Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ६६

श्रीरुक्मिणी स्वयंवर ६६

llश्रीगणेशाय नमःll
  llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll       
    llश्रीएकनाथ महाराज कि जय ll

कृष्णाने तोमर नष्ट केल्यानंतर रुक्मि शक्तीअस्त्र घेऊन आला. हातात शक्ती धरून कृष्णाला म्हणाला "आता यापुढे तुझा काय पाड लागतो ते दाखवच." कृष्णाने जे जे बाण मारले ते ते शक्ती अस्त्राने परास्त केले. मग कृष्णाने तिधारा अस्त्र लावून बाण मारला. ज्यामुळे बाणांचा पिसारा तयार झाला. ज्याच्या माऱ्याने रुक्मि जवळ जवळ बारा पावलं मागे उडाला आणि शक्तीअस्त्र त्याच्या हातून उडून आंबरात निघून गेलं, अर्थातच ते अस्त्रही प्रभावहीन झालं. 

त्यानंतर कृष्णाने खवळून बाणांचा तिखट मारा सुरू केला आणि रुक्मिचे सैन्य कापायला सुरवात केली. त्याच्या बाणांच्या माऱ्याने रुक्मिचे अनेक वीर,  महावीर धरेला मिळाले. धक्क्यातून सावरलेला रुक्मि हे दृश्य पाहून अत्यंत क्रोधीत झाला. रागाने लाल होत त्याने खड्ग आणि वोडण अर्थात ढाल हाती घेऊन रणात प्रवेश केला. एका हातातील वोडण आणि खड्ग विद्युत वेगाने फिरवत पताकेसमान मिरवत खड्गधारी रुक्मि पुढे पुढे येऊ लागला. कृष्ण जे जे बाण मारत होता ,  तो तो प्रत्येक बाण रुक्मि वोडणाने अडवून परतवत होता. 

वेगाने पुढे येत रुक्मिने चार अश्वाच्या रोखाने येण्यास सुरुवात केली. अर्थातच अश्वाना मारण्याच्या उद्देशाने. दारूक सारथ्याने रथाखाली त्याला घेऊन मारण्याचा प्रयत्न केला. कृष्णाने चपळाईने तीक्ष्ण बाण  मारला. रुक्मिने वोडण पुढे करत तो अडवण्याचा प्रयत्न केला , परंतु बाणाची तीव्रता आणि भेदकता इतकी होती की वोडण उडवून रुक्मिचा मुकुट धरेवर पाडला.  अजूनच क्रोधाने लाल झालेला रुक्मि मोकळ्या केसानेच कृष्णाच्या दिशेने धावला. 

वाटेत त्याने हातातून पडलेले खड्ग आणि वोडण हाताने उचलून कृष्णाकडे वेगात निघाला. धावता धावता म्हणाला 

" थांब कृष्णा आता या खड्गाने तुझ्या मस्तकाचे तुकडे उडवतो." 

इतक्यात कृष्णाने बाण धनुष्यास जोडून रुक्मिच्या दिशेने सोडला. वोडणाचे तिळासम तुकडे झाले तर खड्गाचे अणूसमान तुकडे झाले. कृष्णाने मग तिखट बाणांचा वर्षाव करत रुक्मिला रणांगणात बराच वेळ पळवला. कृष्ण बाण मारतोय, रुक्मि पळतोय आणि त्यामागे कृष्णाचा रथ धावतोय. 

बराच वेळ यात गेल्यानंतर दमलेला रुक्मि थांबला. त्याबरोबर कृष्ण रथातून वेगात उडी घेत खाली उतरला. थांबलेल्या रुक्मिच्या गळ्यात धनुष्य घालून त्याची मान अडकवली. त्याला फरफटत रथापाशी आणला. कृष्ण क्रोधाने, रक्तवर्णी डोळ्यांनी आणि नजरेतील ज्वाळानी रुक्मिकडे पाहात होता. रथाजवळ येताच त्याने रथातून गदा काढली, उचलून म्हणाला 

"आता तुझ्या मस्तकाच्या चिंधड्या उडवतो." 

त्याच्या या अवताराने रुक्मिणी थरथर कापायला लागली. तिने कृष्णचरणी माथा ठेवला आणि म्हणाली 

"हे नाथ याला मारू नका, याचा वध करू नका." 

कृष्ण रुक्मिणीला वदला

" रुक्मिणी तू बाजू हो, मध्ये पडू नकोस. याने सर्व मर्यादांची सीमा ओलांडली आहे. आता हा दयेस पात्र नाही. " 

इतके बोलून कृष्णाने हातातील शस्त्र रुक्मिवर धरून हात उगारला. रुक्मिणीने कृष्णाचे चरण धरून त्याला गदगदा हलवून, विनवणीच्या व आर्जवाच्या स्वरात रुक्मिणी बोलली. 

ll स्वामी जनार्दन शिष्य शब्दब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय ll 
ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परमानंदम कृष्णम्  वंदे जगतगुरुं ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
ll श्रीकृष्णार्पणमस्तू ll
०७/०२/२०२०
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...