्ण पालटून गेली. आधी भीतीने थरथरणारे अंग, आता भेटीच्या कल्पनेने रोमांचित झाले. ज्या द्विजाने मला मृत्यूमुखातून अमृतप्राशन करविले त्या द्विजास आता काय द्यावे जेणेकरून त्याच्या उपकारातून उपकृत होता येईल. 

शिष्याला त्याच्या ध्येयाप्रत पोचवलेल्या सद्गुरूला सत शिष्याने काय दिले म्हणजे उपकार ओझे उतरेल, वा काय पदार्थ सादर केला असता सद्गुरुंच्या कृपेचे परिमार्जन होईल याबद्दल प्रत्यक्ष वेदही निःशब्द आहेत. अगदी शिष्याने जीव ओवाळून पायी वाहिला तरी त्या नश्वर देहाला घेऊन सद्गुरू काय करणार हा देखील एक विचार आहेच. मग असे काय दिल्याने सद्गुरू संतोषेल ते मी या द्विजास देते. या विचाराने रुक्मिणीने आपला माथा त्या द्विजाच्या चरणांवर ठेवत त्याचे  चरण अश्रूंनी भिजवून टाकले आणि वदती झाली

" माझ्या जिवाच्या जीवलगाला घेऊन आलेले तुम्ही मज शतजन्मांच्या पुण्यराशींचे फल घेऊन आला आहात. माझ्या या देहाचे चर्म जरी आपल्या चरणी वाहिले तरीही त्या उपकारातून मी कधीही मुक्त होऊ शकत नाही. म्हणून मी आपल्या या ऋणात आजन्म राहू इच्छिते."

श्रीकृष्णाच्या आगमनाने रुक्मिणीला झालेला आनंद चरिधाम, तिन्ही लोक, सप्त पातळ, सप्त स्वर्ग व्यापून उरला होता. आता अंबेदर्शनाच्या समयी कृष्ण रुक्मिणीहरण करणार हे निश्चित झाले. काय घडेल , कसे घडेल ते वाचकजनहो पुढील भागात पाहूच. 

या ठिकाणी स्वयं श्रीहरी , जनार्दन स्वामी आणि  नाथमहाराज यांच्या कृपेने पाचवा प्रसंग समाप्ती होत आहे

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 

ll शुभम भवतू ll

ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll

०२/०१/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...