Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ६७

श्रीरुक्मिणी स्वयंवर ६७ (प्रसंग द्वादश समाप्त) 

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll

रुक्मिणीने कृष्णाचे चरण धरून त्याला गदगदा हलवून, विनवणीच्या व आर्जवाच्या स्वरात रुक्मिणी बोलली. 

" हे यदुनाथ , सूर आणि असुर या दोहोंनाही तू दुर्धर आहेस , म्हणजेच असाध्य आहेस, योगीयांमध्ये योगेश्वर आहेस, विश्वाचा नियंता आहेस , वेदांनाही तुझा पार लागण महाकठीण आहे. तू समस्त जगताला व्यापून स्वये उरला आहेस, तूच निर्माता आणि तूच ध्वंसकर्ता आहेस. तू सर्वशक्तिमान आहेस, तूच जगदोद्धारकही आहेस. अश्या या तुझी हेटाळणी करून, तुझी निंदानालस्ती करून, पित्याच्या इच्छेला व वाचनांना न जुमानता तुला मारायला, तुझ्याशी युद्ध करायला आलेला हा माझा ज्येष्ठ भ्राता अहंबुद्धी , नक्कीच अपराधी आहे. 

अश्या या अवगुणी आणि अवलक्षणी पुत्राला या रणात मारशील तर माझी माय, अर्थात माझी आई तत्क्षणी प्राण सोडेल, त्याने माझी हेटाळणी होईल आणि माझं माहेर कायमचं तुटेल. ज्या देहातून आणि ज्या मुखातून तुझी निंदानालस्ती केली गेली, ते मुख तू विद्रुप कर पण माझ्या बंधुला मारू नकोस" 

अशी विनवणी करत हमसून हमसून रडणाऱ्या रुक्मिणीने हरिचरण शब्दशः अश्रूंच्या जलधारांनी न्हाऊन काढले. त्या उष्ण उदकाचा उचित परिणाम झाला. कृष्ण मुखावर स्मित झळकले आणि त्याने रुक्मिणीकडे वाकून पाहिले. तिला तसे रडताना पाहून कृष्णाचे मन द्रवले त्याने तिला उचलून आलिंगन दिले आणि श्रीकृष्ण म्हणाला

" हे रुक्मिणी तुझ्या इच्छेनुसारच होईल. व्यर्थ चिंता नको करुस. पण तू म्हटल्याप्रमाणे याला विद्रुप तर करणार परंतु मारणार नाही. आता याचं केशवपन करावयास जल कुठून आणायचं. कारण इथे कुठेही जवळपास आड वा विहीर दिसत नाहीये." 

असे विनोदाने स्वतःच बोलत श्रीहरी हसला आणि इतके बोलून श्रीकृष्णाने रुक्मिची अर्धी मिशी आणि डोक्यावरील पाच ठिकाणी केस कापून जसे की पाच पाट तयार केले डोक्यात आणि रुक्मिला विद्रुप केले. तद्नंतर त्याला रथाला बांधून बंधू बलीभद्र यांजकडे नेण्यास सुरवात केली.  वाटेत श्रीकृष्ण रुक्मिणीस म्हणाले 

" रुक्मिणी बघ आपल्या बंधूंचे वदन , इतके सुंदर मुख दिसत आहे की याची दृष्ट काढून टाकली पाहिजे" 

इकडे हळू हळू रथ हाकत हाकत सारथ्याने रथ ज्येष्ठ भ्राता श्रीबलराम यांच्या पाशी आणला. ते सर्व पाहून श्रीबलरामानी रुक्मिला रथापासून सोडवला आणि त्याला त्याच्या सैन्यापर्यंत नेऊन सोडण्याची आज्ञा केली.  

रुक्मिणीकडे पाहत श्रीबालरामांनी रुक्मिणीस या सर्व दुर्धर , कटू आणि क्लेशदायक प्रसंगातून झालेल्या त्रासातून तिच्या मनाला बाहेर काढण्यासाठी उद्बोधक असा परिहार प्रबोध अर्थात उपदेश केला. त्याचा परामर्श आपण पुढील भागात घेऊ. 

या ठिकाणी स्वयं श्रीहरी , जनार्दन स्वामी आणि  नाथ महाराज यांच्या कृपेने द्वादश प्रसंग समाप्त होत आहे. पुढे प्रसंग  त्रयोदश. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
०८/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...