भोग आणि ईश्वर ८९
क्षमायाचना आणि प्रार्थना या नित्य उपासनेचा भाग केल्यानंतर, आपण आज विचार करूया की, कर्ममार्गी माणसाला नित्य नामसारणात असताना आणि चालताना काय काय साध्य होतं किंवा कशी कशी सिद्ध होऊ शकते. मुळात या जगात आपण आलो ज्या उद्देशाने किंवा धाडले गेलो ज्या उद्देशांसाठी, त्यांच्या पूर्ततेसाठी लागणारी सर्व सिद्धता मानवाला दिली आहे का.
आत्म्याच्या उन्नतीसाठी आणि मोक्षप्राप्ती वा मुक्तीसाठी मन, देह, बुद्धी, जाण या सर्व गोष्टी प्रत्येक जीवाला दिल्या आहेत. मी व्यावहारिक बुद्धीबद्दल बोलत नाही. या गोष्टींचं प्रमाण कमीअधिक असेल, पण इंद्रियांना नियंत्रित करून, वामामार्गी न होता, अध्यात्म मार्गावर वाटचाल करायला लागणारी, मुख्य यंत्रसामग्री पंचमहाभूतरुप देह, ज्ञानेंद्रिय,
त्या ज्ञानेंद्रियांना ज्ञानप्राप्ती व्हावी यासाठी मेंदू, त्यामध्ये जाणिवा जागृत होऊन त्यांचं ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता, सुक्ष्मातील सूक्ष्म ज्ञान प्राप्त करून, त्याचा योग्यायोग्य विचार करून बुद्धीला चालना देणारं, मन आणि या सर्वांमागे कार्य करणारी चेतनाशक्ती म्हणजे ईश्वरी अंश असलेला आत्मा.
या सर्वांच्या आधारे प्रत्येक मानवाला आपल्या उन्नती साठी सिद्ध केलं असताना, कर्मगतीच्या फेऱ्यात आपणहून अडकलेला आणि मायेच्या आधीन राहून, त्यात वाहावत गेलेला देह व मन अनेक योग्य व अयोग्य कर्म करून, प्रारब्धाचा ठेवा जोडत जोडत, आत्म्याच्या माध्यमातून अनेक जन्म, त्याच चक्रात फिरत राहतो. देहधारी असताना अनेक गोष्टींचा पडलेला विसर आणि देहत्यागापश्चात पुनः पुनः भटकत राहून जन्ममरणाच्या चक्रव्यूहात अडकत जातो.
हे एक प्रकारे, समुद्र अथवा नदीच्या पाण्यातील भवऱ्या समान आहे. एकदा भवऱ्यात सापडल्यानंतर फक्त फिरत राहण्याशिवाय पर्याय उरत नाही आणि माया जीवाला त्या फेऱ्यातून सुटू देत नाही. जीव देहाच्या, वासनेच्या, भावनांच्या बंधनात नित्य जन्मोजन्मी त्याच चक्रात मार्गक्रमण करतो. यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग म्हणजे आत्मशक्ती जागृत करून संचिताचा भार कमी करून कर्मगती सुधारत सुधारत पुढे जाऊन मुक्तीच्या दिशेने एक एक पाऊल वाटचाल करणे.
सर्वसामान्यपणे या प्रक्रियेला कित्येक जन्म लागू शकतात, कदाचित शेकड्यात आणि त्यातही प्रत्येक जन्मी साधनेची ही वाटचाल नित्य सुरू राहिली पाहिजे. हे अखंड आणि जन्मोजन्मी साधणं दैवदुर्लभ आहे. अनेक जन्मांची पुण्याई एकत्र आली, तरच हे एखाद्याला साध्य होऊ शकतं. पण प्रत्येक जन्मात, आधीच्या जन्मातील साधना, पुढे नेता येण्याची बुद्धी, जगताच्या, संसाराच्या मायेच्या प्रभावात जागृत राहिली पाहिजे. करोडो जीवांमध्ये फार मोजक्या जीवांना हे साधलं आहे, जसं श्रीशंकराचार्य, समर्थ रामदासस्वामी, श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज ही वानगी दाखल काही उदाहरणं.
ज्यांना फार कमी वयात ज्ञानप्राप्ती ईश्वरप्राप्ती याची ओढ जडली आणि त्यासाठी त्यांनी संसाराचा त्याग करून अलौकिक साधना करून स्वहित आणि त्याबरोबर जनहित साध्य केलं. ही वानगीदाखल उदाहरणं आहेत. मला ज्ञात नसलेली उदाहरणं यात आपण जोडू शकता. या सर्वांनी आपल्या साधनेने आणि त्यांच्या त्यांच्या सद्गुरुकृपेने, सिद्धी प्राप्त करून, त्याचा सदुपयोग आपल्यासारख्या बद्ध जीवांना मुक्तीचा मार्ग प्राप्त व्हावा यासाठीच केला. किंबहुना त्यासाठीची तळमळ जागृत झाली म्हणून त्यांनी साधनेचा आत्मयज्ञ करून उच्च पदाची प्राप्ती केली.
असे सर्व सिद्धात्मे, नित्य चैतन्यरूपात, देहाशिवाय अस्तित्वात असतात आणि आपल्या साधकांवर त्यांची कृपादृष्टी अविरत असते. ज्याचा प्रत्यय वा प्रचिती अनेक प्रसंगात, त्यांच्या त्यांच्या साधकांना होत असते. तरीही इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतेही गुरू आपल्या साधकांना संसार चक्रात बद्ध करणाऱ्या सुविधा, सुख वा सिद्धता प्रदान करणार नाहीत. कारण आत्मोन्नत्ती हा ज्यांचा देह असताना मार्ग व उद्देश होता, ते सद्गुरू चैतन्यरूपात त्याच मार्गात असणाऱ्या साधकांना नक्की आत्मोन्नत्तीसाठी सहाय्य करणार, पण संसारात अडकून साधनेचा विसर पडेल अश्या कोणत्याही गोष्टी ते करणार नाहीत.
हाच विषय उद्या अजून पुढे नेऊया.
नाम मात्र नित्य घेत रहा, कारण नाम, सर्व काही सुलभ करेल.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२७/०२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment