Skip to main content

भोग आणि ईश्वर ४४३

भोग आणि ईश्वर  ४४३  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

कालचाच विषय पुढे नेताना, आतापर्यंत हे लक्षात आलं असेल की, एखाद्या विषयाचं, एखाद्या गोष्टींचं ज्ञान असेल, तर आपण त्याबाबत निश्चिन्त असतोच, पण आपण दुसऱ्यांनासुद्धा सावध करू शकतो. त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे आपण स्वतः त्याबाबत निश्चिन्त असतो. आपण कोणतीही घाई वा नसती उठाठेव करत नाही. 

म्हणजेच मन शांत असतं आणि मनाला अविचल करणारे तरंग वा लहरी कार्यरत होऊ शकत नाहीत. याचाच अर्थ ज्ञान आपल्या मनाला निश्चिन्त करून, मनाच्या जल प्रवाहात उठू शकणारे वा उठणारे तरंग शांत करतं. तरीही काही गोष्टींचं ज्ञान मिळून वा त्यातील धोक्यांची जाणीव करून दिली तरीही, मनाचा ओढा त्या विषयांकडे जातोच. यालाच मनाचा नैसर्गिक ओढा म्हणता येईल. कितीही ज्ञानप्राप्ती झाली अथवा धोक्याचा अंदाज किंवा क्वचित प्रसंगी अनुभव आला तरीही, मन त्यापासून धळायला तयार होत नाही. 

असा हा नैसर्गिक ओढा, सहसा विषयांचा किंवा अनिष्ट गोष्टींचा, विचारांचा असतो. याला कारण म्हणजे देहाची भूक प्रदीप्तीत करणाऱ्या गोष्टीकडे मन सहज आकर्षित होतं किंवा देहाची गरज, मनाला त्याकडे आकर्षित करते. यात मोठमोठे ज्ञानी सुद्धा अडकू शकतात. शरीराची श्वास, अन्न व पाणी या अगदी नैसर्गिक गरजा आहेत. ज्या भागणं क्रमप्राप्त आहे किंवा सर्वात प्राथमिक गरज आहे. त्यांच्यावर देहाचं अस्तित्व किंवा जगणं अवलंबून आहे. 

देहाच्या या अत्यंत गरजेच्या भुकांप्रमाणेच काम ही तितकीच महत्वाची, मात्र विधात्याने प्रजोत्पादन हे उद्देश ठेवून, निर्माण केलेली, पण मानवाला प्राणीमात्राच्या रांगेत नेऊन बसवणारी अशी ही भूक आहे. मूलतः नैसर्गिकरित्या माणसाचं प्रजोत्पादन होऊन, इतर प्राण्यां प्रमाणे मानव वंश आपोआप पुढे पुढे जात राहावा, असा यामागचा अंतिम उद्देश. प्रत्येक प्राण्याला निसर्गाने या भुकेचा ठराविक काळ वा वेळ ठरवून दिली. त्या प्राण्यां मध्ये याबाबत उत्तेजना, मात्र त्या काळात वा वेळातच होते. 

पण मानव हा एकमात्र प्राणी असा आहे की, ज्याला मन नावाचं इंद्रिय देऊन, विधात्याने, सर्वच प्रश्न जटिल केले आहेत. म्हणजे निशिदीन किंवा हरपल परीक्षा निर्माण करून ठेवली आहे. देहाची, बुद्धीची आणि मनाची भूक असा त्रिकोण निर्माण करून, त्यातून बाहेर पडण्याची परीक्षा निर्माण करून ठेवली आहे. माणसाचं बहुतांश आयुष्य किंवा त्यातील बहुतांश काळ अर्थात क्षणनक्षण या तीन गोष्टींच्या भुकांची चिंता वाहून,त्यासाठी जगण्यात आयुष्य घालवावं यात, सर्वसामान्य मानवी जीवन गुंतून पडतं. 

आता यातून बाहेर येण्यासाठी आणि या तिन्ही गरजांच्या वर मनाला नेऊन, जन्माचं हित साधण्यासाठी काय करावं आणि प्राधान्यक्रम कसा ठरवावा, यावर आपण उद्यापासून चिंतन करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१६/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...