Skip to main content

भोग आणि ईश्वर ६४

भोग आणि ईश्वर  ६४

ब्राह्ममुहूर्ताला किंवा सकाळी लवकर उठून नामस्मरण वा मन व बुद्धीशी निगडित कोणतही कार्य केल्यास ते उत्तम परिणाम देणारे ठरते, हे काल आपण पाहिले. त्यावेळी घेतलेल्या नामामय लहरी या अधिक परिणामकारक असतात, मनाला व अंतरात्म्याला अलौकिक आनंद देणाऱ्या असतात आणि त्या नादाचा व लहरींचा वास्तूवरसुद्धा सकारात्मक व सुख कारक परिणाम होतो. लहरींचा इच्छित परिणाम होतो.

आता या नादमय नामलहरी जितक्या शक्तिशाली तितक्याच त्या अधिक प्रभावशाली असतात, मग ते नामजप असो वा नामसंकीर्तन असो. दोन्हीमध्ये तल्लीनता, तन्मयता व त्या नादात, मन किती एकाग्र होऊन, आपल्या आराध्याच्या भक्तीत लीन झालं आहे, हे महत्वाचं आहे. नामसंकीर्तनात भगवंताच्या नामाला एका विशिष्ट लयीत, नादात, सुरात घेऊन, त्याचा संगीतमय आविष्कार करून ईश्वराला भजलं जातं. संगीत हे सर्वात प्रथम कानांवाटे हृदयात पोहोचतं.

नाम हे फक्त त्या नामचं उच्चारण असतं, जे मोठ्याने असेल वा मनातल्या मनात असेल. नामसंकीर्तनात, त्या नामचं सुरात व तालात उच्चारण केलं जातं. ज्यामध्ये ताल हा लहरीचं काम करतो आणि मन त्या नादात, त्या तालात आणि त्या लहरींवर हरवून जातं. नामजपामध्ये हेच अपेक्षित असतं. तेच नामसंकीर्तन साध्य करून देतं. पण त्यामुळे कोणतंही एक उजवं किंवा डावं ठरत नाही. 

सर्वात महत्वाचं लहरी वा तरंग जे नादमय माध्यमातून परमेश्वर शक्तीपर्यंत पोहोचावे लागतात ते साध्य होणं आणि त्या भक्तिमय वातावरणात मनाला,हृदयाला आणि  आत्म्याला त्या नादमय तल्लीनतेचा, अनुभव व अनुभूती येणं हे महत्वाचं आहे. अभंग, कीर्तन, भजन आरती या सर्वांचा उद्देश भक्तीची अत्युच्च अनुभूती देणं आहे आणि ती आपण घेणं हे महत्वाचं आहे. 

नामजप एकांतात, मन शांत करून, वैखरीत सुरू करून हळूहळू त्यातून मध्यमा, पश्यंती पर्यंत जाण्याचा प्रयत्न करून बघा. परा वाणी ही, नाम  सुप्त मनात गेल्यानंतर आपोआप साध्य होतं. म्हणून वैखरीने सुरू करून हळूहळू आत आत जाण्याचा प्रयत्न करावा. पण ही गोष्ट खरतर तुमच्या नामचं सातत्य आपोआप साध्य करून देईल, ह्याची खात्री बाळगा. म्हणूनच जी अनुभूती नादातून नामसंकीर्तन करताना येते,  तीच अनुभूती या एकांतातील नामजपात येते. शेवटी यात स्व व स्वतःला विसरून जाणं हे महत्वाचं आहे. कारण स्वतःला विसरल्याशिवाय, ज्याला मिळवायचं आहे तो मिळणार नाही. 

ही एकतानता, एकनादता, एकांतता, लहरींवर स्वार होऊन, त्यात मिसळून जाणं, हाच अनुभव घेत व त्यात आपल्याला विसरत आराध्याच्या ध्यानात मग्न होणं, हेच भक्तीरुप साधण्यासाठी, कित्येक संत महंत यांनी जन्म जन्म घालवलेत, नव्हे त्यासाठी ईश्वराकडे मानवी जन्म मागून घेतले. एक तुझ्या नामशिवाय दुसरं काहीही नको. कारण त्यातल्या आनंदाची अनुभूती हीच खरी महत्वाची आहे. त्यापुढे मोक्ष व मुक्ती सुद्धा तुकोबारायांनी तुच्छ मानली. 

एवढा अलौकिक आनंद नामाच्या जपात गजरात, संगीतात, त्या तानेत, त्या नादमाधुर्यात आहे. म्हणून जे माध्यम, तुम्हाला आनंदाची अनुभूती देऊन, नामाचा योग साधेल, ते माध्यम, तुमच्यासाठी श्रेष्ठ आहे. मुख्य उद्देश हा नाम घेणं हा आहे. ते कसं घ्यायचं हे तुमच्या मनावर अवलंबून आहे. मन ज्या प्रकारात तल्लीन होऊन एकाग्रता, एकतानता आणि नाद साधतं ते योग्य व तुमच्यासाठी श्रेष्ठ आहे. 

म्हणूनच विधात्याने रचलेल्या नवविधा भक्तीत श्रेष्ठ कनिष्ठ काही नाही. श्रेष्ठ काय तर त्याच्या नामाचा अनुभव व त्या नादाची अनुभूती, ती साधता आली की काम झालं.

याच विषयात अजून पुढे जाऊया, उद्याच्या भागात. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०२/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...