Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ८२ (विवाह सोहळा १०)

श्रीरुक्मिणी स्वयंवर ८२ (विवाहसोहळा १०)

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
 आता लग्नविधी यथोचित सुरू झाले. प्रथम श्रीगणेश जे प्रत्यक्ष तिथे हजर होते, त्यांचे पाद्यपूजन स्वये वसुदेव भीमक आणि जगतपती कृष्णाने केलं. त्यास वस्त्रअलंकार देऊन गौरविण्यात आलं. या सन्मान आणि पूजेने प्रत्यक्ष श्रीगणराय संतुष्ट झाले आणि प्रसन्न होऊन निर्विघ्न कार्याची ग्वाही देते झाले. त्यानंतर कलश पूजन झाले. 

तदपश्चात वसुदेव अर्थात श्वसुर यांनी भीमकीचं पूजन केलं. तिला वस्त्र व अलंकार दिला. रुक्मिणी अर्थातच ते घेऊन वस्त्र अलंकार परिधान करण्यास आत गेली. ती येईपर्यंत इकडे कृष्णाचं पूजन चरणांवर जलक्षीर अभिषेक करून राजाने केले. श्रीकृष्णाला श्रीफळार्पण केले. सासर कडून मिळालेलं वस्त्र आणि अलंकार परिधान करून रुक्मिणी आली आणि तिच्या स्वरूपाने पुनः कृष्णावर मोहिनी घातली, जी साऱ्यांनी कृष्णाच्या नजरेत पाहिली. 

शुद्धमती कृष्णाला तेलवण  घेऊन आली. त्यासाठी खालील प्रकारचे लाडू शुद्धमती घेऊन आली. तिवळ्यांचे, चारोळ्याचे , खसखसीचे, अष्टदल कमळ बीजांचे , फणसाचे , बोराचे असे अनेक प्रकारचे लाडू , अनेक प्रकारच्या करंज्या व कानोले करून घेऊन शुद्धमती कृष्णाचं तेलवण करते आहे. इतक्यात पुरोहितांनी आवाज दिला की तेलवणाला इतका उशीर झाला तर मुहूर्त टळून जाईल, त्यामुळे लगोलग उरकण्यात आलं.

पुरोहितांच्या या वाक्यासरशी लगबग पुन्हा वाढली आणि सात्विकतेचा श्वेत वारू अर्थात अश्व आणला गेला त्यावर कृष्ण स्वार झाला. अष्टभावांनी दोन्ही बाजूनी तो वारू धरलेला आहे.  चारही बाजूनी अष्टवसु , श्रुतिस्मृती छत्र , पताका, चामरे रत्नजडित दंडावर घेऊन ढाळत  सोबत चालत आहेत. वाद्यांचा गजर सुरू झाला. त्यावर अष्टमहासिद्धी स्वतः नृत्य करत आहेत. जनसामान्य मोहित होऊन हे दृश्य पहात आहेत. 

ऋग्वेदासह चारही वेद स्वतः गायन करत आहेत आणि त्यांच्या गायनाने ब्रह्मांड डोलत आहे. शांती क्षमा  दया या सुवासिनी कृष्णासवेत चालत आहेत. करवली सुभद्रा , वहिनी रेवती, वसुदेव , देवकी , उग्रसेन आणि सर्वांपुढे श्रीबलराम आपापल्या रथात आरूढ होऊन वऱ्हाडात अग्रभागी आहेत. सर्व यादव नरनारी वेगवेगळ्या वाद्यांच्या गजरावर नृत्य करून कृष्ण रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याचा आनंद लुटण्यास निघाले आहेत. 

यादवांचे प्रमुख पाहुणे व योद्धे यांना विशेष करून खास निवडलेले अश्व,  रथ आणि गज देऊन त्यावर बसवून वऱ्हाड निघालं.  नृत्य वादन गायन जल्लोष हर्ष अष्ट सकारात्मक  वृत्ती स्वतः जातीने हजर आहेत. त्यामुळे सर्वत्र  भारलेपण आहे आणि आता वऱ्हाड विवाहस्थळी निघालं आहे. सर्वांना आता प्रतीक्षा आहे प्रत्यक्ष विवाहाची. स्वर्गातून देव देवी यक्ष किन्नर ब्रम्हदेव कैलासेश्वर सपत्नीक आतुर आहेत लग्नाच्या
या सोहळ्याचा आनंद लुटण्यास. 

क्रमशः 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© ®  संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
२४/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...