Skip to main content

भोग आणि ईश्वर ५६४

भोग आणि ईश्वर  ५६४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
आपण काल सद्गुरू किंवा पुण्यात्मे काय करू शकतात याचं एक उदाहरण पाहिलं, ते म्हणजे वाल्मिकी ऋषींच. याचं संदर्भात, विषय पुढे नेण्या आधी, अजून उदाहरणं बघता आली तर पाहूया. यात खूप महत्वाचं उदाहरण म्हणजे, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या तोंडून वेद म्हणवून घेतले, त्या रेड्याचा त्यांनी, मानवेतर देहात असूनही, मस्तकी कृपेचा हस्त ठेवून, त्या फक्त स्पर्शाने, उद्धार केला. 

कारण एकदा पुण्यात्म्यामे कृपेचा आशिष देऊन, एखाद्या जीवाच्या देहाला स्पर्श केला, की त्या स्पर्शातून, त्या देहात उतरणाऱ्या दिव्य लहरी, त्या देहात वसलेल्या आत्म्याला, त्याच्या सर्व पापातून, कर्मातुन, कर्मभोगातून मुक्त करू शकतात. कारण त्या दिव्य सत्पुरूष स्पर्शातून जी दिव्य स्पंदन बाहेर पडतात, त्याने त्या देहाची आणि त्या आत्म्याच्या प्रारब्धात जमा असलेली सर्व अनिष्ट कर्मफलं आपोआप नष्ट वा जळून खाक होतात. याचं महत्वाचं कारण म्हणजे, अश्या सत्पुरूषांच्या आत्म्याच्या गाभ्यातून, फक्त सात्विक, दिव्य आणि पुण्यवान लहरी बाहेर पडतात.

त्यांच्या वृत्तीत कोणताही किंतू परंतु, द्वेष मत्सर आदी भाव अणुमात्र सुद्धा नसतात, त्यामुळे त्यांच्या मनात उत्पन्न होणारे भाव आणि त्या भावातून, प्रकट होणाऱ्या लहरी व स्पंदनं ही अत्यंत ऊर्जा व शक्तियुक्त असतात, ज्यामुळे, त्या अग्नियुक्त असतात. अर्थात साधक, भक्त, कृपाभिलाशी यांच्यासाठी त्या अतीशीतल व गुणकारी असतात. म्हणून त्यांचा सकारात्मक परिणाम साधकांवर, तर अग्निमय परिणाम अनिष्ट कर्म, कर्मफल, पापयुक्त दृष्टी असलेले, दुष्ट दुर्जन, यांच्यावर होतो. 

ही त्या सद्वृत्ती युक्त, सत्पुरुष, दिव्य व पुण्यवान व्यक्तींच्या आत्मतेजाची प्रचिती असते. मुळात यांच्या आत्मनेत्रांना प्रत्येक जीव समानच असतो. पण तरीही, जे निरपेक्ष, निरागस आणि सत्प्रवृत्त साधक वा सामान्यजन असतात, त्यांच्याबाबत कृपायुक्त अंतःकरणाने, पाहताना अनायासे,जे जीव अश्यांना निष्कारण त्रास देतात, त्यांच्या साठी त्या दिव्य लहरी अग्नी वा शस्त्रासम होतात. ही त्या लहरींची शक्ती असते. म्हणूनच असे दिव्यात्मे, शक्य होईल तितकं शांत राहून, वाईट वा रागयुक्त प्रतिक्रिया सहसा देत नाहीत किंवा टाळतात. 

पण अगदीच नाईलाज झाला तरच किंवा साधक व भक्त हिताचा परिणाम म्हणून काही अप्रिय घडलं, तरी भक्त हीतार्था ते योग्यच ठरतं. म्हणूनच प्रत्येक साधकाचं किंवा सन्मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीचं कर्तव्य आहे की, आपल्या, सद्गुरुंवरील श्रद्धा व दृढ विश्वास नेहमी एकाच समान पातळीवर राहील, याची दक्षता घेतलीच पाहिजे. 

आपले सद्गुरू किंवा ईश्वर, आपला ऐकत नाही किंवा भलं करत नाही किंवा आपल्याला त्रास देणाऱ्या एखाद्या व्यक्तीला, शिक्षा करत नाहीत, म्हणजे त्यांचं आपल्याकडे लक्ष नाही, असा त्याचा अर्थ घेता कामा नये. तर, त्यांना सदर व्यक्तीचं वाईट व्हावं अशी मनोमन इच्छा नाही. याचा दुसरा अर्थ असा आहे की, त्याला सुधारण्याच्या अश्या अनेक संधी देऊन, ते परम कृपाळू पणाचा प्रत्यय व परिचय देतात. 

त्याहूनही मुख्य हे ध्यानात ठेवावं की, त्यांना प्रमादाची शिक्षा द्यायला एक क्षणसुद्धा लागणार नाही. पण त्यात, सदर व्यक्तीला एकदा शिक्षा झाली की, जन्म जन्माच्या साखळीत, ती व्यक्ती खूप मागे फेकली जाऊ शकते. जे, त्यांना टाळायचं असतं. म्हणजे एकाला वाचवताना, दुसऱ्याला अती मागे फेकावं लागू नये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे, आपल्या निष्ठेची, भक्तीची आणि श्रद्धा व विश्वास यांचीसुद्धा परीक्षा पहावयाची असते. 

या विषयाचे अजून काही पैलू आपण पुढील लेखात पाहूया. तोपर्यंत आपला नामाचा नेम सुरूच राहू दे. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१७/०६/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...