Skip to main content

भोग आणि ईश्वर ४२८

भोग आणि ईश्वर  ४२८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

संगतीबाबत आपण बोलतो आहोत आणि आपण यातील सर्वात मोठ्या घटकाचा विचार न करताच पुढे जाऊ, असं होऊ शकत नाही. देहाचा बुद्धीचा आणि मनाचा विचार आपण केला. संगतीचा आणि संगतीमुळे या मनाची ऊर्जा  व शक्ती यात होऊ शकणारी किंवा होणारी वाढ वा घट याबद्दल चिंतन केलं. हे सर्व चिंतन नक्कीच लाभदायक ठरेल यात शंका नाही. 

पण या सर्वांच्याहीवर आणि जीवाला आत्मोन्नती व आत्मोद्धार साधून देण्याकडे वाटचाल करवून घेणारी आणि देहात असताना आणि देहातीत चैतन्यावस्थेत असतानासुद्धा सर्वात श्रेष्ठ संगती म्हणजे सद्गुरूंची संगती. यावर चिंतन केल्याशिवाय सर्वच चर्चा निरर्थक आहे, हे नक्कीच. 

आपण या जगात अनंत काळापासून ते अनंत काळापर्यंत फिरत आहोत आणि अनेकानेक जन्मांतून आपण तेच भोग, तेच दुःख, तेच देहाचं सुख, त्याच माया व रिपूंच्या स्वाधीन राहून जीवन जगतो आहोत. पण देह आणि मी हे भिन्न आहोत आणि मला या देहाच्या माध्यमातून, आत्म विकासासाठी देहधारणा देण्याचा ईश्वरी संकेत आहे, ही जाणीव येणं जरुरी आहे. अशी जाणीव फक्त सद्गुरू करून देतात. 

त्यामुळे त्या संकेतानुसार मी काही अशी कर्म करत गेलं पाहिजे, जी या आत्म्याला अभिप्रेत आहेत, याची जाणीव देणारे, ज्ञान देणारे आणि यातून बाहेरचा मार्ग दाखवून, त्यासाठी धडपड करण्याची प्रेरणा व सद्बुद्धी देणारे, सद्गुरुरुप ईश्वरी अंशाची संगती आपल्याला लाभली, हा खरच खूप मोठा दैवी वा ईश्वरी संदेश आहे. 

युगानुयुगांच्या पुण्याईचं फलस्वरूप म्हणून अशी संगती लाभली, हे पक्कं ध्यानात असुद्या. या एका संगतीने, जन्म सार्थकी लागावा, अशी सद्गुरूंची इच्छा असल्या कारणानेच हा संगतियोग प्रारब्धात जुळून येतो. म्हणून, देह, बुद्धी वा मन यांना सुखावणारी,  इतर कोणतीही संगती, लाभण्यापेक्षा, सद्गुरुकृपेच्या संगतीचा योगच जुळून यावा, अशी प्रार्थना, प्रत्येकाने ईश्वरचरणी केली पाहिजे. 

ज्यांना ती संगती, दैवयोगाने वा पूर्वसंचिताने, प्राप्त झालेली आहे, त्यांनी या सद्गुरू संगतीचा लाभ घेऊन, शक्यतो, सांसारिक मागणं करण्यापेक्षा, असं मागणं मागावं, की त्यानंतर,बाकी काही मागण्याची आवश्यकता राहणार नाही. संगतीचा हा योग प्रत्येक प्राणीमात्राच्या प्रारब्धात येवो, हीच आपण त्या सद्गुरू चरणी प्रार्थना करून, म्हणूया. 

तुमची संगती, नित्य मनास लाभो
आत्मज्ञान मज या  जन्मी प्राप्त होवो
चरणी सद्गुरू, तुमच्या हे ध्यान राहो
आशा मनीषा, तव भक्तीत तृप्त होवो 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०१/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments