Skip to main content

मेरी आवाजही पहचान है, गर याद रहे !!!

मेरी आवाजही पहचान है, गर याद रहे !!! 

आमच्या जन्माच्या दोन दशकं आधीपासून जन्माला आलेल्या सर्वांनी, कळायला लागल्यापासून, जो आवाज ऐकलाय आणि त्यांच्या, नित्य परिचयाचा झालाय,  तो आज लुप्त झाला. एका प्रचंड व्यासाच्या वर्तुळाचा, तीनशे साठ अंशांचा प्रवास आज शून्यावर येऊन समाप्त झाला. 

इतकी गीतं इतकी वर्षे आणि तितक्याच ताकदीने गाणं व गातच राहणं, हे नक्कीच तपसाधनेचं फलित आहे, यात शंका नाही. एका अद्भुत आणि विलक्षण प्रतिभेची धनी आणि त्या प्रतिभेला सार्थ स्वरांचा आलेख, रेखाटलेलं व्यक्तित्व असलेल्या भारतरत्न लता मंगेशकर अर्थात लतादीदी. 

आवाजाची दैवी देणगी आणि त्या देणगीला अग्निदिव्याचं परिसस्पर्शस्वरूप खडतर असं सुरुवातीचं आयुष्य. नूरजहाँ, शमशाद, मुबारक आणि सुरेय्या अश्या चार प्रस्थापित आणि प्रचंड वेगळ्या धाटणीच्या आवाजाच्या काळात येऊन, संधी मिळवणं हेच दिव्य होतं. त्यातही पंजाबी वर्चस्व असलेल्या सिनेसृष्टीत, एका सामान्य मराठी कुटुंबातून येऊन, स्थान मिळवण्यासाठी झगडणं, हे कल्पनातीत आहे. असं म्हटलं जातं की, नूरजहाँ पाक निर्मितीनंतर जर पाकमध्ये गेली नसती तर, लतादीदींनी येणं वा प्रस्थापित होणं कठीण गेलं असतं. 

माझं मत वेगळं आहे. वास्तविक असं म्हणणं म्हणजे दिदींच्या आवाजाच्या कुवतीवर व गाण्याच्या ज्ञानावर शंका घेण्यासारखं आहे. पण दिदींचा आवाज, संगीताचं ज्ञान, जाण आणि प्रतिभा स्वर्गीय होती. त्यामुळे कोणतीही अडचण वा अडथळा त्याला अडवूच शकला नसता. 

दिदींचा आवाज हा प्रत्येक गाण्याला,  त्या गाण्याच्या भावाला, त्याच्या स्वरसाजाला, त्या गाण्याचे शब्द, त्या शब्दांचे उच्चार, सुरावटींची स्पष्टता, चित्रपटातील त्या गाण्याची situation यासाठी  इतकं उच्च दर्जाचं होतं की, वास्तविक भूलोकीची शान व कीर्ती वाढवायला आणि भूलोकीचं भूषण ठरावं, यासाठी, ईश्वराने, आपल्या स्वरातील एक स्वर, काही वर्षांसाठी, भूलोकी पाठवून दिला. दिदींचं कोणतंही गाणं घ्या,स्वरांचं, सुरांचं किंवा गाण्याच्या शास्त्राचं कोणतंही ज्ञान वा गंध नसलेला सामान्य माणूस, त्यांच्या गाण्यातील प्रत्येक स्वरांचा, प्रत्येक हरकतीचा, आलापाचा, छोट्या छोट्या जागा यांचा आनंद सहज घेऊन, त्या गाण्यात रंगून जाऊ शकत होता. 

ती ताकद त्या स्वरात होती. त्या स्वरांच्या देणगीमागे, दिदींची स्वतःची मेहनत आहेच, ती दुर्लक्षून चालणार नाही. त्या आवाजाची जातकुळी इतकी सर्वोत्तम होती की, गानकोकिळा, स्वरसम्राज्ञी भारतरत्न या उपाधी आणि पदव्या गौरवल्या गेल्या, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. जन्माला आल्यापासून दिदींशिवाय भारतीय सूर व स्वर विश्वाची कल्पना करणं, मुश्किल आहे. 

अजून एक वैशिष्ट्य दीदी आणि समस्त मंगेशकरांचं आहे आणि ते मांडल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊच शकत नाही, ते वैशिष्ट्य म्हणजे त्यांची प्रखर सावरकरभक्ती. त्यांचं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर असलेलं निस्सीम प्रेम, अमर्याद आदर त्यांनी गायलेल्या सावरकरांच्या गीतातील प्रकट भावातून जाणवतो. सागरा प्राण तळमळला, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा ही सावरकरांची गीतं आजसुद्धा अंगावर शहारा आणतात. त्या गाण्याला सुयोग्य न्याय संगीतातून हृदयानाथजींनी आणि योग्य भावाच्या माध्यमातून दीदींनी आपल्यापर्यंत पोचवलं. 

कोणत्याही गाण्याला त्या गाण्यात, गीतकार, चित्रपटा तील परिस्थिती व पार्श्वभूमी याला अनुसरून आवाजाची चढउतार, पोत, स्वर सूर या माध्यमातून ते पेश करण्याची विलक्षण हातोटी दिदींकडे होती. मला स्वतःला वाटतं की, जोपर्यंत, संगीत आहे,  गाणं आहे तोपर्यंत, म्हणजेच शतकानुशतके दिदींचा आवाज या जगतात जीवंत राहील. वयाच्या साधारण पाच सहा वर्षांपासून आजपर्यंत म्हणजे जवळजवळ पन्नास वर्षे आम्ही दिदींना पाहत आलोय, ऐकत आलोय. आम्ही याबाबतीत भाग्यवान आहोत. पण खात्रीने सांगतो की, आजपासून एक दोन शतकं नन्तर, कदाचित लतादीदी नावाचा चमत्कार या भारतात होऊन गेला, अशी कथा नक्कीच सांगितली जाईल. 

लतादीदींचा या पवित्र आणि गंधर्वांसम प्रतिभा असलेला आत्मा आज या भूलोकाला सोडून गेला. खरतर आज सुरांचीच दुनिया नव्हे तर अवघं जगत एका गंधर्व स्वराला पोरकं झालं. 

मेरी आवाजही पहचान है, गर याद रहे !! 

लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली !! 

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले 
०६/०२/२०२२
१३:१५

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...