Skip to main content

भोग आणि ईश्वर ६८

भोग आणि ईश्वर  ६८
  
नाम घेताना फक्त नामाचाच विचार करावा, इतर कोणताही विचार येणार नाही हे कटाक्षाने पाहिलं पाहिजे. पण हे कटाक्षाने म्हणजे कसं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आपण ज्यावेळी एखाद्या अश्या गोष्टीवर मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी मनातील विषय व वासना किंवा अश्या सर्व गोष्टी, आठवणी, चिंता, काळज्या या दरवेळी डोकं वर काढतात. याउलट ज्यावेळी मन वासनेत रममाण असतं त्यावेळी ते इतर कोणत्याही गोष्टी मार्गात वा मनात येऊ देऊ इच्छित नाही. हाच धागा वा तत्व आपण जाणीवपूर्वक नाम घेताना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 

याचं कारण म्हणजे या सर्व विषय, वासना, आठवणी या ऊर्जा आहेत, म्हणून ज्या ज्यावेळी नामाची, एकाग्रतेची, साधनेची आंच त्यांना लागते, सर्वात प्रथम त्याच गोष्टी वर येऊन त्रास द्यायला सुरुवात करतात. कारण त्यांना हे अविषयी होऊन अध्यात्मिक मार्गाने जाणारं मन, बुद्धी व आत्मा एकमार्गी होताना पाहून भयंकर त्रास होतो. 

कारण अनेक जन्म ते आत्म्यासह मनोमयकोषात फिरत असतात आणि अशी अनेक जन्मांची साथ ते सोडायला सहसा तयार होत नाहीत. त्यात अशुद्ध व तामसी स्वरूपातील माया त्यांना याकार्यात सहाय्य करते.  त्यामुळे येनकेनप्रकारेण ते आपल्याला मार्गभ्रष्ट करण्याचा, थोडक्यात आपलं अस्तित्व दाखवून, त्रास देऊन विचलित करून, कंटाळा आणून एकाग्र होऊ न देण्याचा हरप्रकारे पयत्न करतात.

म्हणूनच मी अनेकदा सांगितलं की, नेटाने, निष्ठेने, श्रद्धेने आणि अविचल राहून नामासाठी नाम घेत जा. त्याबाबत कोणतीही शंका, अढी, किंतु, नफातोटा वा प्रगती अधोगतीचा विचार डोक्यात येऊ न देता, फक्त नामकरताच नाम घेत आहोत, ही भावना दृढ धरा. कारण तुम्ही नाम घेत आहात हीच खूप मोठी उपलब्धी आहे, तुमच्या जीवनातील. नाम घेणं, घ्यावस वाटणं, हेच तुमच्या प्रारब्धातील पुण्याचा परिणाम आहे, हे कायम लक्षात ठेवा.

तुमच्या मनात नाम घेण्याचा विचार येत आहे म्हणजे तुमच्यावर तुमच्या गतजन्मातील सद्गुरुकृपेचा ओघ पुनः प्राप्त होण्याचा योग आहे, अथवा गतजन्मातील पुण्याईला या जन्मात पुढे सुरू करून देण्यासाठी अज्ञात गुरुतत्व कार्यरत आहे आणि हा शुभसंकेत मानून ज्या वेळी असा विचार मनात येईल, त्याक्षणी त्या विचाराचा धागा धरून, नामाची दोरी हाती धरावी. खात्रीपूर्वक सांगतो, योग्यवेळी आपले गतजन्मातील सद्गुरू आपल्याला याजन्मातील योग्य सद्गुरूंची भेट वा मार्ग प्राप्त करून देतील.

नामाचा महिमा सांगताना अनेकांनी अनेक नामजप सिद्ध करून आपापल्या साधकांना म्हणण्याची दिक्षा, अनुग्रह स्वरूपात दिली. त्यांच्या देहत्यागापश्चातसुद्धा चैतन्य शक्तीच्या स्वरूपात त्यांचं अस्तित्व या जगतावर, साधकांवर,  इच्छुकांवर कृपादृष्टी ठेवण्यासाठी आत्म स्वरूपात विहरत असतं. 

अश्या चैतन्यस्वरूपातील सद्गुरूतत्वांना आपल्या साधकांची चिंता नेहमी असते, याची खात्री बाळगा. त्याचप्रमाणे आपण घेत असलेल्या नामात आपली असलेली निष्ठा, चिकाटी, श्रद्धा या त्यांना आनंद व समाधान देत असतात. परंतु आपण यात करत असलेली चालढकल वा कुचराई त्यांना क्लेश देतात हे मात्र नेहमी ध्यानात ठेवा.

एकदा त्यांनी साधक म्हणून तुमचा स्वीकार केला अथवा सद्गुरू म्हणून मनाने तुम्ही त्यांना स्वीकारलत की, तुमची अध्यात्मिक जबाबदारी त्यांनी घेतलेली असते, त्यामुळे तुमचं नैतिक वर्तन, चारित्र्य, वर्तणूक, संवाद, विषय, वासना हे सर्व नियंत्रणात ठेवून तुमचं अध्यात्मिक मूल्य वाढवण्याची जबाबदारी सर्वस्वी तुमचीच असते. यात तुमच्या प्रचंड इच्छाशक्तीला कार्यरत करून, श्रद्धायुक्त अंतःकरणाने फक्त नामावर एकाग्र होत गेल्यास, आपले सद्गुरू तुमची निष्ठा जोखून, तुम्हाला नक्की, मार्गभ्रष्ट होण्यापासून वाचवतील. पण तुमची आत्मनिष्ठा महत्वाची आहे हे कायम लक्षात असुद्या.

पुढील भागात विशिष्ट नाम घ्यावं का आणि त्यामुळे काय साध्य होऊ शकतं अथवा काय नाही यावर चर्चा करूया. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०६/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...