Skip to main content

श्रीरुक्मिणी स्वयंवर ७५ (विवाहसोहळा ३)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ७५ (विवाहसोहळा ३)

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll

इकडे मंडपात, वऱ्हाडी निघाले , ते आता पोचतील या आणि अश्या प्रकारच्या वार्तांचा पूर आला.  वधू मातापिता आणि वधुकडील सर्व मंडळी या युगातील व युगायुगातील सर्वात पूजनीय वर अर्थात श्रीकृष्ण याचे वररूपातील सजलेले, नटलेले स्वरूप पाहण्यास अत्युत्सुक होते. जस जश्या वार्ता येत होत्या तस तशी स्वागत व पूजन व्यवस्था,  त्याची चाचपणी, आढावा, तालीम या सर्व गोष्टींना जोर चढला. 

राजा भीमक आणि राणी शुद्धमती सोन्याचं तबक त्यात सुवर्ण निरांजन सोन्याच्या कोयरीत खास तयार केलेलं हळदकुंकू घेऊन सज्ज होऊन मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारा वर सावधान पावित्र्यात उभे होते. गंगा, यमुना, सिंधू, सरस्वती, कावेरी, नर्मदा यांसह सप्त नद्यांचे जल चरण धुण्यास्तव आणले होते.  सोबत राजपरिवारा तील इतर सदस्य त्यामागे मंत्रीगण व त्यांचे कुटुंबीय असे सर्वजण कृष्णाचं राजस रुप पाहायला उत्सुक होते. सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. 

यथावकाश वाजतगाजत वऱ्हाड विवाहस्थानी पोहोचलं. सर्वात मध्ये असलेल्या वर, वरमाई देवकी , वरपिता वसुदेव,  आजोबा उग्रसेन, करवली सुभद्रा, दादा श्रीबलराम आणि वहिनी रेवती यांना वऱ्हाडी मंडळींनी पुढे येण्यास मार्ग करून दिला. राजा आणि राणीने वरासह सर्व मंडळींचं क्षीर जल त्यांचं पाद्यपूजन करून त्यांना रीतसर विवाहासाठी मंडपात येण्याचं आमंत्रण दिलं. आलेल्या प्रत्येक वऱ्हाडी मंडळींना मौल्यवान भेटी देऊन, गौरवून आत प्रवेश करण्याचं आमंत्रण दिलं जातं होतं. वऱ्हाडातील प्रत्येकाला सुवासिनींनी ओवाळून त्यांचं फुलं ,पुष्पगुच्छ देऊन सुवासिक जल पोक्षून स्वागत केलं गेलं. 

चारही मुक्तीचा भव्य चौक तयार  करून त्यात चारही पुरुषार्थ चौरंगासनरूप होऊन श्रीकृष्ण आसनस्थ होण्याची वाट पहात होते. श्रीकृष्णाचं आजचं रुपडं विधी , विधाता, विधान, स्वये देवी शारदा आणि श्रीगणेश हे लिहिण्यास शब्द शोधत होते. निजानंदी लिप्त, तरी जगतव्याप्त जगदीश्वर, जगातील सर्व सात्त्विकता , तेज, ओज आणि प्रभा एकत्र करून आज प्रकट झाला होता. कृष्णरुप पंचमहाभूतस्वरूपाच्याही पार दिसत होतं. याचकारणे राजा भीमक विस्मयीत होऊन पहात होते. 

जगतपती आज अद्भुत खेळ करत होते. राजाला सर्वत्र कृष्णरुप दिसत होतं. जळीस्थळी , प्रत्येक व्यक्तीच्या ठायी राजाला कृष्णच कृष्ण दिसत होता आणि विस्मयीत होऊन पुनः पुनः डोळे मिटून उघडून पाहात होता. कोणत्या कृष्णाचं पूजन करावं हे कोडं न उलगडल्याकारणे अजूनच स्तंभित होत होता. परंतु बाजूला उभ्या राणी शुद्धमतीने चांदीच्या पात्रात कृष्णाला चरण ठरवण्याची विनंती करून  कृष्ण चरणांवर आधी भक्तीचे उदक नन्तर श्रद्धेचे क्षीर तद्नंतर पुनः अर्चनेचे उदक प्रक्षाळून कृष्णचरणी आपली सर्व पुण्याई अर्पण केली. ते देखून राजा भानावर आला आणि राजाने कृष्ण चरण पुसून पुनः एकवार राणीने कृष्णचरण जला भिषेकाने तीन वेळा धुवून तिन्ही वेळा राजाने शुद्ध सात्विक भावातील उपरण्याने स्वच्छ करून घेतले. 

कृष्णचरणांवर प्रोक्षण केलेले जल आणि क्षीर आपल्याच पुण्याईवर लुब्ध होऊन हरखून गेले. मुळात कृष्ण दर्शन दुर्लभ त्यात कृष्णमूख दर्शन त्याहून दुर्लभ आणि कृष्णचरण प्राप्ती युगायुगांच्या तपस्येनंतरही  असाध्य. परंतु क्षीर आणि उदक यांना ते भाग्य सहजी उपलब्ध झाले. अर्थातच गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा , सिंधू, कावेरी यांसह सप्त नद्यांचे जल आज पुण्यपद प्राप्त करते झाले. अर्थात राजा राणी यांसह सर्वांनी त्या चरणतीर्थाचे प्राशन केले. 

क्रमशः 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
१७/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...