Skip to main content

नामाविण दुजे नाही सत्य जाणा

नामाविण दुजे नाही सत्य जाणा
नामचिया पायी मन झिजवाना

नाम सदा घ्यावे
नाम श्वास व्हावे
नामाचेच व्हावे
नाम जिवा भावे
नामाची गोडी मनी लागूद्याना
नामचिया पायी मन झिजवाना ||१||

देह जन्मला वाढला
जगी समर्थ जाहला
इतुके होता, दुःखाला
पाहता भयभीत झाला 
सुखदुःख सारे कर्मबद्ध जाणा
नामचिया पायी मन झिजवाना ||२||

भोग भोगताना मनी
संदेह येई परतुनी
काय मम जीवनी 
हे काटे पायातुनी
प्रारब्धाचे भोग गतकर्मात जाणा
नामचिया पायी मन झिजवाना ||३||

मना  व्यथा चिंता होई
मना आनंद प्राप्ती होई
मना सुखदुःख सर्वकाही
प्रतिसादातून प्राप्त होई
जलावरील तरंग तैसेच हे जाणा
नामचिया पायी मन झिजवाना ||४||

मन पालटोनी जाई 
मन संचित पुढे नेई
रागद्वेष अपमानही
साठवून पुढे नेई
परिणाम याचा वृत्तीत जाणा
नामचिया पायी मन झिजवाना ||५||

सापडे ना काही हाती
जाता जन्म शून्य हाती
संचित जे येई तुझ्या हाती
भोगणे हीच त्याची प्राप्ती
खेळ सोडा हा, एक नाम घ्याना
नामचिया पायी मन झिजवाना ||६||

नामासाठी उरलेला जन्म
घालवा क्षण क्षण वेचून
नामसखा जोडे जे मन 
नित्य आनंद तो सुदिन
कर्मबंधनाची तुटे शृंखला, जाणा
नामचिया पायी मन झिजवाना ||७||

इतुकेही सांगूनिया मना
काही फरक तो पडेना
नित्य धावे मनी वासना
त्याचा उपाय सापडेना
नामानेच तरशी, आधी घे नामा
नामचिया पायी मन झिजवाना ||८||

नामपरते साधन नाही
नामाविण गती नाही
नाम कलीयुगी पाही
अवतार नाम सुक्ष्मही
रिपू सूक्ष्म औषधही सूक्ष्म जाणा
नामचिया पायी मन झिजवाना ||९||

आता ठेवावा बुद्धिभेद
धरा हाती नाम नित्य
असो देह तो कामात
नाम चालूद्या मनात
नामा काही न ये आड, जाणा
नामचिया पायी मन झिजवाना ||१०||

राहुद्या मोक्षाच्या गप्पा
आनंद दुःख सुवार्ता
सर्व मनाच्याच गप्पा
परी भोगले जाण चित्ता 
कर्मभोगसाखळी हे सत्य जाणा
नामचिया पायी मन झिजवाना ||११||

मन होई ते साशंक 
नाम का, हा आक्षेप
नाही केला नामजप
करू का मी खटाटोप
कर्माचिया नियमांना तरी माना
नामचिया पायी मन झिजवाना ||१२||

आता सोडा सारे खेळ
भोगण्याचे गेले बळ
मन भ्रांती ते सकळ 
पाठी नामाचे पाठबळ
नाम मना देई आधार, भोगताना 
नामचिया पायी मन झिजवाना ||१३||

नाम नाम एकची नाम
जिव्हा नित्य घ्यावे नाम
श्वास जावो घेता नाम
हे साधे नित्य, घेता नाम
क्षण शेवटचातरी हाती धराना
नामचिया पायी मन झिजवाना ||१४||

©® कवी : प्रसन्न आठवले
१८/०२/२०२१
०८:३५



Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...