Skip to main content

भोग आणि ईश्वर ४४५

भोग आणि ईश्वर  ४४५  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 

उपास किंवा उपवास याचा खरा अर्थ किंवा खरं प्रयोजन, या तीन भुका अर्थात देह बुद्धी व मन, यांना वाढण्या पासून नियंत्रित करण्यासाठी आहे. म्हणजे शरीराला अन्न पाणी यांची असलेली आवश्यकता, ही काळ वय यानुसार नैसर्गिक जितकी असेल तितकी ती भागवणं, हा पुरुषार्थ आहे.म्हणजे अर्थ आणि काम यामध्ये देहाच्या,गरजांची काळजी विधात्याने घेतलेली आहे. 

पण त्यापुढे, ती भूक अनियंत्रित वाढणं आणि त्यानंतर, मग त्यासाठी आयुष्याचं चक्र व नेम बदलत जाणं, हा प्रवास देहाला, बुद्धीला व मनाला अनेक प्रकारच्या गुंत्या तून नेतो.वास्तविक निसर्गाने दिलेल्या सर्व प्रकारच्या भुका या मात्र देह चालवून, त्यातून आत्महित साधून, पुढील जन्मात अजून उन्नत्ती करण्या साठीची बेगमी करत जाणं, इतपतच भागवल्या पाहिजेत. म्हणजेच त्या मर्यादेतच भोगल्या वा भागल्या पाहिजेत. 

पण माणूस हा प्राणी सर्व प्राणीमात्रांमध्ये वेगळा, पण विचित्र आहे. मानवेतर सर्व प्राणी, आपली देहाची भूक भागल्यानंतर, सावज वा शिकार समोर आली तरी, त्याकडे ढुंकूनही पाहात नाही. म्हणजे पुढील भूक लागे पर्यंत तो तृप्त होतो व असतो. परंतु माणूस हा प्राणी, या सर्वांहून भिन्न यासाठी आहे की, त्याला कोणत्याही प्रकारच्या भुकेबाबत, ती भूक भागल्यानंतर, आणखीन प्राप्त करण्याची लालसा वा मनीषा जागृत होते. 

याची कारणं अनेक आहेत. पण प्रामुख्याने मोह, लोभ, मत्सर, द्वेष,  असूया, भीती काळजी हे अनेक प्रकारचे भाव ही मुख्य कारणं  आहेत. या सर्व संमोहित करणाऱ्या घटकांमुळे, निसर्गतः क्रमप्राप्त व फलानुसार जे आपल्या वाट्याला आलेलं, दुःखं, सुख, काळज्या, हाल अपेष्टा, भय, प्राप्ती, देणी यांचा हिशोब करून, उरलेला वेळ व बल आपल्या या व पुढील जन्मांची चिंता करण्यासाठी घालवला पाहिजे. 

पण असं घडत नाही. ज्यावेळी जे कर्मफलाने प्राप्त होऊन समोर येईल, त्याचा भोग घेऊन, प्राप्त फल भोगून वा उपभोगून, त्या कर्माच्या ऋणातून, मुक्त होऊन, आपलं कर्तव्य पूर्ण करत पुढे गेलं पाहिजे. यामध्ये निर्विकारपणे व निर्विचारी राहून, विचार व विकारांचा गुंता न वाढावणं हेच श्रेयस्कर आहे. पण तसं घडत नाही. याचं महत्वाचं कारण हे की, एक तृप्त झालेली इच्छा, वासना, भय, चिंता-काळजी हे सर्व पुढील संततीला जन्माला घालते. संतती म्हणजे त्याचंच प्रतिरूप. 

म्हणून या सर्वांची एक साखळी तयार होते. प्रत्येक तृप्त इच्छा वा वासना, एक कर्मफल समाप्त करतानाच, नवीन कर्म जन्माला घालून, नवीन वासनांमागे जीवाला जुंपून देते. या सर्वांतून बाहेर पडण्याचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे उपवास, अर्थात देह बुद्धी व मन यांच्यासाठी. यावर विस्तृत चिंतन उद्या करूया. पण तोपर्यंत या उपवास संकल्पनेवर विचार करा आणि नाम घेतच रहा. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१८/०२/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...